पक्ष घ्याल, चिन्ह घ्याल; पण उद्धव ठाकरेंच्या जनमानसातील 'प्रतिमे'चं आव्हान सत्ताधारी कसं पेलणार?
By संजय आवटे | Published: March 6, 2023 01:38 PM2023-03-06T13:38:46+5:302023-03-06T13:42:07+5:30
भाजपचे सरकार गेले आणि महाविकास आघाडी सरकार आले. हे सरकार स्थापन होऊन एक सगळ्यात मोठा फटका भाजपला बसला. तो म्हणजे, 'उद्धव ठाकरे' नावाचा नवा नेता जन्माला आला! या सरकारने काय केले असेल, तर त्याने या प्रतिमेला जन्म दिला.
>> संजय आवटे
महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊ देणे ही भाजपची सगळ्यात मोठी चूक होती. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला सुस्पष्ट बहुमत होते. वाटेल ती अट मान्य करून आधी सरकार स्थापन करायला हवे होते. मात्र, भाजपने ठाकरेंना मोकळे सोडून चूक केली. मुख्यमंत्री कोणाला करायचे, हे बंद दरवाजाआड ठरले होते की नाही, ते माहीत नाही. उद्धव खरे बोलतात की खोटे, तेही माहीत नाही. मात्र, आपल्याला वगळून उद्धव सरकार बनवू शकतात, याचा अंदाज भाजपला वेळीच यायला हवा होता. २०१९ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवली होती. तेव्हा, नरेंद्र मोदी यांची प्रतिमा वापरली गेली आणि देवेंद्रांचे नेतृत्व शिवसेनेने मान्य केल्यासारखीच स्थिती होती. बंद दरवाज्याचा उल्लेख तेव्हा कोणी करत नव्हते. देवेंद्र 'मी पुन्हा येईन' असे म्हणत असताना शिवसेना तेव्हा सुरात सूर मिसळत होती. याचा अर्थ, देवेंद्रच मुख्यमंत्री होणार, हे शिवसेनेने मान्य केले होते. तो झंझावात देवेंद्रांचा होता. एकहाती ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते. त्यांचे निवडणूक व्यवस्थापन प्रचंड ताकदीचे होते. विरोधक अगतिक होते आणि शिवसेना भाजपच्या आधाराने सरपटत होती. निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यात चित्र बदलले असले तरी देवेंद्र हाच मुख्य चेहरा होता आणि उद्धव यांनी तो मान्य केला होता, यात शंका नाही. अर्थात, त्याचवेळी देवेंद्रांच्या 'महाजनादेश यात्रे'ला समांतर अशी 'जनआशीर्वाद यात्रा' करून आदित्य आपला वेगळा मार्ग अधोरेखित करत होते. शांतपणे पण आपली वेगळी ओळख सांगण्याचा प्रयत्न करत होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असे सूचित करत होते. तो चेहरा आपण स्वतः असू शकतो, असेही संकेत आदित्य देत होते. संजय राऊत 'मातोश्री'पेक्षाही 'सिल्व्हर ओक'कडे अधिक येरझाऱ्या मारत होते.
हे चित्र लक्षात घेऊन तरी भाजपने वेळीच सावध व्हायला हवे होते.
पण, तसे झाले नाही. बरं. भाजपच पुन्हा पुन्हा तोंडावर पडत गेली. भाजपला मुख्यमंत्री पद सोडायचे नव्हते. पण, अखेरीस काय झाले? उद्धव सरकार पाडल्यानंतरही मुख्यमंत्रिपद अखेर 'शिवसेने'लाच तर द्यावे लागले! उद्धव आणि पवार यांच्या दोस्तीबद्दल चर्चा कोणत्या तोंडाने करणार? कारण, पहाटे शपथविधी करताना तुम्ही आणखी वेगळे काय केले होते? भाजपचे सरकार गेले आणि महाविकास आघाडी सरकार आले. हे सरकार स्थापन होऊन एक सगळ्यात मोठा फटका भाजपला बसला. तो म्हणजे, 'उद्धव ठाकरे' नावाचा नवा नेता जन्माला आला! या सरकारने काय केले असेल, तर त्याने या प्रतिमेला जन्म दिला. मुख्यमंत्री होण्यापूर्वीचे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री झालेले नि मुख्यमंत्री पद गेलेले उद्धव ठाकरे या दोन पूर्णपणे वेगळ्या व्यक्ती आहेत. त्यापूर्वीचे उद्धव ठाकरे हे फारच सामान्य, मर्यादित पाठिंबा लाभलेले आणि बापाची इस्टेट कशाबशी सांभाळणारे नेते होते. उद्धव मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर ते अवघ्या महाराष्ट्राचे नेते झाले. जनमानसात निर्माण झालेल्या त्यांच्या प्रतिमेला 'मॅच' करणारा कोणीही नेता आज महाराष्ट्रात नाही. (खुद्द बाळासाहेब ठाकरेही नाहीत!)
शरद पवार ऐंशीव्या वर्षी इडीच्या विरोधात उभे ठाकले, पावसात भिजले आणि २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी विरोधकांचे मनोधैर्य उंचावले. पण, तरीही पवारांच्या मर्यादा आहेत. त्यांच्या खांद्यावर असणारे ओझे बरेच आहे. त्यामुळे एका मर्यादेच्या पुढे पवार जाऊ शकत नाहीत. अजित पवार हे प्रचंड ताकदीचे 'स्टेट्समन' असले तरी पहाटेच्या शपथविधीसारख्या अनेक घटना आहेत, ज्या त्यांच्या प्रतिमेच्या आड आहेत. राज ठाकरे हे 'क्राउडपूलर' खरेच, पण त्यांना नेता म्हणून कोणी गंभीरपणे घेत नाही. कॉंग्रेसकडे उत्तम नेते आहेत. पण, 'चेहरा' नाही. महाराष्ट्राला नेताच नाही. ज्याच्या प्रतिमेवर चांद्यापासून बांद्यापर्यंत लोक उभे ठाकतील, असा नेता नाही. अशावेळी उद्धव झळाळून उभे राहिले. त्या अर्थाने त्यांची पाटी कोरी. "अरे, या माणसाकडे आपले लक्ष का गेले नाही?", असे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला वाटले. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे विलक्षण उंचीचे नेते झाले.
त्यात पुन्हा गंमत आहे. हा प्रतिमांचा खेळ आहे. नीट मूल्यमापन करायचे तर, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे फार उत्तम काम करत होते, असे नाही. उलटपक्षी अजित पवार आणि अन्य मंत्रीच कारभार बघत असताना, उद्धव कुठे होते, हे माहीत नाही. ज्या 'कोरोना'मुळे उद्धव यांचे कौतुक झाले, ते श्रेय प्रामुख्याने राजेश टोपे यांचे. उद्धव यांचे सहकारी मंत्री असोत की माध्यमे, कोणालाही विचारा. उद्धव यांच्याविषयी नकारात्मक मते कमी नाहीत. उद्धव यांचा एककल्ली कारभार, 'वर्क फ्रॉम होम'ची शैली, प्रशासनाच्या आकलनाचा अभाव, माध्यमांसोबतचा विसंवाद किंवा असंवाद म्हणू या, असे सारे होते.
गुवाहाटीला गेलेले आमदार आज खलनायक झाले असतीलही, पण त्यांचे सगळे मुद्दे गैर आहेत, असे नाही. पक्षप्रमुख म्हणून उद्धव यांचे अपयश ठळक आहेच. ज्यांनी शिवसेना घडवली आणि वाढवली, ते एकदम उपेक्षेच्या गर्तेत गेले, हे खरे आहे. आज त्यांचा गुंडगिरीचा, दंगलखोरीचा पूर्वेतिहास उगाळला जात असला, तरी उद्धव तेव्हा त्यांचे 'पार्टनर इन क्राइम' होते, हे खोटे नाही. उद्धव सहजपणे कोणाला भेटत नव्हते. संवादाचा अभाव होता. पक्षसंघटना निराश झाली होती. वडील मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री या रचनेत बाकी सगळे दूर फेकले गेले होते. हे सारे आरोप निराधार नाहीत. आदरवाइज, शिवसेनेसारख्या 'इमोशन ड्रिव्हन' पक्षात एवढे आमदार फोडणे सोपे नाही. शिवसेनेसाठी मरायला तयार असणारे आमदार एवढ्या सहजपणे गुवाहाटीला जाणार नाहीत. 'महाशक्ती' वगैरे कारणे आहेतच. पण, हेही विसरून चालणार नाही की बहुसंख्य नेते-आमदार-खासदार प्रचंड दुखावले गेले होते, अवमानित झाले होते. आता जी कारणे हे गुवाहाटीकर सांगताहेत, ती सगळी खरी नाहीत. पण, ज्यामुळे ते दुरावले, दुखावले, यात उद्धव यांची चूक नव्हतीच, असे नाही.
उद्धव यांचे मुख्यमंत्री पद गेल्यानंतर मात्र महाराष्ट्रात सहानुभूतीची लाट उसळली. ती अद्यापही ओसरलेली नाही. कोणी काही म्हणो, पण आज उद्धव यांची जी प्रतिमा महाराष्ट्रात आहे, ती विलक्षण उंचीची आहे. उद्धव मुख्यमंत्री झाल्यानंतरच ही प्रतिमा तयार झाली. ती त्यांना मुख्यमंत्री करणा-यांनाही अपेक्षित नव्हती. ज्या 'फेसबुक लाइव्ह'ची थट्टा विरोधकांनी केली, त्याच कोरोनाकालीन 'फेसबुक लाइव्ह'मधून उद्धव यांची प्रतिमा तयार होत गेली. लोक घरात होते आणि उद्धव हे त्या घरातले कर्ते, समंजस कुटुंबप्रमुख झालेले होते. ते मंत्रालयात जात नसतील, 'वर्षा'वर भेटत नसतील, पण लोकांच्या घरापर्यंत पोहोचले होते. कावेबाजांच्या गर्दीत शांत उद्धव लोकांना अधिकच आवडू लागले. मराठी माणसांची ते अस्मिता झाले. मुख्यमंत्र्यांच्या या समंजस, निखळ, शांत, सभ्य, सुसंस्कृत रूपाच्या लोक प्रेमात पडले. आज, सत्ता गेल्यानंतर तर ही प्रतिमा प्रचंड मोठी झाली आहे. या प्रतिमेचा पराभव करणे देवेंद्रांनाच काय, नरेंद्रांनाही शक्य नाही.
खेडच्या गोळीबार मैदानावर उसळलेला जनसागर हा कोणी जमवलेला नाही. तो उत्स्फूर्त आहे. आणि, महाराष्ट्राच्या कानाकोप-यात हे घडू शकते. कसब्यात भाजपचा झालेला पराभव यामध्येही हा मुद्दा होता. चिंचवडमध्ये कलाटे थांबले असते आणि 'वंचित'ने कलाटेंना पाठिंबा दिला नसता, तर चित्र वेगळे असते. आदित्य ठाकरे यांच्या रोड शोच्या वेळी कसब्यात जे चित्र होते, ते विलक्षण होते. रवींद्र धंगेकर हे तसे शिवसैनिक. सच्चे वगैरे शिवसैनिक. या निवडणुकीत सगळे 'सच्चे' शिवसैनिक त्यांच्यासोबत होते. मग कोणी मनसेत गेलेले असो वा कोणी शिंदेसेनेत वा कोणी भाजपमध्ये! कसब्याच्या निवडणूक निकालात 'ठाकरे' हा फार महत्त्वाचा 'इलेमेंट' होता.
'ठाकरे' इलेमेंटची गंमत अशी आहे की, आया-बायांना उद्धव हा जगातला एकमेव सभ्य नेता वाटतो. म्हाता-यांना जुन्या सुसंस्कृत राजकारणाचा तो पुरावा वाटतो. या गलिच्छ राजकारणात तेवढीच आशा वाटते. कसब्यात एक म्हातारा म्हणाला, "रामाच्या वाट्यालाही वनवास आला होता. उद्धवला या रावणांनी वनवासात धाडलं. पण, शेवटी रामच जिंकतो!" आता, या प्रतिमेचं काय करणार? दुसरीकडं तरूण पोरं-पोरी आणि 'जनरेशन झेड'ला आदित्य हा त्यांचा 'हीरो' वाटतो. त्या तोडीचा आणखी कोणी तरूण नेता महाराष्ट्रात नाहीच आहे! अशा वेळी भाजपपुढे हे भयंकर आव्हान आहे. त्यांच्याकडे सत्ता आहे. मुख्यमंत्री पद आहे. पैसा अमाप आहे. कसब्यातही तो दिसला. माध्यमे त्यांच्याकडे आहेत. मोदींसारखा देशस्तरावरचा चेहरा आहे. विरोधकांकडे काय आहे? मेरे पास 'मां'तोश्री है!
अर्थात, विरोधकांकडे एकच आहे. उद्धव ठाकरेंचा चेहरा. आता कोणी मान्य करणार नाही. पण, मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांना गैरसोईचे होते. पण, मुख्यमंत्रिपद गमावलेले उद्धव ठाकरे सगळ्यांनाच हवे आहेत. गोळीबार मैदानात उसळलेली अशी गर्दी आणि असा गोळीबार हे त्याशिवाय शक्य नाही, याची कल्पना त्यांना आहे. उद्धव यांच्याकडून तुम्ही पक्ष घ्याल, चिन्ह घ्याल. बाळासाहेबही घ्याल. पण, या प्रतिमेचं काय कराल?