उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाने कार्यकर्त्यांचे संभ्रमाच्या सीमेतच झाले लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 01:30 AM2017-10-02T01:30:08+5:302017-10-02T01:30:49+5:30
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक इतिहास आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुलूखमैदानी तोफ शिवाजी पार्काच्या मैदानावर धडधडताना अनेकांनी, अनेक वर्षे अनुभवली
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक इतिहास आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुलूखमैदानी तोफ शिवाजी पार्काच्या मैदानावर धडधडताना अनेकांनी, अनेक वर्षे अनुभवली. शिवसेनेची भूमिका या मेळाव्यातून बाळासाहेब मांडायचे. मनात एक, ओठात एक असा त्यांचा स्वभाव नव्हता. त्या भूमिका ऐकण्याची सवय शिवसैनिकांना होती. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणाने कार्यकर्त्यांचे संभ्रमाच्या सीमेतच लंघन झाले. विचारांचे सोने लुटायला आलेल्यांच्या हाती फक्त आपट्याची वाळून गेलेली पानेच आली. ना कसला जोष, ना कोणती सलग; आक्रमक मांडणी. राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांना पक्षावर आपली मजबूत पकड असल्याचा दणकट संदेश देण्याची सुर्वणसंधी उद्धव यांनी हाताने घालवली.
आपल्या पक्षातील संभ्रमावस्था जर पक्षप्रमुख या नात्याने आपणच दूर करू शकत नसू तर कार्यकर्त्यांच्या व्यथा वेदना फार पुढचा भाग ठरतात. खा. संजय राऊत यांनी एनडीए मेल्याचे विधान केले होते. पण उद्धव यांनी त्याच्याविरुद्ध भूमिका भाषणात घेतली. आपण सत्तेत का आहोत आणि सत्तेतून बाहेर पडणार की नाही, पडणार असू तर कधी आणि कशासाठी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शिवसैनिकांना हवी होती. मात्र महेबुबा मुफ्ती आणि नितीशकुमार सत्तेत का आहेत? हे शोधण्याचे काम उद्धवनी कार्यकर्त्यांना दिले. हे कम्युनिस्टांसारखे झाले. नळाला पाणी कधी येणार? अन्नधान्य स्वस्त कधी होणार? असे प्रश्न लोक विचारायचे तेव्हा कम्युनिस्ट नेते त्यांना रशियाची शकले कशी झाली, भारत त्याच मार्गावर कसा जातोय हे सांगायचे.
पुढे या कम्युनिस्टांचे काय झाले हे सांगायची गरज नाही. शिवसेना लढवय्या पक्ष आहे. मात्र पिंजºयात पाळलेला वाघ कुत्र्यालाही घाबरतो तशी या पक्षाची गत झाली आहे. सत्तेतून बाहेर पडलो तर आमदार पक्ष सोडून जातील अशी भीती जर पक्षप्रमुखांनाच वाटू लागली तर पक्ष कसा ताठ उभा राहणार? ज्यांना पक्ष सोडून जायचे असेल त्यांनी खुशाल जावे, आपण नवे चेहेरे घेऊन पक्ष उभा करू आणि त्यांना निवडूनही आणू असे म्हणण्याची धमक शिवसेना नेतृत्वाने कालच्या मेळाव्यात दाखवली असती तर जमलेल्या कार्यकर्त्यांमधली मरगळ काहीशी कमी झाली असती. मात्र तुम्ही आमची टक्केवारी सांभाळा, आम्ही तुमच्या खुर्च्या सांभाळतो असा संदेश जर भाषणातून मिळत असेल तर कार्यकर्त्यांनी का म्हणून टाळ्या वाजवायच्या? शरद पवार यांच्याविषयी उद्धव बोलले. पवारांच्या पक्षात नेते टिकत नसले तरीही जाणा-यांची तमा त्यांनी कधी केली नाही. उलट त्याजागी दुसºयाला निवडून आणण्याची प्रचंड क्षमता त्यांच्याकडे आहे.
प्रसंगी स्वपक्षातल्या नेत्यांना तिकीट देऊन पाडण्याची कलाही पवारांना येते. अशा अफाट ताकदीची अपेक्षा शिवसेना मेळाव्यातून उद्धव दाखवून देतील अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती मात्र तसे काहीच घडले नाही. उलट नको ते उद्योग केले तर जनता कानफटात मारेल, सत्तेत राहूनच विरोध करू अशी दुट्टपी भूमिका घेऊन उद्धव यांनी संभ्रमावस्था कायम ठेवली. तुमच्या डझनभर मंत्र्यांपैकी एकाही मंत्र्याने कधी सरकारला एखादा निर्णय घ्यायला भाग पाडल्याचे उदाहरण नाही. बुलेट ट्रेनबद्दल एकाही मंत्र्याने कधी मंत्रिमंडळात प्रश्न विचारला नाही. असे असताना शिवाजी पार्कात मंत्र्यांना व्यासपीठावर बसवून कानफटात मारण्याची भाषा कसली करता? भाजपाने भ्रमाचे आणि शिवसेनेने संभ्रमाचे वातावरण कायम ठेवण्याचे काम केले आहे. जनता मात्र फुकाच्या अपेक्षेने विचारांचे सोने लुटायला आली आणि हात हलवत निघून गेली.