कुरुप वास्तव
By admin | Published: January 19, 2017 11:55 PM2017-01-19T23:55:22+5:302017-01-19T23:55:22+5:30
पुढील सप्ताहात साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काही प्रश्न मनात येतात.
पुढील सप्ताहात साजऱ्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काही प्रश्न मनात येतात. स्वातंत्र्य मिळून सत्तर तर देश प्रजासत्ताक होऊन जवळपास तेवढीच वर्षे झाली आहेत. नवे सहस्त्रक उदयाला आले, त्याचेही सतरावे वर्ष आता सुरू आहे. या कालखंडाने सर्वसामान्य माणसाला काय दिले, किंवा सर्वसामान्य माणसाने या कालखंडात काय मिळवले असा एक प्रश्न आहे.
या प्रश्नाची अनेक उत्तरे येतील. नकारार्थी बोलायचे नाही अशी आपल्याला लहानपणापासून शिकवण असल्याने कोणकोणत्या क्षेत्रात आपण काय काय प्रगती केली याची एक यादी तयार करून आपण स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेऊ. त्यासाठीच अशा प्रसंगी सार्वजनिक समारंभ आयोजित करण्याची, तेथे भाषणे करण्याची व भाषणात स्वत:ची वारेमाप स्तुती करण्याची पद्धत आहे. पण जर थोडे खोलात जायचे ठरले, परिस्थितीचा कठोर आढावा घ्यायचे ठरले तर काय हाती लागेल?
तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जगण्याला गती आली, हे खरे असले तरी त्या गतीमुळे भोवंडून गेलेल्या माणसाची जगण्याची दिशा चुकली, त्याचे काय? विज्ञानाने माणसाचे जगणे सुसह्य केले हे खरे आहे, पण त्याने त्याला विलासी बनवले त्याचे काय? भौतिक साधनांचा प्रचंड विकास झाला हे खरे आहे, पण माणसाच्या आत्मिक प्रगतीचे काय?
भौतिक प्रगतीला महत्व दिले पाहिजेच, पण आत्मिक प्रगतीचे मोल नाकारून चालणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची जी व्याख्या केली आहे तीत माणसाच्या शरीराबरोबरच त्याची मानसिक स्थिती, त्याची आध्यात्मिक जाण आणि त्याच्या सामाजिक स्थानाचाही विचार केला आहे. मग आपण दावा करत असलेल्या तथाकथित प्रगतीचा आनंद घेण्यासाठी माणूस जर सुदृढ मन:स्थितीत नसेल तर त्या प्रगतीला काय अर्थ आहे?
जगणे सुंदर आहे असे अनेकजण सांगतात. माणसाचा जन्म एकदाच मिळतो, त्याची प्रतिष्ठा वाढावी असे काही तरी काम आपण केले पाहिजे, असेही साऱ्यांना वाटते. पण मग हे सुंदर आणि संस्मरणीय जगणे प्रत्यक्षात आपण कुरूप आणि दु:खमय करण्याच्या मागे का लागलो आहोत? भौतिक प्रगतीच्या नावाने होत असलेला बाहेरील कचरा आणि जातपात, धर्म, वर्ण, पंथ, वंशाच्या नावाने मनात साचत असलेला कचरा, व त्याच्या ढिगाऱ्यात माणसाच्या जगण्यातले सौंदर्य हरवून गेले आहे, हे नाकारण्यात काय अर्थ आहे?
-प्रल्हाद जाधव