अनधिकार चेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:30 AM2018-01-22T00:30:38+5:302018-01-22T02:22:00+5:30

ज्या क्षेत्राचा अभ्यास नाही, ज्यावर आपला अधिकार नाही आणि ज्या विषयीचे आपले ज्ञान ऐकीव कथांवर आधारले आहे त्या विषयावर आपण बोलू नये हे समजायला विशेष ज्ञान वा बुद्धी लागत नाही.

 Unauthorized attempt | अनधिकार चेष्टा

अनधिकार चेष्टा

Next

ज्या क्षेत्राचा अभ्यास नाही, ज्यावर आपला अधिकार नाही आणि ज्या विषयीचे आपले ज्ञान ऐकीव कथांवर आधारले आहे त्या विषयावर आपण बोलू नये हे समजायला विशेष ज्ञान वा बुद्धी लागत नाही. मात्र राजकारणात प्रवेश करून सत्तेवर आलेल्या माणसांचे याविषयीचे तारतम्य धूसर होते आणि मग ती कोणत्याही विषयाला आपल्या अकलेचे तारे तोडू लागते. जगाने व त्यातील विज्ञानाने मान्य केलेला चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा आहे आणि तो आपल्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात यावा हे मानवसंसाधन विभागाचे राज्यमंत्री सत्यपाल सिंग यांनी औरंगाबादमध्ये केलेले वक्तव्य अशा अनाधिकार चेष्टेत समाविष्ट होणारे आहे. वर ‘मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे’ हे सांगून त्यांनी विज्ञानाच्या विद्यार्थ्यांचाही अपमान करून टाकला आहे. डार्विनचा सिद्धांत केवळ जगन्मान्यच नाही तर त्याने ज्या धर्मश्रद्धा मोडीत काढल्या त्या श्रद्धांचे मक्तेदारही आता तो मान्य करायला सिद्ध झाले आहेत. डान ब्राऊन या अमेरिकेन कादंबरीकाराने नुकत्याच लिहिलेल्या ‘ओरिजीन’ या कादंबरीत जीवाच्या जन्माची कथा वैज्ञानिक भाषेत पण अत्यंत कलात्मक स्वरूपात लिहून या वैज्ञानिक सत्याला कलाक्षेत्राची असलेली मान्यताही जाहीर केली आहे. भूगोल, पदार्थविज्ञान किंवा समाजशास्त्र ही जशी विज्ञानाची क्षेत्रे आहेत तसे मानववंश शास्त्रही आता औषधी विज्ञानाच्या विकासामुळे शास्त्र म्हणून मान्यता पावले आहे. ‘ते शास्त्र खोटे आहे कारण आमच्या आईवडिलांनी, आजी-आजोबांनी किंवा पूर्वजांनी असे काही आम्हाला सांगितले नाही’ असे यासंदर्भात सत्यपाल सिंग म्हणत असतील तर ‘विज्ञानामुळे पुढे आलेल्या न्यूटनपासून आईन्स्टाईनपर्यंतच्या सर्व वैज्ञानिकांनी सिद्ध केलेली प्रमेयेही आपल्या पूर्वजांनी कधी सांगितली नव्हती हे त्यांना समजावून सांगावे लागेल. आजोबा आणि आजी यांनी सांगितलेल्या शिळोप्याच्या गप्पांच्या आधारे वैज्ञानिक सत्य नाकारणारा इसम आपला मानवसंसाधन मंत्री असतो हीच मुळात आपली खरी व्यथा आहे. कधी काळी नागपुरात पोलीस कमिश्नरच्या जागेवर असताना संघाशी संधान जुळविल्याने सत्यपालांना पुढे भाजपाचे तिकीट मिळाले. मात्र पोलिसांना विज्ञानाच्या क्षेत्रातही आपली दंडुकेशाही चालविण्याचा अधिकार प्राप्त होतो अशा भ्रमात राहणाºयांचे भरारीज्ञान कुठवर जाते हे कोणी सांगावे? पुरुषांनी हेल्मेट घालायचे मात्र स्त्रियांनी मोटारसायकलींवरुन जाताना आपला चेहरा रुमालाने झाकायचा नाही असा चमत्कारिक आग्रह धरणाºया या पोलीस अधिकाºयाचा विज्ञानविषयक अधिकार मर्यादित असणार हे उघड आहे. तरीही असे बोलण्याचे व डार्विनला चूक ठरविण्याचे साहस त्याच्याकडून होत असेल तर ती त्याला राजकारणाने दिलेली देणगी आहे असे म्हटले पाहिजे. सत्यपालसिंगांच्या या वक्तव्याला विरोध करणारे पत्रक देशातील शंभर प्रमुख वैज्ञानिकांनी तात्काळ काढले ही बाब येथे नोंदविण्याजोगी व महत्त्वाची आहे. सत्यपालसिंग मानवसंसाधन मंत्री असल्याने त्यांचा शिक्षणखात्याशी संबंध आहे. एखादेवेळी ते आपले डार्विनविषयीचे तर्कट शिक्षण व्यवस्थेत आणण्याचा पोलिसी आग्रह धरणारच नाहीत असे नाही. त्यामुळे त्या खात्याचे प्रमुख मंत्री प्रकाश जावडेकर यांनीच आता याविषयी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. ज्या खात्याचे मंत्रिपद कधीकाळी स्मृती इराणीसारख्या पदवीशून्य बाईने भूषविले त्या खात्यात काहीही घडणे अशक्य नाही. धर्माने दिलेल्या अंधश्रद्धादेखील खºया असल्याचे सांगण्याचे व त्या आधारे विज्ञानानेच आपल्या शिकवणीत दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे हे सांगण्याचे प्रकार इतिहासात अनेकदा घडले. आपल्याकडेही रामाच्या काळातील विमाने खरी होती किंवा महाभारतातील अग्निबाण म्हणजेच अण्वस्त्र होय हे सांगण्याचे बावळट प्रकार प्रत्यक्ष जागतिक पातळीवर झालेल्या विज्ञान परिषदेतही आपल्या देशी विद्वानांनी याआधी केले आहेत. सत्यपालसिंग ही त्याच प्रकाराची पुनरावृत्ती आहे. जाता जाता एक गोष्टी आणखीही सत्यपालजींनी डार्विनला खोटे ठरवून आजी-आजोबांना खरे ठरविले म्हणून त्यांच्या पाठीशी आपल्या स्वदेशी वारकºयांचे जत्थे आता जमू नयेत एवढेच येथे सुचवायचे.

Web Title:  Unauthorized attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.