अविश्वासार्हतेचे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 06:17 AM2018-02-23T06:17:44+5:302018-02-23T06:17:49+5:30

प्रश्नपत्रिकांचे चार संच करणे, पर्यवेक्षकांनाही परीक्षा केंद्रात मोबाइलवर बंदी घालण्यापासून भरारी पथकांची संख्या वाढविण्यापर्यंत अनेक उपाय झाले.

Uncertainty Education | अविश्वासार्हतेचे शिक्षण

अविश्वासार्हतेचे शिक्षण

Next

प्रश्नपत्रिकांचे चार संच करणे, पर्यवेक्षकांनाही परीक्षा केंद्रात मोबाइलवर बंदी घालण्यापासून भरारी पथकांची संख्या वाढविण्यापर्यंत अनेक उपाय झाले. परंतु, प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रमाण कमी होण्यास तयार नाही. पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच फुटलेले पेपर व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल होऊन राज्यभरात पोहोचतात. यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने अनेक उपाययोजनांवर चर्चा केली. गेल्या वर्षी सूचनाही मागविण्यात आल्या होत्या. याचाच एक भाग म्हणून यंदाच्या वर्षीपासून प्रत्येक वर्गातील प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट विद्यार्थ्यांच्या सहीने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. उशिरा येणाºया विद्यार्थ्यांकडूनच प्रश्नपत्रिका फोडण्याचे प्रकार होत असल्याचे दिसून आल्याने या वर्षीपासून उशिरा येणाºया कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश द्यायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला. तरीही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील एका केंद्रावर इंग्रजीचा पेपर फुटलाच. या प्रकारांना रोखायचे कसे, हा प्रश्न आहे. वास्तविक, तंत्रज्ञानाचा वापर करून पेपर फुटण्याचे प्रकार घडत असतील, तर त्याला रोखण्यासाठीही तंत्रज्ञान वापरणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षीच्या सूचनांत एक किंवा दोन पानांच्या असणाºया प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर इंटरनेटच्या माध्यमातून पाठविण्यात याव्यात व तेथे त्यांची छपाई व्हावी, असा विचार पुढे आला होता. प्रश्नपत्रिकेतील मानवी हस्तक्षेप दूर करण्यासाठी प्रत्येक विषयाची ‘क्वेश्चन बँक’ तयार करून संगणकीय प्रणालीमार्फत प्रश्नपत्रिकेचे संच तयार करण्याबाबत चर्चा झाली. मोबाइलवरून व्हायरल होऊ न देण्यासाठी परीक्षा केंद्रांवर मोबाइल जॅमर आणि आवश्यक तेथे सीसीटीव्ही बसविण्याचाही विचार झाला. प्रशासकीय पातळीवर होऊ शकणाºया सुधारणा बासनात गेल्या. फक्त उशिरा पोहोचणाºया विद्यार्थ्याला प्रवेश द्यायचा नाही, ही एकमेव सूचना अमलात आणली गेली. त्यामुळे दुखणे तसेच राहिले. वास्तविक, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशी लबाडी होणेच गैर आहे. परंतु, पाल्यांना केवळ ‘गुणवंतराव’ करण्यात धन्यता मानणारे पालकच पेपर मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. पर्यवेक्षकही शिक्षकाचा धर्म विसरतात. पेपर फार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले नाहीत किंवा एका तासानंतर ते मिळूनही उपयोग नाही, असाही युक्तिवाद पेपरफुटीबाबत होतो. परंतु, एक लक्षात घ्यायला हवे की, अशा घटनांमुळे कोवळ्या वयातच विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास उडून जात आहे. राजकारणापासून प्रशासनापर्यंत आणि आर्थिक व्यवहारापर्यंतची अनेक क्षेत्रे आपली विश्वासार्हता गमावून बसलेली आहेत. शालेय शिक्षणक्षेत्राने तरी ती गमावू नये!

Web Title: Uncertainty Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.