पवित्र गायीचे अपावित्र्य

By admin | Published: January 11, 2017 12:31 AM2017-01-11T00:31:15+5:302017-01-11T00:31:15+5:30

गणवेषधारी संघटनेतील शिस्त, तेथील प्रशिक्षण, वरिष्ठांच्या आज्ञा मान्य असोत वा अमान्य; त्यांचे पालन करण्याची अनिवार्य सक्ती आणि तत्सम अनेक बाबी लक्षात घेता

Unclean cows | पवित्र गायीचे अपावित्र्य

पवित्र गायीचे अपावित्र्य

Next

गणवेषधारी संघटनेतील शिस्त, तेथील प्रशिक्षण, वरिष्ठांच्या आज्ञा मान्य असोत वा अमान्य; त्यांचे पालन करण्याची अनिवार्य सक्ती आणि तत्सम अनेक बाबी लक्षात घेता सीमा सुरक्षा दलातील जवान तेजबहादूर यादव निश्चितच दोषी ठरविला जाऊ शकतो आणि त्याचे ‘कोर्ट मार्शल’देखील (लष्करी न्यायालयातील खटला) होऊ शकते. पण त्याने हिंमत करुन वा वेडेपणा करुन तो ज्या संघटनेत सध्या कार्यरत आहे, त्या संघटनेतील गैरव्यवहारांना जे तोंड फोडले आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन कसे चालेल? या तेजबहादूर यादवने त्याच्यासारख्या जवानांना जे कदान्न आणि तेदेखील अत्यंत अपुऱ्या मात्रेत दिले जाते, त्याचे चित्रण करुन ती चित्रफीत समााजिक माध्यमांमधून प्रसृत करतानाच जवानांना पहाटेपासून सायंकाळपर्यंत ताबडून घेतले जाते पण हाडांचाही बर्फ करु शकणाऱ्या सीमेवरील थंडीत त्यांची कशी हेळसांड केली जाते, याचे यथास्थित वर्णन अन्य ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून केले आहे. अर्थात त्याचे हे कृत्य निश्चितच जसे वेडाचारात मोडणारे नाही, तसेच ते त्याचे एकट्याचे कामही दिसत नाही. याचे साधे आणि महत्वाचे कारण म्हणजे त्याने अत्यंत हुशारीने सीमेवरील जवानांच्या दुरवस्थेबद्दल सरकारला नव्हे तर दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोषी ठरविले आहे. तसे करताना सरकार जवानांसाठी खूप काही करते आहे पण अधिकारी ते आमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत असे पुन:पुन्हा सांगत त्याने अधिकाऱ्यांचा रोष पत्करतानाच सरकारचा मात्र एकप्रकारे अनुनय केला आहे. कदाचित त्यामुळेच यादवच्या संबंधित कथनावर केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी बरीचशी सहानुभूतीची आणि काहीशी बचावाची तर सीमा सुरक्षा दलाच्या महानिरीक्षकांनी अत्यंत कठोर भूमिका स्वीकारली आहे. जवानांना दिल्या जाणाऱ्या भोजनात काही दोष असू शकतात पण त्याने ते तक्रार निवारण यंत्रणेच्या पुढ्यात मांडावयास हवे होते असे विधान करताना, खरे तर सहा वर्षांपूर्वीच यादवचे कोर्ट मार्शल होणार होते परंतु त्याच्या कुटुंबाकडे पाहून त्याची हकालपट्टी टाळली गेली असे महानिरीक्षक उपाध्याय यांनी म्हटले आहे. ज्या अर्थी कोर्ट मार्शलपर्यंत पाळी गेली होती त्याअर्थी त्याच्या हातून तसाच गंभीर गुन्हा घडला होता. परंतु तसे असताना केवळ कुटुंबाकडे बघून एका बेशिस्त जवानास देशसेवेत कायम ठेवले गेले याची कबुली महानिरीक्षकांनी आपल्या वक्तव्याद्वारे दिल्याचे येथे लक्षात घ्यायचे. यादवने जे काही चित्र जनतेसमोर आणले आहे, ते दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केलेल्या एका विधानाची आठवण करुन देणारे आहे. देशातील लोकांच्या कल्याणासाठी राजधानी दिल्लीतून निघालेला बंदा रुपया संबंधितांपर्यंत पोहोचता होईपर्यंत त्याचे जेमतेम अठरा पैसे होतात असे राजीव गांधी म्हणाले होते. यादवचे म्हणणे किंवा त्याची तक्रार याच स्वरुपाची आहे. परंतु केवळ तितकेच नव्हे तर देशात ज्या दोन अत्यंत पवित्र गायी (सॅक्रेड काऊज) मानल्या जातात त्यातील लष्कर किती अपवित्र आहे यावरदेखील त्याने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. अर्थात अगदी अलीकडेच देशाच्या हवाई दलाचे माजी प्रमुख शशीन्द्रपाल त्यागी यांना देशातील अति महत्वाच्या लोकांसाठी खरेदी करावयाच्या हेलिकॉप्टर्स प्रकरणात लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली अटक झाल्याचे उदाहरण ताजे असताना त्यांच्या तुलनेत निम्न स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांविषयी आणि त्यांच्या सचोटीविषयी कोणी डोळे झाकून बोलू शकेल अशी स्थिती नाही. अर्थात देशाच्या संरक्षक दलांमधील भ्रष्टाचाराची आणखीही अनेक प्रकरणे याआधी उघड झाली असून लष्करात भरती होणारे लोकदेखील समाजातूनच येतात आणि समाजाचे गुणदोष त्यांनाही चिकटलेले असतात, असे त्याचे समर्थनही वेळोवेळी केले गेले होते. देशातील दुसरी पवित्र गाय म्हणजे न्यायव्यवस्था. या व्यवस्थेतील भ्रष्टाचार तर शुक्लेंदुवत वाढत चालला आहे. परंतु दोहोंच्या बाबतीत जनसामान्यांची मुस्कटदाबी. न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवावा तर न्यायसंस्थेचा अवमान झाला म्हणून शिक्षेला सामोरे जावे लागणार आणि लष्करातील भ्रष्टाचारावर बोलावे तर बोलणाऱ्या थेट देशद्रोही समजले जाणार. साहजिकच तेजबहादूर यादवच्या बाबतीत फार काही वेगळे होईल असे समजण्याचे कारण नाही. सामाजिक माध्यमांद्वारे तो मुख्य प्रवाहातील माध्यमांपर्यंत पोहोचता झाला असल्याने सीमा सुरक्षा दल काय किंवा सरकार काय, त्याच्या विरोधात लगेचच थेट कारवाई करणार नाही, पण त्याच्यावर पश्चात्ताप करण्याची पाळी नक्कीच आणली जाईल. कारण तो जे काही बोलला, ते खरे असेलही कदाचित पण ते बरे नाही आणि नव्हते, हेही तितकेच खरे. पण मुद्दा केवळ या यादवाचा नाही. ‘जरा याद करो कुर्बानी’मागील समाजाच्या दांभिकतेवरदेखील यात अप्रत्यक्ष कोरडे आहेत.

Web Title: Unclean cows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.