‘इनकमींग’पायी सेनेत अस्वस्थता
By admin | Published: April 2, 2016 03:51 AM2016-04-02T03:51:46+5:302016-04-02T03:51:46+5:30
‘भाजपा’ला शह देण्याच्या नादात शिवसेनेतील भरतीप्रक्रियेने वेग घेतला असला तरी, त्यातून उफाळून येणारी पक्षांतर्गत नाराजीच आता त्या पक्षासाठी डोकेदुखी ठरू पाहाते आहे.
- किरण अग्रवाल
‘भाजपा’ला शह देण्याच्या नादात शिवसेनेतील भरतीप्रक्रियेने वेग घेतला असला तरी, त्यातून उफाळून येणारी पक्षांतर्गत नाराजीच आता त्या पक्षासाठी डोकेदुखी ठरू पाहाते आहे.
शिवसेनेतील भरतीप्रक्रिया दिवसेंदिवस गतिमान होत असून, त्यामुळे त्या पक्षाचे बळ वाढत असल्याचा समज होणे स्वाभाविक आहे; परंतु एकीकडे ‘मातोश्री’वर शिवबंधन बांधणीचे सोहळे पार पडत असताना दुसरीकडे पक्ष नेत्याचे पुतळे जाळून या वाढत्या ‘इनकमिंग’बद्दलचा रोषही व्यक्त होत असल्याने तो शमवण्याचीच कसरत करणे या पक्षासाठी प्राथम्याचे ठरले आहे.
आणखी वर्षभरावर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवांगतुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले दरवाजे उघडे ठेवले असले तरी, शिवसेनेने त्यात अंमळ अधिकचीच आघाडी घेतली आहे. पक्ष विस्तार करून महापालिकेवर भगवा फडकवायचाच, असा निर्धार तर त्यामागे आहेच; शिवाय भाजपाला धडा शिकवण्याची ईर्षाही त्यामागे आहे. कारण, आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपला क्रमांक एकचा शत्रू मानणाऱ्या शिवसेनेला विद्यमान अवस्थेत भाजपा हीच प्रमुख विरोधक वाटू लागली आहे. नेहमी शिवसेनेच्या सोबतीने लढणाऱ्या भाजपाने गेल्या निवडणुकीत स्वबळ अजमावत, होत्या तितक्या सर्व जागा राखल्या. त्यानंतर ‘मनसे’शी हातमिळवणी करीत भाजपा पहिल्या अडीच वर्षाच्या काळात महापालिकेतील सत्तेतही सहभागी राहिली. तेव्हापासूनच भाजपा-शिवसेनेतील वितुष्ट मोठ्या प्रमाणात वाढीस लागले. त्यात केंद्र व राज्यातील सत्तेत सोबत राहूनही त्यांच्याकडील सूर जुळू न शकल्याचीही भर पडत गेली. परिणामी सरकारमधील भाजपाचे अपयश उजागर करून देण्याकरिता शिवसेनेतर्फे मोर्चा काढून त्यांच्याबद्दलची जनमानसातील नकारात्मकता वाढविण्याचा प्रयत्न केला गेला. इतकेच नव्हे तर आतापर्यंत अस्तित्वहीन राहिलेल्या व स्वपक्षीय राजकारणात अडगळीत पडलेल्या शिवसेनेतील उत्तर महाराष्ट्रप्रमुख महिला नेत्याने स्वतंत्र मराठवाडा व विदर्भाच्या मुद्द्यावरून नाशकातील भाजपाचा महिला मेळावा उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याचीही घटना घडली. या दोन्ही पक्षांतील संघर्ष किती टोकाला गेला आहे, हेच यावरून लक्षात यावे. शिवसेनेने चालविलेल्या भरतीप्रक्रियेला-देखील या संघर्षाचीच किनार आहे.
विशेष म्हणजे, आवड-निवडीची वा संबंधितांच्या प्रतिमेची कसलीही फिकीर न बाळगता शिवसेना-भाजपात आपापले बळ वाढवायचे प्रयत्न सुरू आहेत. यातही मध्यंतरी स्वाभिमान संघटनेचे रम्मी राजपूत आदि लोक भाजपात घेतले गेले, तद्नंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले सुनील बागुल व्हाया राष्ट्रवादी, भाजपात आले तसेच प्रामुख्याने भाजपाविरोधात लढून पराभूत झालेले वसंत गितेदेखील भाजपावासी झाले. त्यामुळे त्या पक्षातील निष्ठावंतांनाही ही ‘भरती’ पचनी न पडल्याचेच दिसून आले. शिवसेनेतही तेच होत आहे. ‘मनसे’चा कळस कापून आणल्याच्या अविर्भावात माजी महापौर अॅड. यतिन वाघ व अन्य काही जणांना शिवबंधन बांधले गेल्यावर त्याची प्रतिक्रिया पक्षात उमटली व अखेर निष्ठावंत वा जुन्या शिवसैनिकांवर अन्याय होणार नाही याची जाहीरपणे खात्री द्यावी लागली. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीतील मातब्बर नगरसेवक विनायक खैरे व ‘मनसे’तील नगरसेविका रत्नमाला राणे यांच्यासह विधानसभा निवडणुकीत शिवसेना सोडून गेलेल्या डी.जी. सूर्यवंशी यांना शिवसेनेत घेतले गेले. यातील खैरेंमुळे जुन्या नाशकात पक्षाची ताकद वाढण्याचे अंदाज बांधले जात असले तरी, सूर्यवंशी यांच्या स्वगृही परतण्याने सिडकोत शिवसेनेच्या संपर्कप्रमुखाचा प्रतीकात्मक पुतळा जाळून नाराजी दर्शविली गेली आहे. सर्वात पुढे राहण्याच्या प्रयत्नाला नख लावणाराच हा प्रकार म्हटला पाहिजे. तेव्हा, ‘इनकमिंग’मुळे शिवसेनेचे बळ वाढणे अपेक्षित असताना जुन्या-निष्ठावंतांची संधी हिरावली जाण्याच्या भीतीतून नाराजी उफाळून येणार असेल तर काय मिळवले या भरतीतून, असा प्रश्न उपस्थित झाल्याखेरीज राहू नये !