आगामी निवडणुकीसाठी बिनविरोध परंपरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 04:16 AM2018-05-15T04:16:07+5:302018-05-15T04:16:07+5:30
कडेगाव-पलूस मतदारसंघातील राजकीय संघर्ष संपलेला नाही. डॉ. पतंगराव कदम यांनी केलेल्या कार्याचे वारसदार आता व्हावे लागेल, त्या उंचीवर पोहोचावे लागेल, तरच दोन्ही बाजूूने संघर्षासही पात्र ठरतील.
- वसंत भोसले
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव-पलूस विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि डॉ. कदम यांचे चिरंजीव युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना विधानसभेवर पाठवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, त्याप्रमाणे घडेल असे वाटत नव्हते. कारण या मतदारसंघाने डॉ. पतंगराव कदम यांच्या रूपाने गेली ३८ वर्षे संघर्ष पाहिला आहे. या संघर्षात अखेर पतंगराव कदम यांनी बाजी मारली होती, तरी तो सहजासहजी संपणारा नव्हता.
सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या मतदारसंघाचे पूर्वीचे नाव भिलवडी-वांगी असे होते. सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि खानापूर तालुक्यांचा पश्चिम भाग म्हणजे हा मतदारसंघ होता. तासगावचा भाग कृष्णा नदीच्या तीरावर पसरलेला, तर खानापूरचा भाग हा उंचावर आणि डोंगराळ तसेच दुष्काळी पट्ट्यात समाविष्ट असलेला. या दोन्ही भागाचे तालुके करण्यात आले. त्यातून कडेगाव आणि पलूस तालुके झाले. या मतदारसंघातून पतंगराव कदम यांनी १९८० पासून नऊवेळा निवडणुका लढविल्या. त्यामध्ये १९९७ च्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे. यापैकी पोटनिवडणुकीसह तीनवेळा ते पराभूत झाले आणि सहावेळा विजयी झाले. त्यांच्या परंपरागत विरोधात डाव्या विचारांचे क्रांतिअग्रणी जी.डी. बापू लाड होते. तत्पूर्वी काँग्रेसचेच संपतराव चव्हाण आमदार होते. त्यांच्या विरोधात पतंगरावांनी संघर्ष केला. जी. डी. लाड यांच्या विरोधात संघर्ष झाला. या दोघांच्या पराभवानंतर १९९५ मध्ये काँग्रेसमधील दुसऱ्या गटाचे प्रतिनिधित्व करणाºया संपतराव देशमुख यांचा गट तयार झाला. त्यांनी अपक्ष राहून १९९५ मध्ये पतंगराव यांचा पराभव केला. त्याला लाड गटाचा पाठिंबा राहिला. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा पराभव झाला. देशमुख यांचे चिरंजीव संग्रामसिंह देशमुख भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत.
अशा पार्श्वभूमीवर पतंगराव कदम यांच्या निधनानंतर लगेच संघर्ष होणे उचित नव्हते. उलट सहानुभूतीचा लाभ विश्वजित कदम यांना झाला असता. कारण या मतदारसंघातील संघर्षात ते अखेर अपराजित राहिले. शिवाय विद्यमान विधानसभेची मुदत सव्वा वर्षाची राहिली आहे. त्याऐवजी विरोधासाठी विरोध न करता बिनविरोधाची पद्धत पाडून सहानुभूतीला विराम देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. संपतराव देशमुख यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत हे घडले नाही; पण आम्ही नवा पायंडा पाडत आहोत असे सांगून पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट करणारा तो एक इशाराही म्हणावा लागेल. विजयाची खात्री कमी, सहानुभूतीचा लाभ आणि बिनविरोध निवडणूक करून एक नवी सहानुभूती अशा त्रिसूत्रीतून ही प्रक्रिया पार पडली आहे. याचा अर्थ कडेगाव-पलूस मतदारसंघातील राजकीय संघर्ष संपलेला नाही. डॉ. पतंगराव कदम यांनी केलेल्या कार्याचे वारसदार आता व्हावे लागेल, त्या उंचीवर पोहोचावे लागेल, तरच दोन्ही बाजूूने संघर्षासही पात्र ठरतील. विश्वजित कदम यांना संधी आहे आणि विरोधी राजकारण करणाºयांनाही आता सत्तारूढ म्हणून गती मिळाली आहे. त्यातच आगामी निवडणुकीची पेरणी होणार आहे.
आमदार विश्वजित कदम यांच्यावर दोन प्रकारचा दबाव असणार आहे. एक त्यांच्या पिताश्रींच्या कामाशी सतत तुलना होणार आणि अपेक्षाही तशीच राहणार आहे. दुसरी बाजू विरोधक जिल्हा, राज्यात आणि केंद्रातही सत्ताधारी आहेत, त्यांच्याशी संघर्षाची तयारी करावी लागेल. हे दबाव समर्थपणे पेलून पित्याचा राजकीय वारसा टिकविण्याचे आव्हान आता त्यांच्यापुढे आहे.