गुन्हेगारीचे सार्वत्रिकीकरण अधोरेखित...
By किरण अग्रवाल | Published: September 23, 2021 11:00 AM2021-09-23T11:00:59+5:302021-09-23T11:01:13+5:30
Underlining the universality of crime : महंत नरेंद्र गिरी यांचेच शिष्य महंत आनंद गिरी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, अनेकविध चर्चांना आता तोंड फुटले आहे.
- किरण अग्रवाल
धार्मिक व अध्यात्माच्या क्षेत्रातील व्यक्तींकडे प्रेरणेचे स्रोत म्हणून आदराने पाहिले जाते; परंतु अशा व्यक्तीबद्दलही जेव्हा अनपेक्षित घटना घडून जातात तेव्हा श्रद्धांना धक्के बसून गेल्याखेरीज राहत नाही. विशेषतः या क्षेत्रातील मान्यवरांनाही गुन्हेगारीचे किटाळ लागुन जाते तेव्हा तर या धक्क्यांची तीव्रता अधिकच बोचल्याखेरीज राहात नाही. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा हरिद्वारमध्ये झालेला संशयास्पद मृत्यूही असाच धक्का देऊन जाणारा म्हणता यावा.
साधू संन्याशी संप्रदायाचे नेतृत्व करून त्र्यंबकेश्वर, प्रयागराज, हरिद्वार आदी ठिकाणचे कुंभमेळे यशस्वी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या निरंजनी आखाड्याचे महंत नरेंद्र गिरी यांच्या प्रयागराजमधील वाघम्बरी मठात संशयास्पद मृत्यूच्या घटनेने केवळ साधू समाजच नव्हे तर धर्म व अध्यात्मात श्रद्धा ठेवणारा सामान्य भाविकही हादरून गेला आहे. याप्रकरणी महंत नरेंद्र गिरी यांचेच शिष्य महंत आनंद गिरी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, अनेकविध चर्चांना आता तोंड फुटले आहे. भाविकांना मनोबल उंचावण्याचा उपदेश देणारे महंत स्वतः आत्महत्या कशी करू शकतात व भलीमोठी सुसाईड नोट कशी लिहू शकतात, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून, संशयाचे मळभ दाटून आले आहे. पोलीस तपासात याबद्दलचा काय तो उलगडा यथावकाश होईलच; परंतु या घटनेमुळे सर्वसंगपरित्यागाच्या भूमिकेतून वावरणाऱ्या संन्याशांच्या जीवनाची अखेरही संशयास्पद व वादग्रस्त ठरून गेल्याचे पाहता गुन्हेगारीचे सार्वत्रिकीकरण उघड होऊन जावे.
तसे पाहता गुन्हेगारी सर्वत्रच वाढली आहे. राजकारणातील वाढत्या गुन्हेगारीकरणाची चर्चा नेहमी घडून येते, तशी ती अध्यात्माच्या क्षेत्रातही वाढीस लागल्याने भाबड्या भक्तांच्या श्रद्धांना धक्का बसणे स्वाभाविक ठरले आहे. खरे तर डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम तसेच रामपाल व आसाराम बापू आदी बुवा बापूंना तुरुंगात जावे लागले. तेव्हाही श्रद्धांना मोठ्या प्रमाणात धक्के बसून गेले होते. पूर्वी समाजात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा व्याप्त होती, त्यामुळे समाजमनात श्रद्धेचे स्थान मिळवून असलेल्या काही जणांचे प्रताप उघड होऊनही सार्वत्रिक पातळीवर त्याबद्दलच्या निषेधाचे तितकेसे सूर उमटू शकत नव्हते. समाज जागृत झाल्यावर श्रद्धेआड चालणाऱ्या भोंदूपणाची चिकित्सा होऊ लागल्याने घडल्या वा उघड झालेल्या प्रकारांची चर्चा होऊ लागली. बरे, यात साध्या फसवणुकीपासून जमीन जुमला हडपण्यापर्यंतची व त्याहीपुढे जाऊन काही जणांकडून भक्त भगिनींच्या अब्रूशी खेळण्याचे प्रकारही पुढे आल्याने बुवाबाजी अधोरेखित होऊन गेली.
महंत नरेंद्र गिरी बुवाबाजीतले नव्हते, उलट अनाचारी व चुकीच्या मार्गावर असणाऱ्या बुवा बापूंबद्दल त्यांनी वेळोवेळी परखडपणे भूमिका घेतलेली दिसून आली. मुठभर चुकीच्या लोकांमुळे समस्त साधू समाजाची प्रतिमा डागाळते, याबद्दल ते नेहमी खेद व्यक्त करीत. त्यांना जाणून असणारे सारेच त्यांच्या धर्म कार्याबद्दल व सिंहस्थ कुंभमेळ्यातील सर्व प्रवाहांना एकत्र घेऊन जाण्याच्या सामोपचारी भुमिकांबद्दल भरभरून व आदरानेच बोलताना आढळतात. अशा कुणाशीही कसलाही वैर नसलेल्या महंतांचाही अखेरचा प्रवास संशयास्पद ठरावा हे दुर्दैवी असून, या घटनेमागील कारणांना लाभलेला कथित गुन्हेगारीचा दर्प श्रद्धाळूंना अस्वस्थ करून जाणे स्वाभाविक आहे.