शेजाऱ्यांना आणि मित्रांना समजून घेताना
By admin | Published: June 7, 2016 07:43 AM2016-06-07T07:43:08+5:302016-06-07T07:43:08+5:30
पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना मी अनेकदा भेटून त्यांच्याशी संवादही साधला आहे.
पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना मी अनेकदा भेटून त्यांच्याशी संवादही साधला आहे. ते अत्यंत व्यावहारिक मुत्सद्दी असून जितके मैत्रीपूर्ण आहेत तितकेच स्वत:चे विचार गळी उतरविण्यात वाकब्गार आहेत. पाकिस्तानच्या सांसदीय विकास व पारदर्शिकतेच्या संस्थेच्या प्रतिनिधींसोबत भोजन घेत असताना लोकमतच्या नॉलेज सिरीजसाठी त्यांनी नागपूरला यावे अशी कल्पना मी बोलून दाखवली असता बासितसाहेबांनी माझी कल्पना तत्काळ उचलून धरली. पण निश्चित अभिवचन देण्याबाबत सावधगिरी बाळगली कारण त्यांच्या भारतातील कोणत्याही कार्यक्रमाला भारत सरकारची परवानगी आवश्यक असते.
योगायोग असा की त्यांच्या नागपूर भेटीच्या काळातच मला उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांच्या मोरोक्को आणि ट्युनिशियाच्या पाच दिवसाच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत जाणाऱ्या प्रतिनिधी मंडळात सामील व्हावे लागले. त्यामुळे बासित यांच्या नागपूर भेटीच्या दरम्यान मी नागपुरात राहू शकलो नाही. पण आधुनिक दूरसंचार व्यवस्थेचा उपयोग करून मी त्यांच्या नागपूर दौऱ्यावर लक्ष ठेवू शकलो आणि त्याविषयी सतत माहितीही मिळवू शकलो.
एकूणच बासितसाहेबांचा नागपूर दौरा व या दौऱ्यातील लोकमत नॉलेज फोरमला उपस्थित निवडक मान्यवरांसोबत त्यांचा झालेला संवाद कमालीचा यशस्वी ठरला. चर्चासत्रात सहभागी झालेले माजी राजदूत विवेक काटजू, भाजपाच्या परराष्ट्र सेलचे प्रमुख शेषाद्री चारी, काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियन्का चतुर्वेदी, पत्रकार जतिन देसाई यांचे विचार व लोकमतचे राष्ट्रीय संपादक हरिष गुप्ता यांनी केलेले उत्तम संयोजन उपस्थितांच्या पसंतीस उतरले.
भारत-पाक दरम्यानचे संबंध आणि त्यांच्यातील वादांचे स्वरूप किती जटील आहे याची मला जाणीव आहे. दोहोतील संघर्षाचा इतिहास बघता, त्यातील प्रश्नांची सोडवणूक सहजसाध्य नाही. पण उच्चायुक्त बासित यांच्या शांततेच्या संदेशामुळे त्याविषयीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाच पावले पुढे आणि दहा पावले मागे, या पद्धतीच्या भारत-पाक संबंधाच्या स्वरूपात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे. स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रे या नात्याने ते स्वत:चे वेगळे राष्ट्रीय हित जोपासू शकतात. पण त्यांनी सतत संघर्षाची भूमिका घेण्याची आणि मित्र म्हणून न नांदण्याची गरज नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यात हा बदल घडवून आणण्याची इच्छाशक्ती नक्की आहे असे मला वाटते.
मोरोक्को-ट्युनिशिया दौरा
जागतिकीकरणाच्या काळात आपण एकटे नांदू शकत नसल्याने दूरच्या प्रदेशात असलेल्या आपल्या मित्रांसोबत आपण संवाद साधायला हवा. भारताचे उप-राष्ट्रपती हमिद अन्सारी यांच्या नेतृत्वात जे शिष्टमंडळ मोरोक्को आणि ट्युनिशियाला गेले, त्यांचा हा दौरा मित्रत्वाचा होता. ती दोन राष्ट्रांची मघरेब आणि मशरीक यांची, तसेच पूर्व आणि पश्चिम यांची भेट होती. मोरोक्को हे इस्लामी राष्ट्र असून उत्तर आफ्रिकेतील ‘पाश्चात्य राष्ट्र’ अशी त्याची ओळख आहे. त्यांची संस्कृती अत्यंत जुनी असून १७७७ मध्ये अमेरिकेचे स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्य करणारे ते पहिले राष्ट्र होते. अर्थात त्याही राष्ट्राला वसाहतवादाला तोंड द्यावे लागले होते आणि महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील आपल्या स्वतंत्र्य लढ्यापासून प्रेरणा घेऊन त्या राष्ट्रानेही स्वातंत्र्यासाठी लढा दिला होता. मोरोक्कोच्या प्रशासकीय पद्धतीचे वेगळेपण हे आहे की तेथे संसद निर्वाचित असून सोबत घटनात्मक राजसत्ताक राज्य व्यवस्था सुद्धा आहे. तेथील सध्याचे राजे सहावे महंमद हे आधुनिक विचारांचे असून त्यांनी आर्थिक आणि सामाजिक सुधारणा अंमलात आणल्या आणि त्यासुद्धा अरबीचा विरोध होत असताना! सुधारित घटनेच्या मुद्यावर विरोधकांची समजूत घालण्यासाठी घेण्यात आलेल्या जनमत चाचण्यात त्यांना अभूतपूर्व यश मिळाले होते. ते देशात यावेळी हजर नसतानाही भारतीय प्रतिनिधी मंडळाचे ज्या आत्मीयतेने त्यांच्या राजेशाही लवाजम्याने आतिथ्य केले, त्यामुळे भारत-मोरोक्को संबंधातील आत्मीय संवाद दिसून आला.
रबात येथील ‘पाचवे महंमद विद्यापीठात’ भाषण करताना उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी मुस्लीम विचारांना मजबूत करण्यासाठी बिगर अरब मुस्लीमांनी दिलेल्या योगदानाबद्दल आपले विचार मांडले. आधुनिक काळात विविधतेचे आव्हान स्वीकारण्यास आपण सज्ज असायला हवे आणि ते स्वीकारण्यासाठी नवे मार्ग व पद्धतीचा शोध घेतला पाहिजे, ही भूमिका स्वीकारताना सहिष्णुतेची परंपरागत मूल्ये जपायला हवी असली तरी ती पुरेशी ठरणार नाहीत. आपण विविधतेचा स्वीकार ‘नागरिकत्वाची मूल्ये म्हणून करायला हवा’, असेही ते म्हणाले.
मोरोक्कोतील जनतेला इस्लामचा स्वीकार करीत असतानाच बॉलीवुडच्या अभिनेत्यांविषयी आणि चित्रपटांविषयी आत्मियता बाळगण्यात आपण काही वेगळे करीत आहोत असे वाटत नव्हते, यातच त्यांनी विविधता स्वीकारल्याचे दर्शन घडत होते. इस्लामचा स्वीकार करताना आधुनिकता स्वीकारण्यात त्यांना अडचण वाटत नव्हती. पाकिस्तानविषयी नागपुरात विचार मांडताना बासितसाहेबांनी याच प्रकारचे मत मांडले हा योगायोगच म्हणावा लागेल.
ट्युनिशिया हेही उत्तर आफ्रिकेतील इस्लाम बहुल राष्ट्र आहे. लिबिया आणि अल्जेरियाच्या सीमा त्या राष्ट्राला लागून आहेत. अरबांच्या जागरुकतेनंतर लोकशाहीची स्थापना पहिल्यांदा या राष्ट्रात झाली. महिलांना प्रतिनिधित्व देण्याच्या बाबतीत ते आपल्यापुढे आहेत. २०११ पासून तेथील संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व २४ ते ३१ टक्के इतके राहिले आहे. लिंग समानतेबाबत तेथील कायदे संपूर्ण मुस्लिम जगतात अधिक उदार आहेत.
मोरोक्को आणि ट्युनिशिया यांच्यासोबत आपले व्यापार आणि राजकीय संबंध चांगले आहेत. आपल्या कृषी क्षेत्राची गरज भागविण्यासाठी आपण या राष्ट्रातून फॉस्फेटची आयात करीत असतो. पण आता टाटा, महिन्द्र आणि डाबर यासारख्या कंपन्यांनी या भागात रुची घ्यायला सुरुवात केली आहे. विशेषत: आरोग्याच्या क्षेत्रात डॉक्टरांना आणि फार्मा कंपन्यांना येथे भरपूर संधी आहे. अर्थात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण त्यांना सहकार्य करावे असे या राष्ट्रांना वाटते. शेजारी असलेल्या लिबियाचे प्रमुख महंमद गडाफी असताना पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ट्युनेशियाशी असलेले चांगले संबंध येथील लोकांच्या आठवणीत आहेत. पण या दोन देशाच्या दौऱ्यात उपराष्ट्रपती हमिद अन्सारी आणि त्यांच्या पत्नी सलमा यांच्या व्यक्तिमत्वाचे ‘चांगले प्रवासी सोबती’ म्हणून वेगळेच दर्शन घडले, ते या दौऱ्याचे विशेष होते.
हे लिखाण संपविण्यापूर्वी :
महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेला राजीनामा ही या राज्यातील महत्वाची घटना आहे. आपले मंत्रीही भ्रष्ट असू शकतात, ही वस्तुस्थिती भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने स्वीकारली आहे. भ्रष्टाचार विरोधाच्या मुद्यावर सत्तेत आलेल्या पक्षाने उचललेले हे महत्वाचे पाऊल आहे. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही असे म्हटल्याने व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट होत नाही. खडसे प्रकरणाने या रोगाचे स्वरूप आणि आपली व्यवस्था किती खोलवर किडलेली आहे हे लक्षात येते.
-विजय दर्डा
(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)