समजून उमजून संथारा : सल्लेखणा

By admin | Published: August 29, 2015 02:18 AM2015-08-29T02:18:41+5:302015-08-29T02:18:41+5:30

राजस्थान उच्च न्यायालयाने जैन धर्मातील संथारा या साधनेच्या अतिउच्च वृत्तीस बेकायदेशीर ठरवल्याची चर्चा सध्या देशात चालू आहे. लोकशाही मार्गाने अर्थात शांतीपूर्ण पद्धतीने त्याचा विरोधही होत आहे.

Understanding Understanding: Blog Archive | समजून उमजून संथारा : सल्लेखणा

समजून उमजून संथारा : सल्लेखणा

Next

- डॉ. सुगन बरंठ
(अध्यक्ष, अ.भा.नई तालीम समिती)

राजस्थान उच्च न्यायालयाने जैन धर्मातील संथारा या साधनेच्या अतिउच्च वृत्तीस बेकायदेशीर ठरवल्याची चर्चा सध्या देशात चालू आहे. लोकशाही मार्गाने अर्थात शांतीपूर्ण पद्धतीने त्याचा विरोधही होत आहे. नि:संदेह देहधर्म आटोपता घेणे हा पुरुषार्थ आहे आणि आत्महत्त्या हे बहुतांश वेळा जीवन हरलेल्या माणसाने जीवन संपवण्याची कृती आहे. परंतु संथारा व्रताचे ऐतिहासिक सत्य समजून घेणे गरजेचे आहे.
महावीरानंतर सातशे वर्षांनी इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात झालेल्या आचार्य उमास्वाती रचित ‘तत्वार्थ सूत्र’ ग्रंथात याचे विवेचन केले आहे.
मरणान्तिकीं सल्लेखना जोषिता।।
(मृत्यू समीप असताना जागृतावस्थेत सल्लेखणा-संथाराचा आश्रय घ्यायला हवा)
अशीच गोष्ट, १२ व्या शताब्दीत होऊन गेलेल्या आचार्य अमृतचंद्र यांनी त्यांच्या प्रसिद्ध ‘पुरुषार्थ सिद्धियूपाय’ नामक ग्रंथात सल्लेखणा आणि आत्मघात किंवा आत्महत्त्या या दोघातील भेद स्पष्ट केला आहे. फक्त २२५ श्लोकांच्या या लहानशा ग्रंथातील ११७ व्या श्लोकात ते म्हणतात,
मरणेअवश्यंभाविनि कषायसल्लेखनातनुकरणमात्रे ।
रागादिमन्तरेण व्याप्रियमाणस्य नात्मघातोअिस्त ।।
(जेव्हा मरण अवश्यंभावी असेल, शरीर जीर्ण, क्षीण होत असेल, तेव्हा कुठल्याही राग-द्वेषा शिवाय स्वस्थतापूर्वक आणि तटस्थभावे तपश्चर्या करून उरलेले दोष समूळ नष्ट करणे ही सल्लेखणा होय. आत्महत्त्या नव्हे.)
आचार्य अमृत चंद्रांच्या ग्रंथात हिंसा-अहिंसेची विस्तृत चर्चा करण्यात आली असून, त्यात पुढे १७८ व्या श्लोकात म्हटले आहे की आवेग आणि वृत्ती या हिंसाच आहेत आणि सल्लेखणा किंवा संथारा यात त्यांना उखडून फेकण्याची तपश्चर्या ही माणसाची अहिंसेच्या दृष्टीने पुढील पायरी आहे. आज या आचार्यांना एका विशिष्ट संप्रदायांचे समजले जाईल किंवा हा फार जुना संदर्भ आहे असे ही आपण म्हणू शकू. परंतु अहिंसेचे सूक्ष्म उपासक विनोबा भावेंच्या आग्रहावरून देशातील सर्व जैन संप्रदायांचे सर्व जैन आचार्य (दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, मंदीरमार्गी, तेरा पंथी आदि ) डिसेंबर १९७४ मध्ये एकत्र आले आणि सर्वांनी जैनांच्या ३२ (किंवा अधिकही) आगम (ग्रंथ)च्या हजारो गाथा (श्लोकां)मधून ७५६ सर्वमान्य अशा गाथा निवडून त्याचा ग्रंथ प्रकाशित केला, ‘समण सूत्तम’. याचा इतिहास सांगण्याचे हे स्थान नव्हे. परंतु या सर्वमान्य ग्रंथात गाथा ५६७ ते ५८७मध्ये या विषयाची सर्व सखोल चर्चा केलेली आढळते.
हे सर्व येथे विस्ताराने सांगण्याचे कारण जैनेतर वाचकांनी (आणि आता तर जैनांनीही) संथाराचा गर्भित आणि सखोल अर्थ समजून घ्यावा.
सर्व वेद वेदान्त, उपनिषधे, कुराण, बायबल, धम्मपद, जपूजी आणि जगाच्या इतरही सर्व ग्रंथांचा ज्यांचा सूक्ष्म अभ्यास होता, चिंतन होते, ज्यांनी जगातील सर्व तत्वज्ञाने पचवली होती, ज्यांना २२-२३ भाषा लिहिता वाचता येत होत्या, जे कालपर्यंत आपल्यात होते त्या विनोबा भावेंनी संथाराचा खरा अर्थ जाणला होता आणि संथारा घेतलाही होता.
न्यायालयाने जी काही चुकीची निरीक्षणे मांडली त्यात असे म्हटले आहे की संथारा हे काही जैन धर्माचे अनिवार्य अंग नव्हे. धर्माच्या अनिवार्य अंगाची व्याख्या कशी करावी? भारतात एका ग्रंथाच्या आधारे धर्मातील अनिवार्यता सिद्ध करता येणार नाही. यास्तव प्राचीनता हाच एकमेव आधार असू शकतो. मग वरील विवेचनातील प्राचीनता कमी लेखावी काय ?
दुसरा मुद्दा असा की पश्चिमेकडील एक ग्रंथीय (रिलीजन आॅफ बुक) धर्मासारखी भारतातील धर्मांची पद्धत नाही. तिसरा मुद्दा असा की जर कुठली धार्मिक प्रवृत्ती त्या धर्माचे अनिवार्य अंग मानले जात असेल आणि ते अमानवीय असेल तर ते अनिवार्य म्हणून त्याला मान्यता देता येईल? उदा. अस्पृश्यता शास्त्रमान्य आहे तर ती घटना (संविधान) मान्य ठेवावी? एके काळी सनातनी लोक चातुर्वण्यास हिंदू धर्माचे अनिवार्य अंग मानीत असत. पण घटनाकारांनी त्यास गुन्हा ठरविला. एखाद्या धर्माच्या अनिवार्य अंगास, तो अमानवीय म्हणून गुन्हा मानण्याची क्षमता राखणारा हा महान देश. या मुळे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी संथाराची कायदेशीर बाजू तपासताना धर्माचा आधार घेण्याची आवश्यकता नव्हती, आणि जरुरी होती तर त्याचा सार समजून घ्यायला हवा होता.
जर कोण्या स्त्रीला पती मागे सती जाण्याची प्रेरणा देणे किंवा सती होऊ देणे गुन्हा आहे तर संथारा व्रतास मान्यता कशी द्यावी? संथारा ही आत्महत्त्या आहे आणि त्यास प्रेरक ठरणारे किंवा मदत (अबेटमेंट आॅफ सुइसाइड) करणारे ही गुन्ह्यास पात्र आहेत, असे स्पष्टीकरण देणारे हे विसरतात की सल्लेखणा हे देहविसर्जन आहे आणि देहविसर्जन करण्याचा निर्णय वर सांगितल्यानुसार जेव्हा मृत्यू अवश्यंभावी असेल, समीप असेल, चित्त राग आणि द्वेषमुक्त असेल, आंतरिक वृत्ती स्वस्थ्य आणि तटस्थ असतील तेव्हा घेण्यात येतो. हा निर्णय साधकाचा असतो, तो जीवन हरलेल्या माणसाचा लपून छपून केलेला प्रयत्न नसतो.
पंडित सुखलाल यांनी अतिशय सुंदर उदाहरण दिले आहे. आपल्या घरास जेव्हा आग लागलेली असेल तेव्हा आपण त्यास वाचवण्याचे सर्व प्रयत्न करतो. परंतु जेव्हा हे लक्षात येते की आता घर वाचवणे शक्य नाही तेव्हा आपले प्रिय घर सोडून आपण स्वत:ला वाचवतो. त्याच प्रमाणे अंतरात्म्यास जेव्हा खात्री होते की शरीररूपी घर आता कुठल्याच प्रयत्नाने वाचवणे शक्य नाही तेव्हा विवेकपूर्वक ते घर तपश्चर्येने सोडून देण्याच्या वृत्तीस आपण रणछोडही नाही म्हणू शकत आणि ती हिंसाही नव्हे.
(संदर्भ : रमेश ओझा लिखित ‘कारण तारण’ (गुजराती), समण सूत्तम (हिन्दी)

Web Title: Understanding Understanding: Blog Archive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.