पराधीन आहे जगती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 03:17 AM2017-11-11T03:17:58+5:302017-11-11T03:18:02+5:30
लहानपणी ‘हिरो’ वाटणारा बाप मुलाला किशोरावस्थेत येताच ‘व्हिलन’ वाटायला लागतो. त्याचे मार्गदर्शन मग ‘प्रवचन’ वाटायला लागते आणि येथूनच निर्माण झालेली दरी मग या थराला येऊन पोहोचते.
लहानपणी ‘हिरो’ वाटणारा बाप मुलाला किशोरावस्थेत येताच ‘व्हिलन’ वाटायला लागतो. त्याचे मार्गदर्शन मग ‘प्रवचन’ वाटायला लागते आणि येथूनच निर्माण झालेली दरी मग या थराला येऊन पोहोचते. असं म्हणतात, रक्ताची नाती घट्ट असतात; पण आई-वडिलांना वाळीत टाकण्याच्या घटनांचा वाढत चाललेला आलेख या नात्यालाच संपुष्टात आणू पाहात आहे.
वडिलांच्या मृत्यूची बातमी दिल्याबद्दल धन्यवाद! पण सध्या माझ्याकडे वेळ नाही. तुम्हीच परस्पर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करा.. मला त्यांची संपत्तीही नको...’ या आशयाचा मेल पाठवून अमेरिकेत राहणारा केल्विन जन्मदात्या पित्यालाच नाकारतो तेव्हा रक्ताची नाती घट्ट असल्याची म्हण धादांत खोटी ठरते. परवा मुंबईत फ्रान्सिस झेवियर्स कुटिन्हो या वृद्धाचा एकांतवासात मृत्यू झाला. ज्या मुलाला जन्म दिला, शिकविले, त्याच्यासाठी अनेक रात्र जागून काढल्या त्याच मुलाने आपल्या अंत्यसंस्काराचा विधी एवढ्या निष्ठूरपणे नाकारावा, ही बाब या गंभीर घटनेमुळे सर्वांना अंतर्मुख करणारी आहे. विशेषत: माता-पिता आणि मुलांसाठी. मुलाला उच्च शिक्षण दिले. तो परदेशात गेला तेथेच स्थायिक झाला आणि जन्मदाता पित्याला विसरला. आईला मात्र त्याने अमेरिकेत बोलावून घेतले. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून एकांतवासाच्या काळोखात जीवन कंठत असलेल्या फ्रान्सिस यांनी कुटुंबाच्या विरहात जगाचा निरोप घेतला. समाजमन सुन्न करणाºया या घटनेचे विविध पैलू असू शकतात. कुटुंबातील कलह हेदेखील एक कारण असू शकते. परंतु कितीही मतभेद असले तरी कुणी जन्मदात्यांना अडगळीत टाकावे का, हा प्रश्न प्रत्येक मुलाने स्वत:ला विचारायला हवा. पुत्र प्राप्तीसाठी देवाला साकडे घालणारे, तो जन्मताच आनंदोत्सव साजरा करणारे, त्याच्या शिक्षणासाठी धडपड करणारे, प्रसंगी घर गहाण ठेवून त्याला परदेशात पाठविणारे आई-वडील जेव्हा एकांतवास भोगतात तेव्हा आपण केलेला त्याग व्यर्थ गेल्याची भावना त्यांच्या मनात घर करते; पण ते काही बोलत नाही. कुणाकडे तक्रारही करीत नाही. मुलगा, सून कशी आहे, विचारल्यावर त्यांच्याबद्दल चांगलेच सांगणाºया या जन्मदात्यांवर अखेर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येते.
म्हातारपणात आपला सांभाळ करण्याची अपेक्षा करणाºया अनेकांच्या वाट्याला एकांतवासाचे चटके येतात. बोलता, बोलता एक मित्र म्हणाला, मी पन्नाशी गाठली असली तरी आजही म्हाताºया बापाचा धाक वाटतो. त्यांच्या शब्दाबाहेर जाण्याची हिंमत होत नाही. अशीही मुलं आहेत समाजात ज्यांना आपल्या जन्मदात्याची कायम आदरयुक्त भीती असते. ती असायला हवी. कारण हीच आदरयुक्त भीती भावी पिढी घडविते. परंतु हल्ली याचे प्रमाण अत्यल्प आहे.
लहानपणी ‘हिरो’ वाटणारा बाप मुलाला किशोरावस्थेत येताच ‘व्हिलन’ वाटायला लागतो. त्याचे मार्गदर्शन मग ‘प्रवचन’ वाटायला लागते आणि येथूनच निर्माण झालेली दरी मग या थराला येऊन पोहोचते. असं म्हणतात, रक्ताची नाती घट्ट असतात; पण आई-वडिलांना वाळीत टाकण्याच्या घटनांचा वाढत चाललेला आलेख या नात्यालाच संपुष्टात आणू पाहात आहे. एकंदरीत सर्वांना अस्वस्थ करणारा हा विषय सामाजिक प्रश्नाची व्याप्ती वाढविणारा आहे. शत्रुच्याही अंत्ययात्रेला जाण्याची आपली संस्कृती आहे. मात्र मुंबईतील घटनेने ‘पराधीन आहे जगती...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.