निर्बुद्ध ट्विटरपणा
By Admin | Published: June 24, 2016 01:05 AM2016-06-24T01:05:27+5:302016-06-24T01:05:27+5:30
तंत्रज्ञान हे साधन असल्याने ते ज्याच्या हाती पडते, त्याच्या कुवतीवर ते कसे व कशासाठी वापरले जाईल, हे ठरत असते. पण ते वापरताना त्याला ज्ञानाचाही काही आधार असावा लागतो
तंत्रज्ञान हे साधन असल्याने ते ज्याच्या हाती पडते, त्याच्या कुवतीवर ते कसे व कशासाठी वापरले जाईल, हे ठरत असते. पण ते वापरताना त्याला ज्ञानाचाही काही आधार असावा लागतो, हे राजकीय पक्ष क्वचितच लक्षात घेतात. काँगे्रस पक्ष, सोनिया गांधी व राहूल गांधी यांच्यावर कायदेशीर कारवाईला तोंड देण्याची जी वेळ आली आहे, ती त्यामुळेच. शहीद भगतसिंह यांच्या हौतात्म्य दिनाच्या दिवशी २३ मार्चला जी भित्तीचित्रे लावण्यात आली होती, त्याचा आधार घेऊन काँगे्रसच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यातून मतप्रदर्शन करताना, भगतसिंह फासावर गेले, तर सावरकरांनी ब्रिटिशांकडे माफीची याचना केली, असे म्हणून, ते ‘देशद्रोही’ असल्याचे सूचित केले होते. आता तीन महिन्यांनी स्वातंत्र्यवीरांचे नात पुतणे रणजित सावरकर यांनी कायदेशीर नोटीस पाठवून काँगे्रस पक्ष, सोनिया गांधी व राहूल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. ही नोटीस १६ जूनला पाठविण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीरांच्या या नातेवाईकांस तीन महिन्यांनंतर सावरकरांच्या बदनामीची जाणीव होऊन अचानक कशी काय जाग आली, हा प्रश्न विचारला जाणे अगदी साहजिक आहे. उघडच आहे की, त्यामागे राजकीय हेतू आहे. पण मुद्दा तो नाही. काँगे्रस पक्षाच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यातून असा संदेश पाठवला कसा गेला, हाच खरा प्रश्न आहे. ज्याला कोणाला हे काम करण्याची जबाबदारी काँगे्रस पक्षाने सोपवली, त्याचे ज्ञान सोडाच, माहितीही किती तोकडी आहे, ते या संदेशावरून दिसते. किंबहुना ही व्यक्ती पूर्णपणे निर्बुद्धच आहे, असे म्हणणे भाग आहे. तसेच या व्यक्तीला अशा कामासाठी नेमणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच ठरेल. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदुत्वाच्या विचारांचा जो गजर करीत आहे, त्याचा पहिला उद्घोष केला, तो सावरकरांनीच. महात्मा गांधी यांचा खून करणारा नथुराम सावरकरांंनी स्थापन केलेल्या हिंदू महासभेशी संबंधित होता, हेही खरे. गांधीजींच्या खुनात हात असल्याचा आरोप सावरकरांवर होता आणि पुरेशा पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली, हेही ऐतिहासिक सत्य आहे. मात्र त्यांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी लावली जाते, ती अंदमानात त्यांना काळ्या पाण्याच्या ज्या दोन शिक्षा ठोठावल्या गेल्या, त्याआधीच्या क्रांतिकारकत्वाबद्दल. अंदमानच्या आधीचे व नंतरचे असे सावरकरांच्या कारकिर्दीचे दोन सरळ भाग पडतात. अंदमान आधीचे सावरकर हे ‘स्वातंत्र्यवीर’ होते आणि काळ्या पाण्यावरून परत आलेले सावरकर हे ‘हिंदुत्ववादी’ होते. पण स्वातंत्र्याच्या दुर्दम्य आकांक्षेतूनच ‘स्वातंत्र्यवीर’ ते ‘हिंदुत्ववादी’ हे सावरकरांचे वैचारिक परिवर्तन झाले होते, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. अंदमानच्या काळकोठडीत अमानुष अत्याचार भोगावे लागलेल्या सावरकरांची वाटचाल या वैचारिक परिवर्तनाकडे होत गेली, ती ‘भारत सतत पारतंत्र्यात का जात राहिला’ या प्रश्नाची उकल करण्याच्या ओघात. युरोपीय येण्याआधी भारतात मुस्लीम व इतर आक्रमक आले आणि त्यांना आपला समाज विरोध का करू शकला नाही, हा प्रश्न त्यांना पडत गेला. युरोपीय समाजाचा सांस्कृतिक व धार्मिक एकजिनसीपणा हे त्यांचे बलस्थान आहे, असे सावरकर यांना वाटू लागले. त्यांना ज्या आयरिश क्रांतिकारकांचे आकर्षण होते, त्यांच्या देशातही असा एकजिनसीपणा होता. शिवाय विज्ञानाच्या आधारे होत गेलेली प्रगती हाही मुद्दा होताच. भारतात बहुसंख्य हिंदू असूनही असा एकजिनसीपणा का नाही, या प्रश्नाचे उत्तर शोधताना, एकीकडे समाजाला विभागणारी जातिव्यवस्था आणि हिंदू धर्माची सर्वसमावेशकता या दोन मुद्यांपाशी सावरकर आले. त्यातूनच पुढची ‘कडवा हिंदू’ ही संकल्पना ‘हिंदुत्ववादा’च्या रूपाने साकारली आणि एकजिनसीपणाच्या आड येणाऱ्या जातिव्यवस्थेला असलेला त्यांचा विरोध आकाराला आला. पण आंतरजातीय विवाहाचे समर्थक सावरकर आंतरधर्मीय विवाहाचे विरोधक होते. देशाला शस्त्रास्त्रांच्या अंगाने ‘बलिष्ट’ करणारी आधुनिकता हवी, हा सावरकर यांचा आग्रह होता. ‘गाय’ या विषयावरचे त्यांचे विचार या ‘बलिष्ट’ भारताच्या संकल्पनेशी निगडीत होते. महात्माजींच्या खुनात हात असल्याचा आरोप झाल्याने सावरकरांची ही दोन रूपे त्यांच्या वैचारिक विरोधकांनी फारशी कधी लक्षातही घेतली नाहीत. त्यातच गेल्या काही दशकांत संघाचा वावर वाढत गेला, तसे त्यांनी ‘सावरकर’ याची प्रतिमा प्रचारासाठी वापरण्यास सुरूवात केली. सावरकर व संघ कधीच एकत्र येऊ शकले नाहीत, हेही ऐतिहासिक सत्य स्वातंत्र्यवीरांच्या विरोधकांनी लक्षात घेतले नाही. सावरकरांच्या भक्तांना तर स्वातंत्र्यवीरांची ही दोन रूपे आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला पडलेल्या मर्यादा मान्य होणे शक्यच नाही. साहजिकच सावरकर विरोधकांचा निर्बुद्धपणा आणि झाडपबंदपणा या ‘ट्विटर वादा’मुळे उघड झाला, इतकाच या वादंगाला मर्यादित अर्थ आहे.