डॉ. मंगला नारळीकरबाईंना अनावृत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 04:32 AM2019-07-05T04:32:36+5:302019-07-05T04:32:52+5:30

बाई, नातवंडांना गणितच काय, सर्व काही गाणी आणि गोष्टींमधून शिकविले की सोपे जाते, हे आजी-आजोबांना आधी कळते.

The unexplained letter to Dr. Mangala NaraliKar madam | डॉ. मंगला नारळीकरबाईंना अनावृत पत्र

डॉ. मंगला नारळीकरबाईंना अनावृत पत्र

Next

- डॉ. अंबुजा साळगावकर (संगणकशास्त्र प्रमुख)

दुसरीच्या पुस्तकात प्रस्तावित संख्यावाचनाची नवी पद्धत आम्हासारख्या अनेकांच्या पचनी पडली नसल्याने, त्यावर खूप गदारोळ सुरू आहे. बाई, तुमच्या मते तो गणिताच्या वाटेवरचे काटे, खडे बाजूला करण्याचा प्रयत्न आहे. असेल... म्हणजे तशी तुमची धारणा दिसते, पण या प्रयोगाने निर्माण झालेले नवे काटे नि धोंडे दूर केल्याशिवाय तो यशस्वी होणे कठीण आहे. हां, त्या धारणेने अभ्यास मंडळाने सुचविलेला एक कौतुकास्पद बदल म्हणजे गणित शिकविण्याचा प्रारंभ गाण्याने नि समारोप गोष्टीने. हे मस्त!

बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणालात, नातवंडांना गणित शिकणे सुलभ व्हावे, म्हणून प्रयोग केलेत. बाई, नातवंडांना गणितच काय, सर्व काही गाणी आणि गोष्टींमधून शिकविले की सोपे जाते, हे आजी-आजोबांना आधी कळते. जरूर पुरस्कार करा त्याचा. ९०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात लीलावतीद्वारा सिद्ध झालेला प्रयोग आपण पुन्हा करू या. झेलमसारख्या प्रख्यात नृत्यांगना पुढे आल्यात व्हिज्युअल आर्टमधून गणित साकारायला, समाजमाध्यमातून पडलेला चुटक्यांचा पाऊस? आपण त्याला योग्य प्रकारे वळविले, तर अनेक डोकी पुढे येतील, मनोरंजनातून गणित शिकवायला. टेक्नॉलॉजीचा उपयोग करून क्राउड सोअर्सिंगद्वारा पालक-शिक्षक प्रत्यक्ष सहभागातून पुस्तके बनविता येतील.

बाई, अशिक्षित घरातील पाल्यांच्या म्हणजे नेमक्या कुठल्या, किती तक्रारी कधी नि काय म्हणून आल्या होत्या? अकरापासून दोन अंकी संख्या सुरू होत असता, एकवीसपासून हा नवा प्रयोग का? मग एकतीस किंवा एकावन्नपासून का नको? या प्रयोगाचे दूरगामी परिणाम तपासले का? बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रारंभीच एकाहत्तर ही संख्या असेल, तर तिचे वाचन सत्तर आणि एक असे करता येईल, हा नवा प्रस्ताव आहे, असे वाहिनी प्रतिनिधी म्हणते. त्यावर सत्तर एक अशी दुरुस्ती आपण का केली नाही? सत्तर आणि एक असते, तर सवालच नव्हता, त्यात नवे काहीच नाही.

तुम्हीच उदाहरणार्थ घेतलेली ५,३५७ ही संख्या पन्नास तीन शे पन्नास सात अशी म्हटली की, पन्नास तीनशे पन्नास सात (५०३००५०७) किंवा पन्नास तीनशे पन्नास सात (५०३५०७) अशीही ऐकू येईल आणि ऐकू येईल तसे एकापुढे एक लिहिणे हा आपल्या सुलभीकरणाचा पाया असल्याने चूक होणे सहज शक्य आहे. नवी पद्धत सोपी आहे, हे विधान गृहीतक, प्रमेय की तर्क? तुम्ही सांगितलेली सुलभ संवादाची व्याख्या, सांगणाऱ्याच्या मनातला अर्थ ऐकणाºयापर्यंत सहज पोहोचला पाहिजे, ही भारतीय दर्शनातील, ती योग्यच आहे, पण इथे तुमचीच संख्या तुम्हाला मान्य असल्याप्रमाणे दुसºया प्रकारे वाचून दाखविली असता, ऐकणाऱ्यांची त्रेधा उडतेय, तर सुलभीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले म्हणायचे का?

तुमच्या मुलांना ऐंशी नि चार विटा समजतात, तर म्हणा ऐंशीचार. पाडा हा द्वंद्व समास जीभवळणी. कोणाला फक्त पन्नासपर्यंतच संख्या येत असतील, तर त्यांना तुम्ही चौºयाऐंशी समजावण्यासाठी पन्नास चौतीस किंवा चाळीस चव्वेचाळीस असे सांगू शकता किंवा जोडाक्षर नकोच असल्यास बेचाळीस बेचाळीस असेही सांगता येईल. संपला विषय!...
...की सुरू झाला? आता भाऊऐवजी आईमुलगा किंवा बाबामुलगा म्हणायचे, असा विनोद पाठवलाय कुणी. त्याचे आईमुलगा वा बाबामुलगा हे रूप मान्य करता येईल. मात्र, शब्द जोडून किंवा तोडून लिहिण्यात चूक झाली, तर गणित चुकणार म्हणून मुलांना गणित आवडणार नाही.

तस्मात, संज्ञांचे सुलभीकरण करणे योग्य नाही. त्या रूढ झालेल्या असतात, जोडाक्षरे तिथे आणलेली नसून म्हणता-म्हणता नाद, ताल, लय इत्यादी गुणांसाठी ती तिथे जमतात. त्याने रूक्ष संज्ञा स्मरणे सुलभ होते, हे समजून घेऊन सत्तावीसऐवजी वीस सात, अठ्ठावीसऐवजी वीस आठ, सत्त्याण्णवऐवजी नव्वद सात असे शिकवावे, ही धडधडीत चुकीची सूचना मागे घ्यावी हे योग्य. बोलीमध्ये रूढ असलेली त्रेपन्न, चौसष्ट अशी रूपे मान्य करूनही आपण म्हणता ते काटे-खडे दूर करता येतील आणि मला वाटतं, परितेवाडीचे स्मार्ट सर म्हणून गौरविले गेलेल्या डिसले गुरुजीसारखे भेटतील काही, त्यांना घ्या अभ्यास मंडळावर. परफॉर्मन्स वाढण्यासाठी स्वयंपाकघर इंटेरिअरवाल्यापेक्षा गृहिणीला लावू द्यावे. पाहा पटतोय का हा विचार...

Web Title: The unexplained letter to Dr. Mangala NaraliKar madam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.