इम्रान खान: अधुऱ्या स्वप्नांची दुर्दैवी कहाणी
By विजय दर्डा | Published: February 8, 2021 07:55 AM2021-02-08T07:55:43+5:302021-02-08T07:57:11+5:30
आता इम्रान खान यांच्यापाशी शिल्लक आहेत फक्त २ वर्षे आणि ९ महिने. त्यांनी पाकिस्तानसाठी पाहिलेल्या स्वप्नांचा चक्काचूर होणे फार दुर्दैवी आहे!
- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
क्रिकेटचे मैदान सोडून देत इम्रान खानपाकिस्तानच्या राजकारणात नवा डाव खेळण्यासाठी उतरले तेव्हा वातावरणात मोठा उत्साह होता. खोल गर्तेकडे निघालेल्या देशाला वाचवू शकेल असे नेतृत्व उदयास आल्याची जगाची भावना झाली होती. इम्रान यांनी केलेल्या भ्रष्टाचारमुक्त पाकिस्तानच्या घोषणेने देशात नवचैतन्य अवतरले होते. युवावर्गावर इम्रानची मोहिनी पडली होती, त्यांच्या सभांना लाखोंच्या संख्येने तरुण यायचे. सत्तेच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू असतानाच मी त्यांना इंग्लंडमध्ये भेटलो होतो. पाकिस्तानात सकारात्मक बदल घडवून आणण्याची त्यांची तळमळ प्रामाणिक आहे, हे मला जाणवले. त्यांच्या बोलण्यात, अगदी नजरेतही पाकिस्तानच्या प्रगतीचा ध्यास दिसत होता आणि भारतासाठी प्रांजळ मदतीचे आश्वासन. क्रीडापटूच्या दिलेरीने ते पुढे जात होते. २२ वर्षांच्या संघर्षानंतर त्यांचे स्वप्न साकार झाले आणि ते पाकिस्तानचे पंतप्रधान बनले.
पंतप्रधानपदाचा दोन वर्षांचा काळ सरला असताना, इम्रान खान यांच्या त्या स्वप्नांचे काय झाले, असा प्रश्न मला पडतो आहे. त्यांचे कुठे चुकले वा चुकते आहे? पत्रकार डॅनियल पर्ल याचा मारेकरी ओमर शेख याची पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्याच सप्ताहात मुक्तता केली, तिथली व्यवस्था कशी कचकड्याची आहे, हे दाखवून दिले. मी अनेकदा पाकिस्तानला गेलो आहे, त्या देशात गरिबी आणि भुकेशी झगडणारी जनता भ्रष्टाचार आणि बेरोजगारीपायी कशी त्रस्त आहे; हे पाहिले आहे. या देशात दहशतवादाचा वरचष्मा आहे, हेरखाते आणि सैन्याचा नित्याचा धाक आहे. याला पाकिस्तानातल्या लोकशाहीचा दैवदुर्विलास म्हणायचे नाही तर काय?
इम्रान खान यांनी भूतकाळ पुसून टाकण्याचे संकेत दिले होते. पंतप्रधान होण्याआधी त्यांनी लाहोर येथे अद्ययावत असे कर्करोग इस्पितळ उभारले होते, कितीतरी विद्यालये आणि महाविद्यालये सुरू केली होती. पंतप्रधान बनल्यावर त्यांनी साधेपणाने आपल्या कारभाराला सुरुवात केली. आपल्या सुरक्षेत बरीच कपात केली, सरकारी विमानातून प्रवास करणे टाळले, व्यावसायिक विमानसेवेचा वापर केला. भारताबरोबरचे संबंध सुधारावेत असे त्यांना वाटत असे. भारताने या दिशेने एक पाऊल पुढे टाकले तर आपण दोन पावले पुढे जाऊ, असे ते सांगत.
प्रत्यक्षात त्यांना एकही पाऊल उचलता आले नाही; आणि भारतही काही दोन पावले पुढे गेला नाही. कारण?- प्रतारणेची तीव्र भावना! मैत्रीचा हात पुढे करत १९९९ साली अटल बिहारी वाजपेयी नवाझ शरिफ यांच्या भेटीसाठी लाहोर येथे गेले. पाकिस्तानच्या लष्कराने या सदिच्छेची परतफेड कारगीलच्या युद्धाने केली. नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथग्रहण सोहळ्यासाठी शरिफ यांना निमंत्रित केले होते आणि एकदा वाट वाकडी करून त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची त्या देशात जाऊन भेटदेखील घेतली. पण, या सौहार्दाची अपेक्षित प्रतिक्रिया काही आली नाही. इम्रान खान यांच्या बाबतीत सावधगिरी दाखवण्यामागचे कारण? हेच असावे- इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये! इम्रान प्रत्यक्षात तिथल्या लष्कराच्या हातचे बाहुले असल्याचा मोठा आरोप नित्य होत असतो. पाकिस्तानमधल्या प्रवाहांशी परिचित असलेल्या मुक्त विचारांच्या जाणकारांना वाटते की आवश्यक ती सावधगिरी बाळगत भारताने इम्रान खानना आपल्या देशाला अवनतीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात पुढे करून एक संधी द्यायला हवी होती. असे न करता भारताने आयएसआयला जे हवे होते तेच केले. इम्रान भारतापासून दूर गेले आणि आयएसआय व लष्कराचे मनसुबे सफल झाले.आज दोन्ही देश सीमेवर कोट्यवधी रुपयांचा अक्षरक्ष: धूर करत आहेत. दोन्ही बाजूंनी जीव आणि मालमत्तेची हानी होत असते. तिथल्या जनतेला भारताबरोबर दोस्ती हवी आहे, हे नक्की! या दोस्तीचा लाभ आपल्याला आरोग्यसेवा, उद्योग आणि व्यापारात होईल याची खात्री त्यांना आहे. आज दोन्ही देशांदरम्यान संवाद राहिलेला नाही, पकिस्तानकडून युद्धबंदी कराराचे उल्लंघन मात्र सातत्याने होत आहे. दहशतवादाने उचल खाल्ली असून दोन्ही देश एकत्र बसून शांतीविषयक संवाद साधतील याची शक्यता नजीकच्या भविष्यात तरी दिसत नाही. पाकिस्तानात अपयशी ठरलेल्या इम्रान खान यांना परदेश व्यवहारांतही फारसे काही करून दाखवता आलेले नाही. ते सत्तेवर येण्याआधीच अमेरिकेने पाकिस्तानकडे पाठ फिरवली होती व त्या देशातून येणाऱ्या निधीचा ओघ आटला होता. मग, पाकिस्तानने सौदी अरेबियाकडे हात पसरला; पण, तिथेही अमेरिका - सौदींचे सख्य आडवे आले. तुर्कस्तान, इराण आणि मलेशियाला सोबत घेत इस्लामिक संघटन घडवण्याचा इम्रान यांचा इरादा होता; पण, तेथेही सौदी आणि इराणमधल्या वैमनस्याने मोडता घातला.
आर्थिकदृष्ट्या पाकिस्तान अत्यंत दुर्बल बनला आहे. त्यामुळे त्याला कधी नव्हे इतके चीनवर अवलंबून राहावे लागते. चीनने पाकिस्तानला प्रचंड मोठे कर्ज दिले आहे, पण त्यावरल्या व्याजाचा सावकारी दर पाकिस्तानच्या आवाक्याबाहेरचा आहे. म्हणूनच चीनला पाकिस्तान विकून टाकल्याचा आरोप इम्रानवर होतो आहे. कर्जाच्या ओझ्याखाली चिरडले गेलेले इम्रान आता चीनमधील उइघुर मुसलमानांच्या अनन्वित छळासंदर्भात एक शब्दही काढू शकत नाहीत.
धर्माच्या नावाने कोणताही देश प्रगती करू शकत नाही, असे विधान आमच्या भेटीदरम्यान करणाऱ्या इम्रान खान यांनी धर्ममुखंडाना दूर ठेवण्याचे संकेत जरूर दिले होते. दुर्दैवाने आज ते आयएसआय व लष्कराच्या सोबतीने मुल्लामौलवींच्या राजकारणात पुरते फसले आहेत. दहशतवादी गुन्हेगारांना शिक्षा फर्मावण्याचे कर्तव्य तिथली न्याययंत्रणा व्यवस्थित पार पाडते; पण, दहशतवादाचा कारखाना बिनदिक्कत चालू आहे. खान हे सगळे कसे थोपवू शकतील? त्यांच्या स्वच्छ प्रतिमेला मानणारे लोक असले तरी त्यांच्या प्रति आम जनतेला वाटणारी आस्था विरत चालली आहे. विरोधी पक्षांनी जनसामान्यांच्या या अस्वस्थतेचा लाभ उठवत खान यांच्या विरोधात वातावरण निर्मिती केली आहे. देशाच्या सर्व भागांत मोठी निदर्शने झाली आहेत. आधीच बेरोजगारीने त्रस्त असलेल्या २२ कोटी लोकसंख्येच्या त्या देशात महामारीने दोन कोटी लोकांचा रोजगार हिरावून घेतलाय. गेल्या १२ वर्षांत न पाहिलेली भाववाढ जनता अनुभवते आहे. आपला कार्यकाल पूर्ण करण्यासाठी इम्रान खान यांच्यापाशी शिल्लक राहिली आहेत २ वर्षे आणि ९ महिने. पाकिस्तानच्या पुनर्निर्माणाविषयीच्या आपल्या घोषणेवर ते अद्यापही ठाम आहेत. मात्र दुर्दैवाने ते उद्दिष्ट साध्य होण्याची पुसटशी शक्यताही दिसत नाही. खान यांचे अपयश हा भारतीय उपखंडाचा दारुण आणि दुर्दैवी अपेक्षाभंग ठरेल!
vijaydarda@lokmat.com
सौजन्य : इंडियन एक्सप्रेस