विकृती व हीनतेचा कळस गाठणारे प्रकार दुर्दैवी !

By किरण अग्रवाल | Published: April 9, 2023 11:37 AM2023-04-09T11:37:32+5:302023-04-09T11:38:48+5:30

Deformity and inferiority : पोलिस व कायदा आपले काम करतोच, नाही असे नाही; मात्र समाजाचा म्हणून जो धाक असायला हवा, तोदेखील हल्ली उरला नसल्याचेच म्हणावे लागते.

Unfortunate types that reach the climax of deformity and inferiority! | विकृती व हीनतेचा कळस गाठणारे प्रकार दुर्दैवी !

विकृती व हीनतेचा कळस गाठणारे प्रकार दुर्दैवी !

googlenewsNext

- किरण अग्रवाल

अंधांची काठी बनण्याचा उपदेश सर्वत्र दिला जात असतो; पण तसे न करता त्यांच्या असाहाय्यतेचा लाभ उठवून हीन कृत्य केले गेल्याचा अकोल्यातील प्रकार केवळ दुर्दैवीच नसून, संस्कार कमी पडल्याची जाणीव करून देणाराच म्हणायला हवा.

विकृती ही मनुष्यातील पशुत्व अगर हीनता दर्शवून देणारीच असते; पण या हीनतेचाही कळस गाठला जातो तेव्हा समाजमनातील संवेदनशीलतेला हादरे बसून जाणे स्वाभाविक ठरते. अंध दाम्पत्याच्या असाहाय्यतेचा फायदा उचलत अंध विवाहितेवर अत्याचार केला गेल्याचा जो प्रकार अलीकडेच अकोल्यात घडून आला, तो असाच संवेदनशील मनांवर ओरखडे उमटवून जाणारा ठरला आहे.

अलीकडे गुन्हेगारी घटनांचा आलेख सर्वत्रच वाढताना दिसतो आहे. पोलिसांचा व पर्यायाने कायद्याचा धाक कमी होत चालल्यामुळे की काय, मारहाण करताना व अगदी कोणाचा जीव घेण्यापर्यंतची पातळी गाठतानाही हल्ली फारशी भीती बाळगली जाताना दिसत नाही. धाक तर उरला नाहीच; पण सहनशीलता व संवेदनशीलताही उरली नसल्याचाच प्रत्यय अशा घटनांमधून येतो. पोलिस व कायदा आपले काम करतोच, नाही असे नाही; मात्र समाजाचा म्हणून जो धाक असायला हवा, तोदेखील हल्ली उरला नसल्याचेच म्हणावे लागते. काहीही केले तरी काही होत नाही, हा निलाजरेपणा त्यातूनच वाढीस लागला आहे. समाजमन शहारून येणाऱ्या घटना त्यातूनच वाढीस लागल्या आहेत.

परगावी नातेवाइकांकडे असलेल्या लहानग्या मुलीला भेटण्यासाठी निघालेले एक अंध दाम्पत्य बसस्थानकावर आले असता रिक्षाने त्यांना सोडून देण्याच्या बहाण्याने एकाने अंध विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच अकोला येथे घडली. संबंधितांच्या असाहाय्यतेचा लाभ उचलत अशा प्रकारे हीनतेची व क्रौर्याची सीमा ओलांडणारे प्रकार अपवादात्मक का होईना, पण जेव्हा घडून येतात, तेव्हा अवघे समाजमन भीतीच्या छायेत गेल्याखेरीज राहत नाही. सदर प्रकार घडून येत असतानाच ग्रामीण भागातील बार्शीटाकळी तालुक्यात एका जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांनी विद्यार्थिनीसोबत निंदनीय कृत्य केल्याचाही प्रकार पुढे आला. गुरुशिष्याच्या नात्यातील आदरभावाला नख लावणारा हा प्रकार आहे. लागोपाठ घडून आलेले हे प्रकार पाहता, कायद्याचा व समाजाचाही धाक उरला आहे की नाही, असाच प्रश्न उपस्थित व्हावा.

स्पर्धेने, ईर्ष्येने तसेच परस्परांबद्दलचा अविश्वास व विद्वेष, विखाराने भारलेल्या आजच्या कोलाहलात कुणी कुणाचा कान धरणाराच उरलेला नाही. ना घरातील वडीलधारे यासाठी हक्क व अधिकार बजावताना दिसतात, ना समाजाची म्हणून कोणाला काही भीती उरली आहे. अल्पवयीन मुलीशी साखरपुडा करून झाल्यावर विवाहासाठीच्या कायदेशीर वयाची अट पूर्ण होण्याची वाट न पाहता एक उतावीळ नवरदेव आपल्या होणाऱ्या पत्नीला फूस लावून अल्पवयीन अवस्थेतच पळवून घेऊन जातो व त्याबद्दल मुलीच्या कुटुंबीयांना पोलिस स्टेशन गाठण्याची वेळ येते ती त्यामुळेच. समाजभावना व संवेदनाच बथ्थड होत चालल्याचे यातून स्पष्ट व्हावे. या अशा घटना केवळ कायद्यानेच रोखता येतील असे नव्हे, तर त्यासाठी कुटुंब व समाजातील जुन्या-जाणत्या ज्येष्ठांनाही पुढे यावे लागेल; नाही तर संस्काररोपणात आपण कमी पडतो आहोत, हे तरी स्वीकारावे लागेल.

मन विषण्ण करणाऱ्या या घटनांचा ऊहापोह करताना जखमेवर काहीशी फुंकर घालणाऱ्या सुहृदयतेचीही नोंद अवश्य घ्यायला हवी, ती म्हणजे अत्याचारानंतर तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशन गाठलेले अंध पती-पत्नी व त्यांची चिमुकली उपाशी असल्याचे लक्षात घेत सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यातील कर्मचारी सुभाष वाघ यांनी आपल्या घरून जेवणाचा डबा आणवून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. हीनतेच्या अंधकारात तेवढाच एक आशेचा व माणुसकी जिवंत असल्याचा हा कवडसा म्हणता यावा. अनिष्ठेला अटकाव करण्याची जशी समाजाकडून अपेक्षा बाळगली जाते, तशीच ही माणुसकी जपणाऱ्यांचा गौरव करण्याची अपेक्षाही गैर ठरू नये. वाऱ्याने फडफडणाऱ्या पणतीभोवती समाजातील जागरूक व संवेदनशील माणसे व संस्था हातांचा आडोसा धरणार नसतील तर या पणत्यांच्या मशाली कशा होणार? तेव्हा चांगुलपणा प्रदर्शणाऱ्या या पोलिस कर्मचाऱ्यांचे त्यांच्या पोलिस विभागाकडून व समाजाकडूनही कौतुक व्हायलाच हवे.

सारांशात, ‘अंधार फार झाला, पणती जपून ठेवा’ असे म्हणण्यासारखीच ही स्थिती आहे. विकृतीचे काळे ढग वाढू पाहत असले तरी कायद्याचा धाक व समाजाच्या नैतिक भीतीद्वारेच त्या ढगांचा विलय घडवून आणता येऊ शकेल, त्या दृष्टीने समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांकडून चिंतन होणे गरजेचे आहे.

Web Title: Unfortunate types that reach the climax of deformity and inferiority!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.