धर्मगुरूला झाली कृतघ्नतेची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 12:24 AM2018-08-14T00:24:07+5:302018-08-14T00:24:29+5:30
कृतघ्नतेच्या दुर्गुणापासून धर्मगुरूही मुक्त नसतात हे वास्तव भारताच्या आश्रयाला आलेल्या व गेली ६० वर्षे येथे सुखेनैव जगत असलेल्या दलाई लामा यांच्या ताज्या वक्तव्याने सिद्ध केली आहे.
- सुरेश द्वादशीवार
(संपादक, नागपूर)
कृतघ्नतेच्या दुर्गुणापासून धर्मगुरूही मुक्त नसतात हे वास्तव भारताच्या आश्रयाला आलेल्या व गेली ६० वर्षे येथे सुखेनैव जगत असलेल्या दलाई लामा यांच्या ताज्या वक्तव्याने सिद्ध केली आहे. स्वत:ला भगवान अवलोकितेश्वर या बौद्ध दैवताचा अवतार समजणारे हे लामा गोव्यातील एका सभेत म्हणाले, नेहरूंऐवजी जीना यांना देशाचे पंतप्रधानपद दिले असते तर भारत अखंड राहिला असता. नेहरू अहंमन्य असल्यामुळेच तसे घडले नाही. वास्तव हे की, पाकिस्तानच्या निर्मितीचा झेंडा जीना यांनी १९४० मध्येच उभारला. त्याआधी १९३७ मध्ये झालेल्या प्रांतिक विधीमंडळांच्या निवडणुकीत त्यांच्या मुस्लीम लीगने दोन प्रांतांत बहुमत मिळविले होते. त्या निवडणुकीने उघड केलेली बाब ही की मुस्लीमबहुल मतदारसंघात लीगचे तर हिंदूबहुल मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. धर्माच्या नावावर देशाच्या जनतेत पडलेली फूट त्याचवेळी उघड झाली. या फुटीचे नेतृत्वच जीनांनी केले आणि ती वाढू नये यासाठी गांधीजींच्या नेतृत्वात नेहरू व पटेलादिकांनी केलेले प्रयत्न यशस्वी होणार नाहीत यासाठीच आपले पुढचे राजकारण त्यांनी राबविले. १९४० मध्ये त्यांनी पाकिस्तानसाठी ‘प्रत्यक्ष कारवाईचा’ म्हणजे सशस्त्र लढ्याचा आदेशच लीगला दिला. पुढल्या साऱ्या काळात तेव्हाच्या ब्रिटिश सत्तेने फोडा आणि झोडा या नीतीने राजकारण करून जीनांचा अहंकार फुलविला व देशाचे राजकारण फाळणीच्या दिशेने नेले.
अखेरच्या क्षणी गांधीजींनी जीनांना अखंड भारताचे पहिले पंतप्रधान तुम्हीच व्हा असे विनवून हा देश एकसंघ राखण्याचा प्रयत्न केला हे खरे आहे. मात्र देशातील बहुसंख्य जनतेला व तिचे प्रतिनिधित्व करणाºया काँग्रेस पक्षाला आपले नेतृत्व मान्य होणार नाही हे ठाऊक असलेले बॅरि. जीना ती विनवणी मान्य करणार नाहीत हेही उघड होते. शिवाय गांधीजींनी दिलेले पंतप्रधानपद स्वीकारण्याहून एका नव्या राष्ट्राचे निर्माते होणे जीनांना अर्थातच अधिक आवडणारे होते. त्यामुळे नेहरूंच्या महत्त्वाकांक्षेमुळे जीनांचे फाळणीचे राजकारण यशस्वी झाले हा दलाई लामांना आता लागलेला शोध कमालीचा चुकीचा व निराधार आहे हे त्यांना बजावणे भाग आहे. त्यातून ज्याला आपला देश व भूमी साधी राखताही आली नाही त्याने नेहरूंसारख्या देशाच्या भाग्यविधात्याला अहंकारासाठी नावे ठेवणे हे साध्या सभ्यतेतही बसणारे नाही हेही त्यांना सांगितले पाहिजे.
दलाई लामा हे तिबेटचे धर्मगुरू व त्या प्रदेशाचे राज्यप्रमुखही होते. १९५० मध्ये चीनने तिबेट ताब्यात घेऊन दलाई लामांच्या अनुयायांची कमालीच्या निर्घृणपणे हत्या केली. त्या गुलामगिरीविरुद्ध दलाई लामांच्या अनुयायांनी १९५९ मध्ये जे बंड उभारले तेही चीनने तेवढ्याच क्रूरपणे दडपून टाकले. त्या स्थितीत आपल्या पराभूत अनुयायांसोबत राहण्याऐवजी दलाई लामा तवांगच्या मार्गाने मॅकमहोन सीमारेषा पार करून ३१ मार्च १९५९ या दिवशी भारतात पळून आले. भारताने त्यांना आपल्या भूमीत स्थान देऊ नये असा दावा चीनचे राज्यकर्ते करीत असताना व भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून ताणतणाव सुरू असताना, त्या देशाचा रोष पत्करून पं. नेहरूंनी दलाई लामांना देशात प्रवेश दिला व धर्मशाळा या हिमाचल प्रदेशातील शहरात त्यांना त्यांचे अस्थायी सरकार स्थापन करू दिले. मॅक्लिओडगंज या धर्मशाळा शहराच्या उत्तरेकडील भागात हे लामा सध्या अत्यंत ऐषआरामात व सोबत आलेल्या शेकडो अनुयायांची सेवा घेत आयुष्य काढत आहेत. या इसमाने आपले सारे आयुष्य नेहरूंची पूजा केली असती तरी त्याच्यावर नेहरूंनी व या देशाने केलेल्या उपकारांची परतफेड होऊ शकली नसती. भारतात राहत असतानाही दलाई लामांचे या देशाच्या धोरणांना छेद देणारे उपक्रम कधी थांबले नाहीत. २०१६ पर्यंत ते अरुणाचल हा तिबेटचा दक्षिण भाग असल्यामुळे त्यावर चीनचा तांत्रिक हक्क आहे अशी बेजबाबदार भाषा बोलत राहिले. याच काळात चीन तिबेटला काही प्रमाणात स्वायत्तता देत असेल तर आपण पुन्हा तिबेटमध्ये परत जायला तयार आहोत असेही ते म्हणत राहिले. त्याहीपुढे जाऊन ज्यांनी त्यांना त्यांच्याच देशातून घालवून दिले त्या माओत्सेतुंगांना ते आपला थोरला बंधू म्हणत राहिले. पुढे जाऊन माओत व माझ्यात कोणतेही वैर नाही असेही ते जगाला सांगत होते. आपला देश हिरावून घेणाºया चीनशी वैर नाही आणि त्याचे राज्यकर्ते आपले बंधू आहेत अशी कमालीची शरणागत व दयनीय भाषा बोलणाºया या लामांना शांततेचे दूत ठरवून पुढे नोबेल पारितोषिकही दिले गेले. हा सारा एका धर्मगुरूने राजकारणात केलेल्या लाचारीची कथा सांगणारा इतिहास आहे. अशा माणसाने त्याला आश्रय देणाºया नेहरूंवर अहंकाराचा आरोप करावा आणि त्याला देशाच्या फाळणीचा गुन्हेगार ठरवावे याएवढा बेशरमपणा व कृतघ्नपणा दुसरा असणार नाही.
१९१४ मध्ये भारताचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री सर हेन्री मॅकमहोन यांनी तेव्हाचा भारत, ब्रह्मदेश व तिबेट यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेची आखणी केली. त्या योजनेवर तिबेटच्या प्रतिनिधीची सही आहे. चीनमधील क्रांतीनंतर तेथील राज्यकर्त्यांनी मॅकमहोन सीमेबाबतचा करार अमान्य केला. तेव्हाचे ब्रिटिश सरकार व तिबेटमध्ये असणारे लामांचे सरकार या दोन्ही बाबी आम्हाला मान्य नाहीत ही गोष्ट चीनचे पंतप्रधान चौ-एन-लाय यांनी जाहीर करून भारत-चीन यांच्यातील सीमावादही त्याचवेळी उघड केला. २९ एप्रिल १९५४ या दिवशी भारताने तिबेट हा चीनचा भाग असल्याचे वास्तव मान्य केले. मात्र त्यानंतर केवळ १९ दिवसांनी चीनने भारतावर उत्तर प्रदेशातील नीती या खिंडीजवळच्या बाराहोती या खेड्यात आपले सैन्य आणल्याचा आरोप करून नव्या तणावाला सुरुवात केली. त्याविषयीचा निषेध भारताने नोंदविताच चीनने तो आरोप मागे घेतला. चीनने भारताची केलेली एक फसवणूकही येथे नोंदविण्यासारखी आहे. मॅकमहोन रेषेला भारत-चीनमधील सीमारेषा म्हणून मान्यता नाकारणाºया चीनने याच रेषेला चीन व ब्रह्मदेशामधील सीमारेषा म्हणून मान्यता दिली होती. जी रेषा ब्रह्मदेशाबाबत चीन मान्य करतो ती भारताबाबत त्याला मान्य नसते हा दुटप्पीपणा जगाच्या लक्षात तेव्हाही आला होता. चीनचे हे धोरण व भारतासोबतचे त्याचे तणावाचे संबंध प्रत्यक्ष पाहणाºया दलाई लामांना भारत आश्रय देतो याविषयीची साधी कृतज्ञताही त्यांना वाटू नये, या वृत्तीला कोणते नाव द्यायचे असते?
तात्पर्य, चीनने भारताशी चालविलेल्या ताणतणावाच्या काळातच तिबेटमधून निर्वासित केलेले दलाई लामा भारतात राहून चीनलाच अनुकूल ठरेल अशी भाषा बोलत राहिले असतील तर तो केवळ विश्वासघाताचाच नव्हे तर गुन्हेगारीचाही भाग आहे. पं. नेहरूंच्या सरकारने या अपराधांसह त्यांना सांभाळले व त्यांचे अस्थायी सरकार आपल्या भूमीवर त्यांना चालवू दिले ही बाब किमान स्वत:ला धर्मगुरू म्हणविणाºया इसमाने तरी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मात्र या इसमात तेवढीही कृतज्ञता बुद्धी नसणे हा त्याच्याविषयीचा संताप व आपल्या फसवणुकीचा विशाद देशाला वाटायला लावणारा प्रकार आहे.