इंजेक्शन द्यावे, काढा की ‘साबुदाणा’ गोळी? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2022 09:32 AM2022-12-27T09:32:15+5:302022-12-27T09:32:35+5:30

मिश्र-पॅथीचा प्रयोग करण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने योजले आहे! पण, या बेरजेच्या औषध-कारणाने रुग्णहित साधले जाणार आहे का?

union health ministry plans to experiment with mixopathy but is this amount of medicine going to benefit patient | इंजेक्शन द्यावे, काढा की ‘साबुदाणा’ गोळी? 

इंजेक्शन द्यावे, काढा की ‘साबुदाणा’ गोळी? 

googlenewsNext

डॉ. शंतनु अभ्यंकर, स्त्री आरोग्यतज्ज्ञ

डॉक्टरांची कमतरता आणि भारतीयांची तोळामासा तबियत, अशा दोन्ही बिमारींवर शर्तीली दवा म्हणून आधुनिक आणि ‘आयुष’ अशी एकत्रित, जहाल मात्रा योजायचे सरकारने ठरवले आहे. नव्या धोरणानुसार प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात वगैरे, आधुनिक अधिक ‘आयुष’ अशी संयुक्त उपचार केंद्रे असणार आहेत. आरोग्य मंत्रालयाने सुरू केलेला हाच तो एकात्मिक औषध प्रणाली म्हणजेच मिश्र-पॅथीचा प्रयोग! पण या बेरजेच्या औषध कारणाने रुग्णहित साधणार आहे का?

या प्रयोगात विविध पॅथींचे डॉक्टर एकाच रुग्णावर सहमतीने उपचार करतील! आता प्रश्न  असा, की या असल्या प्रकाराचा काही पूर्वानुभव आहे का? दोन पॅथी उपचाराने दुप्पट फायदा होतो का ? असे अभ्यास झाले आहेत का? त्यातून काय साध्य झाले ? या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत. असे केल्यामुळे दोन्हीकडील उत्तम तेवढे आपल्या पदरात पडेल; आपोआपच आपण सुवर्णमध्याला पोहोचू, अशी भावना आहे; पण दरवेळी सुवर्ण हे मध्यावरच असेल असे नाही. ते एका टोकालाही असू शकते. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात.

‘आयुष’ या निव्वळ पारंपरिक पद्धती नव्हेत, निव्वळ पूरकही नव्हेत तर पर्यायी उपचार पद्धती आहेत. ‘आयुष’वाल्यांचा असा पक्का दावा आहे. पर्यायी पद्धती म्हणजे नुसत्या वेगळ्या नावाची औषधे देणाऱ्या पद्धती नव्हेत; तर संपूर्ण शरीररचना, कार्य, आजारांची उत्पत्ती, स्थिती, लय, उपचार, त्यांचा प्रभाव आणि त्यांची परिणीती याबाबत त्यांचे काही वेगळे म्हणणे आहे. निव्वळ कल्प किंवा साबुदाण्यासारख्या गोळ्या किंवा शरबत-ए- आजम म्हणजे ‘आयुष’ नाही. प्रत्येक ‘आयुष’ पद्धती म्हणजे जगण्याकडे बघण्याचा एक सर्वांगीण, परिपूर्ण विचार आहे. तेव्हा त्यांच्या क्षमतांबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. मग आता त्यांची सांगड आधुनिक वैद्यकीशी का बरे घालायची आहे? असा असंगाशी संग केल्याने हे सारे तेज निष्प्रभ वगैरे होणार नाही का? खरेतर अशा संगतीने स्व-सामर्थ्याचा गंड कुरवाळला जाईल, एवढेच. अर्थात, कुणी सांगावे, नाठाळ आधुनिक वैद्यकाला म्हणजेच ॲलोपॅथीला वठणीवर आणायचा अंतस्थ हेतू असू शकेल.

पण ॲलोपॅथीला दुषणे देतच यातील बहुतेकांचा व्यावसायिक डोलारा उभा आहे. ॲलोपॅथीमुळे जगणे नरकासमान झाले असल्याचे सांगणाऱ्या जाहिरातीही एका औषध कंपनीने दिल्या होत्या. ॲलोपॅथीशी सलगी करणाऱ्या होमिओ डॉक्टरास ‘कुलुंगी कुत्रा’ (Mongreal) म्हणावे अशी अधिकृत शिफारस होमिओपॅथीच्या अभ्यासक्रमातील मूळ ग्रंथात आहे. मग आता संयुक्त दवाखान्यात कोणी, कुणाला, काय म्हणावे बरे?
शिवाय ‘आयुष’मध्येच भेदाभेद आहेत. ‘आयुष’ म्हणजे आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी. अशी आधुनिक वैद्यकी वगळता ‘इतर सर्वांची’ वळलेली मोळी होय! मायजम्स, व्हायटल फोर्स, डायनामायझेशन वगैरे होमिओपॅथीची खासियत आहे. अल् अनसीर, अल् अखलात, अल् मिजाज वगैरे सप्तघटक युनानीची मिरास आहे. दोष, प्राण, धातू वगैरे आयुर्वेदाच्या संहितांमध्ये सांगितले आहे; पण या संकल्पनांच्या व्याख्या आणि व्याप्ती अस्पष्ट आहे.

एका पॅथीचा मेळ दुसरीशी नाही. एवढेच नाही तर, काहींना जंतुशास्त्र अमान्य आहे, काहींना पुनर्जन्म मान्य आहे, काहींना प्राचीनत्व हाच पुरेसा पुरावा वाटतो तर काहींच्या प्रवर्तकाला साक्षात देवाचा मान आहे. हे सगळे खरे की खोटे? रास्त की गैर? वैज्ञानिक की छद्मवैज्ञानिक? हे मुद्देच नाहीत. जे आहे ते जनतेच्या तंदुरुस्तीसाठी दुरुस्त आहे, हे गृहीत आहे.

या विभिन्न दृष्टिकोनांचा मेळ ॲलोपॅथीशी कसा घालणार? कोणत्याही बड्या इस्पितळात अनेक डॉक्टर एकाच पेशंटची तपासणी करतात; पण हे सारे त्या देहाच्या चलनवलनाबाबत समान समजूत बाळगून असतात. त्यांच्या चिकित्सेमध्ये अर्थातच एक सुसूत्रता असते; त्याचे काय? 

उदाहरणार्थ, काविळीकडे पाहण्याचा प्रत्येक पॅथीचा दृष्टिकोन वेगळा वेगळा आहे. युनानी पद्धतीनुसार कावीळ खिलत-ए-सफरा किंवा सौदाच्या प्रादुर्भावाने होते तर आधुनिक वैद्यकीनुसार रक्त-दोष, लिव्हर-दोष अशी कारणे असू शकतात. संयुक्त-क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णाच्या तपासण्या कोण, का आणि कोणत्या प्रकारच्या करणार? दोन तज्ज्ञांचे मतभेद झाले तर काय? यात पेशंटच्या मताला किंमत किती ? कोणाचे औषध द्यायचे, हे कसे ठरवणार? शेवटी कोणते औषध घ्यायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या व्यक्तीस्वातंत्र्यात आम्ही ढवळाढवळ केलेली नाही. आम्ही पर्याय उपलब्ध करून देतो आहोत, असा युक्तिवाद सरकार करू शकेल.

पण आम्ही ‘आयुष’-ज्ञानमंडित असलो तरी येनकेन प्रकारेन आम्हाला आधुनिक औषधे वापरण्याची मुभा द्यावी, अशी ‘आयुष’ संघटनांची उफराटी; पण रीतसर मागणी आहे. विद्यमान सरकारने ही मागणी मान्य करण्याचा चंग बांधला आहे. याला प्रामाण्य पुरवण्यासाठी की काय, आता ‘आयुष’ अभ्यासक्रमात आधुनिक औषधशास्त्र आणि एमबीबीएस अभ्यासक्रमात ‘आयुष’ घुसवले गेले आहे. नीम हकीम तयार करणाऱ्या या निर्णयापाठोपाठ ही संयुक्त दवाखाने काढण्याची मखलाशी करण्यात येत आहे. सर्व-पॅथी-समभावाचा हा लोकशाही आविष्कार आहे. बॉलिवूड मसालापटात प्रत्येक धर्माचे एकेक पात्र असावे, तसे हे आहे. तितकेच बेगडी, तितकेच दिखाऊ... आणि तितकेच प्रभावहीन ! shantanusabhyankar@hotmail.com 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: union health ministry plans to experiment with mixopathy but is this amount of medicine going to benefit patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य