गडकरींचे टीकास्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 03:23 AM2019-01-29T03:23:10+5:302019-01-29T03:24:49+5:30

येत्या पाच महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर गडकरींनी दिलेला हा इशारा भाजपाच्या साऱ्या पुढाºयांना व कार्यकर्त्यांना अंतर्मुख करणारा आहे.

union minister indirectly takes a dig at pm narendra modi over unfulfilled promises | गडकरींचे टीकास्र

गडकरींचे टीकास्र

Next

नितीन गडकरी यांच्या रूपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बोलत असतो. त्यामुळे ‘जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार नसाल तर जनता तुम्हाला फटके लगावेल’ हे गडकरींचे विधान प्रत्यक्षात संघाचे आहे आणि ते मोदी आणि त्यांच्या सरकारला ऐकविले आहे, हे उघड आहे. नितीन गडकरी हे तसेही स्वतंत्र भूमिका घेण्यात आणि मोदींपासून शक्यतोवर दूर राहण्यात पटाईत आहेत. मोदीही त्यांना फारसे जवळ करताना गेल्या चार वर्षांत कधी दिसले नाहीत. पर्रीकर गोव्यात गेले, जेटली अमेरिकेला गेले, सुरेश प्रभूंचे खाते काढून घेतले अशा वेळी मोदी नितीन गडकरी यांना एखादे वरिष्ठ पद देऊन मंत्रिमंडळाच्या राजकीय समितीत आणतील, असा कयास अनेकांनी बांधला होता. प्रत्यक्षात मोदींनी त्यांना दिल्लीपासून दूर अंतरावर सडका बांधत ठेवले.

वास्तव हे की भाजपाच्या राजकारणात नितीन गडकरी मोदींना ज्येष्ठ आहेत. अडवाणींच्या पश्चात संघाने त्यांनाच भाजपाचे अध्यक्षपद दिले आहे. ते अध्यक्ष असताना मोदी गुजरातचे मुख्यमंत्री आणि अमित शाह हे त्या राज्याचे गृहराज्यमंत्री होते. ही एकच बाब गडकरींचा भाजपामधील अधिकार व उंची सांगणारी आहे. मात्र मोदींनी त्यांना तसा मान कधी दिला नाही. गडकरी यांनीही ते कधी मनावर घेतले नाही आणि आपले मनोगत धाडसाने ऐकविण्याचे कामही कधी थांबविले नाही. बाकीचे सारे मंत्री मोदींसमोर माना खाली घालून कारकुनासारखे उभे असताना गडकरी मात्र स्वतंत्र दिमाखात वावरताना सदैव दिसले.

येत्या पाच महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर गडकरींनी दिलेला हा इशारा महत्त्वाचा व भाजपाच्या साºया पुढाºयांना व कार्यकर्त्यांना अंतर्मुख करणारा आहे. त्यातून १९ आणि २० फेब्रुवारीला नागपूर या गडकरींच्या मतदारसंघात भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन व्हायचे आहे. त्यामुळे तर यजमानाचे हे खडेबोल मोदी व त्यांच्या भक्तांना घायाळ करणारे आहेत. अनेक भाजपा नेत्यांच्याही कपाळाला यामुळे आठ्या पडल्या आहेत. सत्तेवर येण्याआधी प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये देण्याचे मोदींचे आश्वासन आता ते स्वत:च विसरले आहेत. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे त्यांचे आश्वासन त्यांचा पक्षही विसरला आहे. महागाई कमी करणे, शेतमालाला दर्जेदार भाव देणे आणि देशाची अर्थव्यवस्था साडेसात टक्क्यांनी वाढत ठेवणे ही आश्वासनेही कधीचीच हवेत विरली आहेत.

‘तेव्हा कदाचित आम्ही निवडून येणार नाही असे वाटल्याने आमच्या पक्षाने व नेत्याने ही आश्वासने दिली असतील. मात्र लोक ती अद्याप विसरले नाहीत. सबब, येत्या निवडणुकीत लोक त्यांना त्याविषयीचा जाब मागणार आहेत’ हे गडकरी यांनी मोदींसकट साºया भाजपावाल्यांना खणखणीतपणे सुनावले आहे. जी गोष्ट सोनिया गांधी किंवा राहुल गांधींनी देशाला ऐकवायची ती मोदींचे एक ज्येष्ठ सहकारी अशी ऐकवत असतील तर ती त्या पक्षातील खदखद व असंतोष दर्शविणारी बाब आहे. नितीन गडकरी बिनधास्त बोलतात म्हणून त्यांचे बोलणे सहजासहजी उडवून लावता येण्याजोगे नाही. गडकरी ही संघाची देशाच्या नेतृत्वासाठी असलेली पहिली निवड आहे. याउलट मोदी हा संघाचा नाइलाज आहे, हा इतिहास ताजा आणि न विसरता येणारा आहे. त्यामुळे गडकरींचे वक्तव्य हे त्यांचे एकट्याचे मत म्हणून पाहता येत नाही. ते संघाचे, संघाच्या जुन्या व ज्येष्ठ नेत्यांचे आणि झालेच तर पक्षातील वयस्क वरिष्ठांचे मत म्हणूनही पाहिले पाहिजे. केवळ ते बोलण्याची गडकरींची तयारी असल्याने ते बोलले इतकेच.

अर्थात गडकरींच्या या टीकेमुळे मोदी त्यांची वाटचाल बदलतील किंवा अमित शाह यांचा उन्माद ओसरेल अशी भाबडी आशा कुणी बाळगण्याचे कारण नाही. त्यांचे ते उपजत स्वभाव आहेत. ते बदलू शकत नाहीत. आपल्या विरोधकांबाबत ज्या अशिष्ट पातळीवर मोदी बोलतात आणि शाह हे तर आपल्या मित्रपक्षांनाच ‘पटकण्याची’ भाषा ऐकवतात, ते पाहिले की मग त्यांची खरी ओळख त्यांच्या बैठकीसकट लक्षात येते. पाच राज्यांत जनतेने धूळ चारल्यानंतरही ज्यांचे मेंदू ठिकाणावर येत नाहीत त्यांना गडकरी वळणावर आणतील, अशी अपेक्षा त्याचमुळे बाळगण्याचे कारण नाही. मात्र मोदी सरकारने ही अपेक्षा पूर्ण केली नाही एवढ्यासाठी जनता त्यांची खोटी आश्वासने विसरून जाईल वा खपवून घेईल, असे आपणही समजण्याचे कारण नाही.

Web Title: union minister indirectly takes a dig at pm narendra modi over unfulfilled promises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.