शंभर वनस्पती शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा अनोखा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:54 AM2018-04-22T00:54:39+5:302018-04-22T00:54:39+5:30
मराठी ग्रंथविश्वाने सध्या गगन भरारी घेतली आहे असे वाटत असले तरी त्यामधील अंतर्भूत विज्ञान साहित्यास २१ व्या शतकातही अजून म्हणावे एवढे पंख फुटलेले आढळत नाहीत.
डॉ. नागेश टेकाळे
मराठी ग्रंथविश्वाने सध्या गगन भरारी घेतली आहे असे वाटत असले तरी त्यामधील अंतर्भूत विज्ञान साहित्यास २१ व्या शतकातही अजून म्हणावे एवढे पंख फुटलेले आढळत नाहीत. विज्ञान कथा, शोध, निर्मिती आणि चरित्र रूपामधून काही हिरे, माणिक, पाचू, मराठी साहित्यात आजही विखुरलेले आढळतात. या आणि अशा शोधातच माझ्यासारख्या विज्ञानप्रेमीच्या हातात अचानक एक माणिक गवसले, त्या पुस्तकाचे नाव होते ‘शंभर वनस्पती शास्त्रज्ञ’. विज्ञान प्रसाराचा वसा घेतलेल्या मराठी विज्ञान परिषदेने पंडित पब्लिकेशन, कणकवली यांच्या सहकार्यातून हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे आणि त्याचा औपचारिक प्रकाशन सोहळा १८ डिसेंबर २०१७ रोजी कुडाळ येथे झालेल्या ५२ व्या मराठी विज्ञान परिषदेच्या अधिवेशनात संपन्न झाला.
वृक्षाचे खोड आणि पाने यांच्या कलात्मक मांडणीमधून या पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ तयार झाले आहे. मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ.पां. देशपांडे यांचे संपादन आणि अभ्यासू प्रस्तावना लाभलेल्या या पुस्तकात प्रत्येक पृष्ठावर एका वनस्पती शास्त्रज्ञाची आणि त्याच्या संशोधनाची ओळख विज्ञानप्रेमींपर्यंत पोहोचविण्याचा संपादकाचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. अनेक विद्यार्थी वनस्पती शास्त्राचा अभ्यास करतात, काही विज्ञानप्रेमी केवळ आवड म्हणूनही या शास्त्राशी जवळीक साधतात, पण शास्त्रज्ञांच्या संदर्भाअभावी हा अभ्यास आणि वाचन अनेक वेळा अपुरे वाटते. पण या सुंदर पुस्तकाने आता ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकामधील सर्वच चरित्रे वाचण्यासारखी आहेत, कारण ती नामवंत वनस्पतीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लिहिली गेली आहेत. काही अपवाद वगळता महाराष्ट्रामधील वनस्पती शास्त्रज्ञांनी या पुस्तकास खऱ्या अर्थाने श्रीमंत केले आहे. यातील काही चरित्रे उदा. डॉ. आनंद चंद्र्र दत्ता, डॉ. हेमा साने, डॉ. जानकी अम्मल, प्रा. श्री.द. महाजन, डॉ. बी.जी.एल. स्वामी, डॉ. दिलबागसिंग अटवाल, डॉ. अदिती पंत हे तर वनस्पती शास्त्राच्या विद्यार्थ्यांना व तरुण शास्त्रज्ञांना मार्गदर्शक दीपस्तंभच ठरावेत. प्रत्येक ग्रंथसंग्रहालयात हे पुस्तक तर हवेच, पण संशोधनापेक्षाही ज्यांनी ते संशोधन केले त्यांच्या ज्ञानकुपींमधील हा खजिना सर्व विज्ञानप्रेमींसाठी वाचण्यास, संग्रही ठेवण्यास आणि प्रसंगी भेट देण्यासाठी फारच उपयुक्त आहे. सोपी, सुटसुटीत, ओघवती भाषा, आकर्षक मांडणी, शास्त्रज्ञांची मुख्य आणि मलपृष्ठावरील रंगीत छायाचित्रे ही या विज्ञान पुस्तकाची जमेची बाजू ठरावी. या विज्ञान साहित्य निर्मितीमध्ये मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह श्री. अ.पां. देशपांडे, सुचिता भिडे यांच्यासह पर्यावरण अभ्यासक प्रा. शरद चाफेकर आणि वृक्षतज्ज्ञ डॉ. सी.एस. लट्टू यांचा सहभागही फार मोलाचा आहे.
मराठी विज्ञान साहित्यात हा असा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे हे पुस्तक साहित्यविश्वात एक वेगळे कोंदणच ठरते. म्हणूनच शंभर वनस्पती शास्त्रज्ञांचे मौलिक संशोधन साध्या, सोप्या, रसाळ भाषेत मराठी वाचकांसाठी पुस्तकरूपाने सादर करण्याचा मराठी विज्ञान परिषदेचा हा अनोखा उपक्रम निश्चितच स्तुत्य ठरावा.
शंभर वनस्पती शास्त्रज्ञ
संपादक : श्री. अ.पां. देशपांडे,
मराठी विज्ञान परिषद, मुंबई. पंडित पब्लिकेशन, कणकवली, पृष्ठे ११०, किंमत रु. १२०