सेवेचे अद्वितीय माध्यम ‘टाइम बँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 05:16 AM2018-06-27T05:16:57+5:302018-06-27T05:17:01+5:30

स्वित्झर्लंडमध्ये शिकत असताना शाळेच्या जवळच मी एक घर भाड्याने घेतले. घरमालकीण क्रिस्टिना ६७ वर्षांची वृद्धा होती, जी एका माध्यमिक शाळेतून शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झालेली होती.

The unique medium of service is 'Time Bank' | सेवेचे अद्वितीय माध्यम ‘टाइम बँक’

सेवेचे अद्वितीय माध्यम ‘टाइम बँक’

Next

स्वित्झर्लंडमध्ये शिकत असताना शाळेच्या जवळच मी एक घर भाड्याने घेतले. घरमालकीण क्रिस्टिना ६७ वर्षांची वृद्धा होती, जी एका माध्यमिक शाळेतून शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झालेली होती. स्वित्झर्लंडमध्ये पेन्शन तशी चांगली मिळते आणि लोकांना आपल्या उर्वरित आयुष्यात खाण्यापिण्याची चिंता करण्याची अजिबात गरज पडत नाही. त्यामुळे तिने एका ८७ वर्षांच्या वृद्धाची देखभाल करण्याचे ‘काम’ आधीच शोधून ठेवणे आश्चर्यचकित करणारे होते. ‘तुम्ही पैशासाठी काम करीत आहात काय,’ असा प्रश्न मी तिला विचारला. तिचे उत्तरही तेवढेच चकित करणारे होते. ‘मी पैशासाठी काम करीत नाही. तर टाइम बँकेत आपला वेळ जमा करीत आहे, जेणेकरून म्हातारपणात चालणे-फिरणे कठीण होईल तेव्हा या वेळेचा मी उपयोग करू शकेल.’
मी पहिल्यांदाच ‘टाइम बँक’ ही संकल्पना ऐकली होती, त्यामुळे माझ्या मनात त्याविषयीची जिज्ञासा निर्माण झाली. मी माझ्या घरमालकिणीला त्याविषयी सविस्तर माहिती विचारली. ‘टाइम बँक’ मुख्यत्वे एक वृद्धावस्था पेन्शन कार्यक्रम आहे. सामाजिक सुरक्षेच्या उद्देशाने स्विस संघीय मंत्रालयाने हा कार्यक्रम विकसित केला आहे. लोक आपल्या युवावस्थेतच वयोवृद्धांची सेवा करण्यासाठी आपला वेळ जमा करू शकतात आणि म्हातारपण आल्यावर, आजारी पडल्यावर किंवा देखभाल करण्याची गरज पडल्यावर ही जमा केलेली वेळ काढू शकतात.
अर्जदार निरोगी, वाक्पटू आणि करुणावान असायला पाहिजे. दररोज गरजवंतांची सेवा करून त्याला आपला वेळ जमा करता येऊ शकेल. त्याच्या सेवेचे तास सामाजिक सुरक्षा प्रणालीच्या व्यक्तिगत खात्यात जमा केले जातात. क्रिस्टिना आठवड्यातून दोनदा दोन-दोन तासांकरिता काम करायला जात असे आणि वृद्धांना शॉपिंग करणे, खोलीची साफसफाई करणे, सनबाथसाठी त्यांना बाहेर जाण्यास मदत करण्यासोबतच त्यांच्याशी ती गप्पागोष्टीही करीत असे. कराराप्रमाणे त्यांची एक वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर ‘टाइम बँके’ने त्यांच्या सेवेच्या तासांची मोजणी करून एक ‘टाइम बँक कार्ड’ जारी केले होते. त्यांना जेव्हाकेव्हा आपली देखभाल करण्याची गरज पडली तेव्हा त्या टाइम बँकेमधून आपली वेळ आणि त्यावरील व्याज काढू शकत होत्या. माहितीची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर टाइम बँक रुग्णालय अथवा घरी देखभाल करण्यासाठी स्वयंसेवकाला पाठविण्याचे काम करते.
एके दिवशी मी शाळेत असताना माझ्या घरमालकिणीचा मला फोन आला. खिडकी स्वच्छ करताना स्टूलवरून पडल्याचे त्यांनी मला सांगितले. मी तात्काळ रजा काढली आणि उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेले. घरमालकिणीच्या गुडघ्याला जखम झाली होती आणि त्यांना काही दिवसांसाठी विश्रांतीची गरज होती. त्यांची देखभाल करण्यासाठी मी जेव्हा रजेचा अर्ज लिहायला घेतला तेव्हा घरमालकीण मला म्हणाल्या, ‘माझी काळजी करू नका.’ वस्तुत: त्यांनी टाइम बँकेकडे आधीच विड्रॉल रिक्वेस्ट पाठवून दिलेली होती आणि दोन तासांच्या आत टाइम बँकेने त्यांची देखभाल करण्यासाठी एक पुरुष परिचारक पाठविला होता. हा परिचारक दररोज त्यांची देखभाल करायचा. त्यांच्याशी गप्पागोष्टी करायचा आणि त्यांना रुचकर जेवणही तयार करून द्यायचा.
या शुुश्रुषेमुळे घरमालकीण लवकरच बरी झाली आणि ती पुन्हा आपल्या ‘कामा’वर जाऊ लागली. चालताफिरता येते तोपर्यंत आपण टाइम बँकेत आपली वेळ जमा करीत राहणार, जेणेकरून गरज पडल्यावर कुठलीही अडचण येणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते.
आज स्वित्झर्लंडमध्ये म्हातारपणाच्या ‘काठी’साठी ‘टाईम बँके’त आपली वेळ जमा करणे एक सर्वसामान्य बाब बनलेली आहे. यामुळे देशाच्या पेन्शन खर्चाचीच बचत होत नाही तर अनेक सामाजिक समस्यांचेही निराकरण होते. अनेक स्विस नागरिक अशाप्रकारे वृद्धावस्था पेन्शनचे समर्थक बनलेले आहेत. निम्म्याहून अधिक युवक अशाप्रकारच्या वृद्धावस्था देखभाल सेवेत आपला सहभाग देण्यास इच्छुक असल्याचे स्विस पेन्शन संघटनेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातू दिसून आले आहे. ‘टाइम बँक’ पेन्शनचे समर्थन करण्यात स्विस सरकारचा हातखंडा आहे.
(सोशल मीडियावरून साभार)

Web Title: The unique medium of service is 'Time Bank'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.