एकजुटीचे प्रकाशपर्व!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 01:55 AM2020-04-04T01:55:49+5:302020-04-04T01:56:12+5:30
सर्वांनी एकजुटीने कोरोनाचा सामना करणे अपरिहार्य आहे.
- विकास झाडे
देशाला कोरोनाच्या विळख्यातून मुक्त व्हायचे तर विलगीकरणाशिवाय पर्याय नाही; परंतु हे करतानाही या लढ्यात आम्ही भारतीय एक आहोत, याचे विराट दर्शन व राष्ट्रीय एकात्मतेची ताकद रविवारी दाखविली जाणार आहे. १३० कोटी लोकसंख्येच्या भारतात पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा व प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळाचा खूप मोठा अभाव आहे. अशा सर्व सोयीसुविधा असलेला अमेरिकेसारखा देश कोरोनामुळे हतबल होतो व पुढील धोक्यांवर भाष्य करतो. अशावेळी भारतापुढे आव्हानांचे डोंगर आहेत.
सर्वांनी एकजुटीने कोरोनाचा सामना करणे अपरिहार्य आहे. त्यासाठीच केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. रविवारी रात्री प्रकाशाकडे जाण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले आवाहन सर्वांनी सकारात्मकतेने घ्यायला पाहिजे. याआधी २२ मार्चला पाच मिनिटे डॉक्टर, आरोेग्य सेवकांप्रती टाळी, थाळी वाजवून कृतज्ञता व्यक्त केली होती. त्याचा परिणाम असा झाला की, देशभरातील डॉक्टर, परिचारिका व या यंत्रणेत काम करणारे सुरक्षेच्या अपुऱ्या साधनांतही रुग्णांची शुश्रूषा जोमात करायला लागलेत. कोरोना रुग्णांवर उपचार करताना आपणही संक्रमित होऊ शकतो, याची जाणीव असतानाही देशवासीयांकडून मिळालेला पाच मिनिटांचा सन्मान हा त्यांना सर्वोच्च पुरस्कार वाटायला लागला.
रुग्णांवर उपचार करणाºया डॉक्टरांची स्थिती खूप चांगली नाही. ‘कोरोना’पासून बचावासाठी पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई)ची सरकार व्यापक व्यवस्था करू शकत नाही. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ‘एन ९५’ मास्क मिळत नाही, ही शोकांतिका आहे. सुरक्षेची अत्यावश्यक साधने उपलब्ध करण्यास प्रशासन असमर्थ असल्याने गुरुवारी दिल्लीतील हिंदू राव रुग्णालयातील डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिले. साधनांचा तुटवडा बहुतांश रुग्णालयांत आहे.
रुग्णांची शुश्रूषा करणारे देवदूत शाबूत ठेवणे हे देशापुढील प्राधान्य आहे. त्यांचीच हयगय झाली तर फोफावलेल्या कोरोनाचा डोलारा कसा पेलला जाईल? डॉक्टर जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करताहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटता येत नाही. उपचारानंतर त्यांना विलगीकरणात जावे लागते. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाºयांबद्दल भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे डोळे डबडबतात, यातूनच डॉक्टरांच्या दुरवस्थेचे दर्शन होते. डॉक्टर तसेच ‘कोरोना’ रुग्णांची सेवा करणाºया स्वच्छता कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांसाठी केजरीवाल एक कोटी रुपये जाहीर करतात. मात्र, असे शहीद होणे देशहिताचे नाही.
लॉकडाऊननंतर लोक घराघरांत असून, कोट्यवधी लोकांत असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे. ३० ते ४० टक्के लोकांची रोज कमावून आणल्याशिवाय चूल पेटत नाही. छोट्याशा खोलीत ८-१० लोक कोंबून राहतात. कोरोनाच्या विषयावर भारत सरकार उशिरा जागे झाले, अशी टीका करायला वाव आहे. इटली, स्पेन व अमेरिकेत मोठ्या प्रमाणात ‘कोरोना’ची लागण झाली आणि दर दिवशी शेकडो लोक मरायला लागले. त्यानंतरच हा विषय गांभीर्याने घेतला गेला.
सरकारपुढे लॉकडाऊनचा निर्णय सोपा नव्हता; परंतु दुसरा पर्यायही उरला नव्हता. अचानक लॉकडाऊन झाल्याने लोकही भांबावले. काम नाही अन् खायला अन्नही मिळणार नाही, या भीतीपोटी दिल्लीतून चार-पाच लाख मजूर आदेश झुगारत गावाकडे निघाले होते. ‘कोरोना’ची श्रृंखला तोडण्याच्या आदेशाच्या विपरित हे वर्तन होते. असे असले तरी ‘आहे तिथेच थांबा’ या आदेशाचे पालन करणाºयांची संख्याही मोठी आहे. जे जत्थ्याने गेलेतॉ त्यांच्या आरोग्याचे काय? हा प्रश्न आहेच. देशात कोरोना बाधितांची संख्या वाढतेय. निजामुद्दीन मरकजमुळे दिल्लीतील बाधितांची संख्या दुपटीवर गेली. देशभर लॉकडाऊन होते, लोक संयम ठेवून मार्ग काढत गेलेत. इथेही असे करता येऊ शकले असते. समाजमाध्यमांमध्ये यावर अत्यंत वाईट पद्धतीने आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
मोदींनी आवाहन केल्याप्रमाणे उद्या, रविवारी रात्री ९ वाजता लोक घरातील दिवे बंद करून दरवाजात वा बाल्कनीत येऊन दिवा किंवा मोबाईलची फ्लॅशलाइट लावतील. प्रत्येकात एकजुटीची भावना निर्माण करण्याचा मोदींचा हेतू आहे. जे घरात अडकलेत व भविष्याबाबत थांगपत्ता घेऊ शकत नाहीत, अशा असुरक्षिततेच्या वातावरणात हा प्रकाश आत्मविश्वास वाढविणारा ठरेल. लॉकडाऊनमुळे १४ एप्रिलपर्यंत भारतातील कोरोनाची श्रृंखला तोडली जाईल, असे म्हणणे थोडे धाडसाचे ठरणार आहे. एकूणच परिस्थिती पाहता हा कालावधी वाढविला जाऊ शकतो; परंतु तीन आठवड्यांच्या लढाईनंतर पुन्हा काही दिवस संयम ठेवण्याची मानसिकता वाढीस लागेल. हे करत असताना अतिउत्साहींनी संयम ठेवण्याची गरज आहे. काहींना आवाहनाचा इव्हेंट करण्याची सवय जडली आहे.
२२ मार्चला देशाने ते अनुभवले. काही मठ्ठ लोक जत्थ्याने थाळी वाजवत निघाले होते. त्याचे व्हिडिओ शूटिंग करून समाजमाध्यमांवर पसरवित होते. ‘सोशल डिस्टन्स’च्या मोदींच्या उद्देशाला इथेच हरताळ फासला गेला. मात्र, त्याचवेळी देशातील बहुतांश लोक राष्टÑधर्म समजून मोदींच्या हाकेला ‘ओ’ देणारे निघालेत. उद्या असे काही करू नये म्हणून मोदींना अशा लोकांचे कान आधीच धरावे लागले. यामागचा उद्देश त्यांना समजावून सांगावा लागला. चला तर कोरोना संकटाचा सामना पंतप्रधानांच्या आवाहनाप्रमाणे एकजुटीने करूया.