एकता, तत्परता हाच खात्रीशीर मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 03:02 AM2020-04-27T03:02:21+5:302020-04-27T03:02:37+5:30
कोरोनामृत्यू आणि नव्या लोकांना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याउलट जेथे याबाबतीत शिथिलता आहे, तेथे या साथीला आटोक्यात ठेवणे कठीण जात आहे.
-एम. व्यंकय्या नायडू
देश सध्या एका गंभीर आरोग्यसंकटात आहे. कोरोना विषाणूचा जगभर प्रसार सुरूच आहे. आपण भारतात या महामारीचा चिंताजनक प्रसार रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’, ‘सोशल डिस्टन्सिंग’ आणि व्यक्तिगत स्वच्छता हे उपाय योजले आहेत. सामाजिक वर्तनाचे हे नवे मापदंड पाळल्याने आपल्याला फायदा झाला आहे. या उपायांचे जेथे कसोशीने पालन झाले, तेथील कोरोनामृत्यू आणि नव्या लोकांना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याउलट जेथे याबाबतीत शिथिलता आहे, तेथे या साथीला आटोक्यात ठेवणे कठीण जात आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन येथील मोठ्या मेळाव्याच्या निमित्ताने हे कटू वास्तव देशापुढे आले; पण आपण इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून ढिलेपणा दाखवून नकारात्मक भूमिका घेतली तर काय होऊ शकते, याचा हा संदेश आहे. यातून याहून काही वेगळे अर्थ काढून एखाद्या ठरावीक समाजास दूषण देण्याने समाजात निष्कारण दुही माजेल. काही मूठभर लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजास आरोपी मानणे बरोबर होणार नाही.
या महामारीने आपल्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली आहे, हे मात्र नक्की. सण, उत्सव, सामाजिक आणि सांस्कृतिक समारंभांनी आपले सामाजिक जीवन समृद्ध होत असते. हे सर्व एकत्र जमून साजरे करतो. उत्साह व एकीने आनंद साजरा करण्याच्या मानवी प्रवृत्तीस ‘सोशल डिस्टन्सिंग’ मारक ठरणारे आहे; पण तरीही मोठा अनर्थ टाळण्यासाठी आपणही तुलनेने छोटे विस्कळितपण स्वत:हून स्वीकारले आहे. हे क्लेषदायक आहे हे खरे; पण कोरोनाविरुद्धचा लढा जिंकेपर्यंत आपल्याला हा कमी समाधानकारक मार्ग अनुसरणे अपरिहार्य आहे.
या आजाराचे स्वरूप व त्यासाठी घ्यायची काळजी, हे आपण नीटपणे समजून घ्यायला हवे. दिल्लीतील ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, कोरोनाबाधितांकडे संशयाने व तुच्छतेने पाहण्याऐवजी त्यांना चाचणी करून घेण्यास उद्युक्त केले, तर या साथीचा अधिक प्रभावी बंदोबस्त करता येईल. समाजातील स्थान वा धार्मिक विचार बाजूला ठेवून लोकांनी वैद्यकीय मदत घेण्यासाठी पुढे यायला हवे.
खास करून स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना संसर्गित रुग्णांवर उपचार करणाºया डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले तसेच त्यांना वाईट वागणूक देण्याच्या अलीकडे घडलेल्या घटना हादेखील आणखी एक चिंतेचा विषय आहे. या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाºयांकडे रोगाचा प्रसार करणारे म्हणून संशयाने पाहून त्यांना निवासाची सोय नाकारण्याचे प्रकारही घडले आहेत. डॉक्टरांविषयी पूर्वापार नितांत आदराची भावना बाळगली जाणाºया आपल्या देशात असे घडावे, हे केवळ दुर्दैवीच नव्हे, तर निंद्य आहे; त्यामुळे साथीचे रोगप्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून अशी कृत्ये दखलपात्र गुन्हा ठरवून त्यासाठी सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्याचे भारत सरकारने उचललेले पाऊल म्हणूनच अगदी योग्य आहे;
त्यामुळे आरोग्यसेवकांना भोगावा लागणारा हिंसाचार थांबेल, अशी आशा आहे. सरकारने ठरवून दिलेले निर्बंध लोक कसोशीने पाळत आहेत, याने मला आनंद होतो. धार्मिक रुढी व परंपरांचा पगडा दूर सारून सध्याच्या कठीण काळात उपासना आणि प्रार्थनेच्या पद्धती बदलण्याचे आवाहन सर्वच धर्मांचे नेते अनुयायांना करीत आहेत. आपले सामाजिक वर्तन गरजेनुसार बदलण्याची सकारात्मक भूमिका घेणे आपल्याला कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात नक्कीच साह्यभूत ठरेल. आपण शहाणपणाने, तत्परतेने व प्रतिबंधक उपायांकडे निरपेक्ष दृष्टीने पाहून वागलो तरच यात विजयी होऊ शकू. काळजी न घेता कोणताही समाज किंवा धर्म या रोगापासून कवचकुंडले देऊ शकत नाही.
आपण एकदिलाने वागत असल्याने रामनवमी, बैशाखी, रमझान आणि इस्टर यांसारखे सण- उत्सव अगदी अंगवळणी पडल्यासारखे साधेपणाने साजरे करू शकतो, यानेही मला आनंद होतो. यंदा आपण आपापले धार्मिक पावित्र्य आणि शुचिता अशीच आपल्या हृदयात तसेच घरांमध्येच ठेवूया.
(उपराष्ट्रपती)