विद्यापीठ बनले आखाडा
By admin | Published: October 7, 2015 05:14 AM2015-10-07T05:14:49+5:302015-10-07T05:14:49+5:30
विद्यार्थ्यांसाठी पुरेशी वसतिगृहे नाहीत. ती बांधण्याऐवजी बिगर शैक्षणिक बाबींवर पैसा खर्च करण्याचा पायंडा पडत चालला आहे. उज्ज्वल शैक्षणिक परंपरा लाभलेल्या विद्यापीठात आता
- सुधीर महाजन
विद्यार्थ्यांसाठी पुरेशी वसतिगृहे नाहीत. ती बांधण्याऐवजी बिगर शैक्षणिक बाबींवर पैसा खर्च करण्याचा पायंडा पडत चालला आहे. उज्ज्वल शैक्षणिक परंपरा लाभलेल्या विद्यापीठात आता कामाची संस्कृतीच उरलेली नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षण सोडून सर्वच आघाड्यांवर पुढे दिसते. येथे खुशमस्कऱ्यांची गर्दी झाली आहे. जातीयवादाचा जोर वाढत आहे. गटातटाच्या राजकारणाचे सर्कशीचे खेळ आहेत. खेकड्यांची पाय ओढण्याची शर्यत आहे. दबावाचे राजकारण आहे. नाही फक्त शिक्षण.
गेल्या आठवड्यात ‘लोकमत’ ने विद्यापीठात एक स्टिंग आॅपरेशन केले. त्यात एक धक्कादायक बाब पुढे आली. येथे बहुतांश वर्गात शिकविलेच जात नाही. विद्यार्थी दिवसभर वाट पाहतात आणि प्राध्यापक तास घेत नाहीत. हे भयानक वास्तव आहे. ते बाबासाहेबांच्या नावाच्या विद्यापीठातील, ज्यांनी मराठवाड्यात उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली व जे केवळ राजकारणी, घटनातज्ज्ञ नव्हते तर खऱ्या अर्थाने प्रज्ञावंत होते.
कोणत्याही संस्थेचा प्रमुख हा तिचा कणा असतो. त्याची धडाडी आणि दूरदृष्टी संस्थेला पुढे नेते. परंतु, विद्यापीठातील जातीय आणि गटातटाच्या राजकारणाने या प्रमुखाला निष्प्रभ करून टाकले आहे. विद्यापीठातील विविध संघटना त्याना आपल्या तालावर नाचवतांना दिसतात. सकाळी घेतलेला निर्णय संध्याकाळी बदललेला दिसतो. यातूनच त्यांचा प्रशासकीय वकुबही दिसतो. उदाहरण द्यायचे झाले तर व्यवस्थापन सभेच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावरील सदस्यांचा परदेश दौरा. विद्यापीठाच्या खर्चाने हे सदस्य परदेश दौऱ्यावर निघण्याचे जाहीर होताच त्यावर टीका झाली. त्यावेळी कुलगुरू चोपडेंनी इन्कार करीत ही मंडळी स्वखर्चाने जाणार अशी घोषणा केली. पुढे हे सदस्य केटरींग अभ्यासक्रमाच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार अशी मखलाशीही केली. सदस्य दौऱ्यावर गेले. त्यांच्यासाठी विद्यापीठाने १४ लाख रूपये खर्च केले. याबाबत आता काहीही बोलण्यास कुलगुरू तयार नाहीत. खरे तर कुलगुरूंच्याच परेदश दौऱ्यांचा हिशोब मागण्याची वेळ आली आहे.
कुलगुरू चोपडेंची घोषणाबाजी प्रारंभीच दिसली. वर्षभरापूर्वी त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हां, संशोधन प्रकल्प, शिष्यवृत्ती आदींसाठी एक हजार कोटीचा निधी मिळविणार अशी घोषणा केली होती. हा निधी उद्योग जगताकडून उभारण्याचा मानस होता. त्याचा साधा प्रस्तावही अजून तयार नाही. घोषणाही हवेतच विरली. विद्यापीठाच्या परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने २५ लाखांचा पुरस्कार जाहीर करणे अशा घोषणा एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरुऐवजी राजकारण्याच्या वाटतात. विद्यार्थ्यांना पुरेशी वसतिगृहे नाहीत. ती बांधण्याऐवजी अशा बिगर शैक्षणिक बाबींवर पैसा खर्च करण्याचा पायंडा पडत चालला आहे. गेल्या वर्षभरात विद्यापीठात एकही मोठी व्यक्ती आली नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी येणार होत्या. पण त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. कर्मचारी संघटनांच्या दबावाला बळी पडताना कुलगुरू अनेक वेळा दिसतात.
कृष्णा भोगे विभागीय आयुक्त असताना काही काळ कुलगुरूपदाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. त्यांच्या शिस्तीच्या बडग्याने एकदाही आंदोलन झाले नाही. पण आज कुलसचिवांना जाहीर शिवीगाळ होते तरी विद्यापीठ आणि कुलगुरू बघ्याची भूमिका घेताना दिसतात.
विद्यापीठास उज्ज्वल अशी शैक्षणिक परंपरा आहे. डॉ.वा.ल.कुलकर्णी, डॉ. जी.एस.अमूर, डॉ.आर.पी. कुरूळकर, भालचंद्र नेमाडे, गंगाधर पानतावणे, यू.म.पठाण, मोईन शाकीर, सुधाताई काळदाते, डी.बी. पाचपट्टे, आनंद कर्वे अशा प्राध्यापकांनी हे विद्यापीठ गाजविले. ही माणसे म्हणजे वैभव होते. त्याच विद्यापीठात आज शिकविले जात नाही. आधीच दुष्काळ त्यात पोटाला चिमटा देत येथील पालक मुलांना उच्चशिक्षणासाठी पाठवतात. सहाव्या वेतन आयोगानुसार रीडरने आठवड्यातून १६, सहयोगी प्राध्यापकाने १४ तर विभागप्रमुखाने १२ तास घेतले पाहिजे. विद्यापीठात असे प्रामाणिक काम करणारे किती प्राध्यापक आहेत? विद्यापीठात कामाची संस्कृती उरली नाही.