‘पद्मश्री’चे ओझे न झालेले जोडपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 03:29 AM2018-03-20T03:29:12+5:302018-03-20T03:29:12+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाऱ्या डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग या दोघांना एकाच वेळी यंदाचा भारत सरकारचा पदमश्री सन्मान जाहीर झाला.

 Unlawful couple of 'Padmashree' | ‘पद्मश्री’चे ओझे न झालेले जोडपे

‘पद्मश्री’चे ओझे न झालेले जोडपे

Next

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाऱ्या डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग या दोघांना एकाच वेळी यंदाचा भारत सरकारचा पदमश्री सन्मान जाहीर झाला.एखाद्या दाम्पत्याला हा पुरस्कार एकाचवेळी प्राप्त होणे ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील दुसरीच घटना. त्यांना आज दि. २० मार्च रोजी दिल्ली येथे हा नागरी सन्मान प्रदान करण्यात येत आहे. त्यानिमित्त...

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाºया डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग या दोघांना एकाच वेळी यंदाचा भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. एखाद्या दाम्पत्याला हा पुरस्कार एकाचवेळी प्राप्त होणे ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील दुसरीच घटना. आदिवासी भागात केवळ आरोग्यसेवाच न देता त्यांच्या आरोग्याच्या समस्या कशा कमी करता येतील यासाठी सातत्याने संशोधन करण्याचे काम डॉ. बंग दाम्पत्य ३२ वर्षांपासून करीत आहेत. भारतातील सार्वजनिक आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील नवजात बाळांना आरोग्यसेवा, बालमृत्यू आणि स्त्री आरोग्याच्या समस्या याबाबत त्यांनी तयार केलेला उपक्र म आज भारतासह अनेक देशांत लागू करण्यात आला आहे.
आरोग्याच्या सर्वाधिक समस्या या खेड्यांमध्ये आहेत याची त्यांना कल्पना होतीच. पण सगळे संशोधन सुरू होते ते शहरांमध्ये. जिथे जास्त समस्या आहेत तिथेच नवे काम सुरू करायचे असे त्यांनी ठरवले. त्यामुळे गडचिरोली जिल्हा हेच कार्यक्षेत्र निवडून १९८६ साली डॉ. बंग दाम्पत्याने गडचिरोली येथे ‘सर्च’ या संस्थेची स्थापना केली. गावांतील लोकांच्या आरोग्याचे प्रश्न कसे सोडवायचे याचा शोध घेणे हा सर्चचा उद्देश. शहरातील मोठमोठ्या इमारती आणि पांढºया कपड्यातील डॉक्टरांमुळे येथील आदिवासी रुग्णालयात जाण्यास घाबरतात हे डॉ. बंग यांच्या लक्षात आले. त्यामुळे रुग्णालय हे आदिवासींना त्यांचे घर वाटले पाहिजे या भावनेतून घोटूल पद्धतीने धानोरा मार्गावर ‘शोधग्राम’ आकारास झाले. येथे आदिवासींच्या लोकभावनेचा आदर करीत त्यांच्याच आग्रहावरून रुग्णालयाला ‘माँ दंतेश्वरी दवाखाना’ असे नामकरण करण्यात आले. जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण खूप जास्त असल्याचेही डॉ. बंग यांच्या लक्षात आले. शंभर गावांमध्ये त्यांनी बालमृत्यूचे मोजमाप सुरू केले. आज ३० वर्षानंतरही ते मोजमाप नियमितपणे सुरू आहे. नवजात बाळ व त्यांचे मृत्यू हीदेखील मोठी समस्या होती. बरेचदा आजारी बालकांना दवाखान्यात नेलेच जात नाही. तसेच संसाधनांच्या अभावी बाळ रुग्णालयात पोहोचेपर्यंत उशीर झालेला असतो. त्यामुळे गावातल्याच एका स्त्रीने बाळाचा इलाज केला तर ? ही नवीन संकल्पना त्यांच्या मनात आली आणि पुढे ‘होम बेस न्यू बॉर्न केअर’ ही पद्धत उदयास आली. गडचिरोली जिल्ह्यात ३९ गावांत हा प्रयोग सुरू केला. यामुळे नवजात मृत्यूचे प्रमाण ७० टक्के कमी झाले व अर्भक मृत्यूदर घसरून ३० वर आला आहे. भारतात केंद्र शासनाद्वारे पंचवार्षिक योजनेमध्ये या पद्धतीला स्वीकारून व या उपक्रमाचे स्वरूप व्यापक करून ‘आशा’ हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. सामुदायिक आरोग्याचे प्रश्न सोडविताना गडचिरोली जिल्ह्यात दारू आणि तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात होत असल्याची बाब डॉ. बंग दाम्पत्याला लक्षात आली. त्यामुळे लोकचळवळीतून हा प्रश्न सोडविण्याचा ध्यास या दोघांनीही घेतला. यासाठी दारूमुक्ती चळवळ उभारण्यात आली. याच प्रयत्नातून जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली.
हे जोडपे पुरस्कारांच्या ओझ्यामुळे संथ झालेले नाही. आजदेखील डॉ. राणी बंग या दररोज शंभरावर स्त्री रुग्णांना तपासतात. शस्त्रक्रियेची मोठमोठी शिबिरे आयोजित करतात व महाराष्ट्रभर ‘तारुण्यभान’ शिबिर घेत फिरतात. डॉ. अभय बंग यांनी परवाच भारत सरकारला देशासाठी नवा आदिवासी आरोग्य आराखडा सादर केला, आणि हे सर्व करताना सेवाग्राम आश्रमातून लहानपणी मिळालेले सफाई, श्रमदान व प्रार्थना हे संस्कार शोधग्राममध्ये करण्यात ते दोघे व्यस्तच राहणार.

Web Title:  Unlawful couple of 'Padmashree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.