अनावश्यक वाद टाळता आला असता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 04:25 AM2017-07-20T04:25:11+5:302017-07-20T04:25:11+5:30

आठ आठवड्यांची गुप्तता अखेर संपली. कुंबळे यांचा उत्तराधिकारी म्हणून दरदिवशी कुणाचे ना कुणाचे नाव चर्चेत आले. या वादाच्या पार्श्वभूमीवर रवी शास्त्री

The unnecessary dispute could have been avoided | अनावश्यक वाद टाळता आला असता

अनावश्यक वाद टाळता आला असता

Next

- अयाज मेमन

आठ आठवड्यांची गुप्तता अखेर संपली. कुंबळे यांचा उत्तराधिकारी म्हणून दरदिवशी कुणाचे ना कुणाचे नाव चर्चेत आले. या वादाच्या पार्श्वभूमीवर रवी शास्त्री यांचा मुख्य कोच म्हणून राज्याभिषेक झाला. कोच या नात्याने शास्त्री यांच्या सर्वच अटी मान्य करण्यात आल्या का हे समजणे कठीण आहे. प्रत्येक गोष्टीत शास्त्री यांचाच विजय झाला हे कुणी दाव्याने सांगू शकणार नाही.
पदभार सांभाळताच शास्त्री यांनी सर्वांत आधी स्वत:च्या पसंतीचा सपोर्ट स्टाफ मागितला. मागच्या संचालकपदाच्या कार्यकाळात हाच स्टाफ त्यांच्यासोबत होता. खरेतर एकट्या भरत अरुण यांची गरज असताना (कुंबळे यांनी आपल्या कार्यकाळात गोलंदाजी कोचची जबाबदारी देखील स्वत:कडेच ठेवली होती) फारसे बदल करण्याची गरजही नव्हती.
तरीही वाद याच गोष्टींचा होता की रवी शास्त्री आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दबाव तंत्रांचा वापर करीत होते. काही जाणकारांचे हेच मत आहे. क्रिकेट सल्लागार समितीने (सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेली समिती) गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी दोन सल्लागार कोचेस नियुक्त केल्यानंतर नव्या मागणीची खरोखर गरज होती काय?
राहुल द्रविड आणि जहीर खान ही दोन नावे असल्याने हे प्रकरण अधिक संवेदनशील, वादग्रस्त आणि गुंतागुंतीचे झाले. सीएसी, बीसीसीआय आणि प्रशासकीय समिती(सीओए) यांनी अधूनमधून वक्तव्ये केल्यानंतर सल्लागारांची केवळ शिफारस केली होती, नियुक्ती नव्हे, असे स्पष्टीकरण देखील द्यावे लागले.
अशा प्रकाराच्या बेताल वक्तव्यांमुळे सर्व संबंधितांच्या (बीसीसीआय, सीओए आणि विशेषत: सीएसी) प्रतिष्ठेला तडा गेला आहे. सल्लागारांनी स्वत:ची सीमा ओलांडल्याचे वक्तव्य सीओएने करताच आणखी वाद चिघळला. तिघांमध्ये उत्कृष्ट समन्वय असता आणि ओढताण झाली नसती तर हा वाद उद्भवलाच नसता. या वादामुळे केवळ सीएसीची प्रतिष्ठा धुळीस मिळाली असे नाही तर द्रविड आणि जहीर खानसारख्या चांगल्या संघटकांच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे.
द्रविड आणि जहीर हे संघासाठी योग्य आहेत की नाही, हाच मुद्दा होता. दोघांची उपयुक्तता नाही, याविषयी कुणाला शंकादेखील नव्हती. पण त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया ज्या संवेदनशीलतेने हाताळायला हवी होती, जो शिष्टाचार पाळायला हवा होता, तो पाळला गेला नाही, असे खेदाने म्हणावे लागेल.
माझ्यामते एकदा क्रिकेट सल्लागार समितीने ज्यांच्या नावाला मंजुरी दिली त्यानंतर शास्त्री यांना त्यांच्या मनाप्रमाणे स्टाफ उपलब्ध करून देणे सर्वस्वी चुकीचे आहे. हा शिष्टाचार वेळोवेळी पाळला गेला पाहिजे. भारतीय क्रिकेटमध्ये याआधीही अशा शिष्टाचाराचे पालन झाले आहे. नवा पायंडा पाडणे म्हणजे नव्या वादाला जन्म देणे हा अर्थ निघतो. निर्णयाचा क्रम आणि घोषणा यातही दोष होता. राहुल द्रविड आणि जहीर यांच्या नियुक्तीस शास्त्री यांचा विरोध नव्हताच असेही सांगण्यात आले. मागच्यावर्षी शास्त्री हे कुंबळेच्या तुलनेत माघारले त्यावेळीही त्यांनी द्रविड आणि जहीर यांच्या उपयुक्ततेची वकिली केली होती. जहीर आणि द्रविड यांना कुणाचाही विरोध नव्हता तर कोचच्या नियुक्तीनंतर सपोर्ट स्टाफच्या उपलब्धतेवर निर्णय घ्यायला हवा होता. घोड्याच्या आधी गाडी का दौडविण्यात आली हे कळायला मार्ग नाही. आता या गोष्टी भूतकाळात गेल्या आहेत.
भारतीय संघ देशाबाहेर खेळत असल्यास द्रविड आणि जहीर यांना सल्लागार म्हणून नेमण्यात यावे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जात असल्याने सध्यातरी सर्व लक्ष कोहली आणि शास्त्री यांच्यावरच असेल. लंकेच्या खेळाडूंची कामगिरी ढेपाळल्यामुळे हा दौरा सोपा मानला जात आहे. पण घरच्या मैदानावर लंकेला नमविणे सोपे नाही, हेच खरे. अशावेळी संपूर्ण दडपण असेल ते उत्कृष्ट रँकिंग असलेल्या टीम इंडियावर.
शास्त्री आणि कोहली या जोडीने पहिल्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी बजावली. अशातच मागच्यावर्षी शास्त्री यांची उचलबांगडी झाली तेव्हा कोहली स्वत:ची निराशा लपवू शकला नव्हता. आता पुनर्मिलन झाले. पण पुनर्मिलनापूर्वी जे नाट्य घडले ते सर्वांनी पाहिले आहे. कोहली- शास्त्रींकडून अपेक्षा वाढल्या आहेत. दोघांची मैत्री जुनी असेल पण आव्हाने नवीन आहेत.

( लेखक लोकमतचे संपादकीय सल्लागार आहेत)

Web Title: The unnecessary dispute could have been avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.