अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:09 AM2024-05-22T11:09:52+5:302024-05-22T11:11:24+5:30

विनानोंदणी- विनाक्रमांकाची गाडी रस्त्यावर आणण्यापासून ते पबमध्ये अशा बाळांना दारू मिळेपर्यंत, रात्रभर पब उघडे ठेवणाऱ्या पोलिसांपासून ते चुकीचे अहवाल देणाऱ्या डॉक्टरांपर्यंत. याच संवेदनशून्य यंत्रणेने हे दोन खून केले आहेत आणि अशा मुजोर बाळांना मोकाट सोडले आहे! हे मस्तवाल बाळ आणि यंत्रणेतील संवेदनशून्य अधिकारी यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत!

Unrestricted insubordination's essay Such things will not stop unless this boy and insensitive officials are punished | अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत

अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत

बड्या बापाचा ‘अल्पवयीन’ गणला गेलेला पोरगा पबमध्ये बेधुंद होऊन पहाटे बाहेर पडतो. या तर्राट बाळाच्या सुसाट आलिशान मोटारीखाली दोघांचा जीव जातो. डोळ्यात नवी स्वप्नं असणारी तरुण मुलं त्या गाडीखाली चिरडली जातात. मग अगदी आमदारांपासून सगळ्या यंत्रणा खडबडून जाग्या होतात. गुन्हे दाखल करण्यासाठी नव्हे, तर त्या ‘बाळाला’ वाचवण्यासाठी! आणि,  या बाळाला शिक्षा काय सुनावली जाते? अपघात या विषयावर निबंध लिहिण्याची! कायद्याची एवढी क्रूर थट्टा कधीच कोणी केली नसेल. पुण्यातील ही घटना यंत्रणेच्या, व्यवस्थेच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगणारी आहे. वयाची खात्री न करता पोराला दारू दिल्याप्रकरणी पबमालकासह कर्मचाऱ्यांना आणि अल्पवयीन मुलाला मोटार चालवण्यास दिल्याप्रकरणी बापाला अटक झाली आहे.

अशा प्रकरणात पहिल्यांदा उकळी फुटते ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या चर्चांना. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ हा शहरांतील ‘नाइट लाइफ’मधून नियमित घडणाऱ्या गुन्ह्याचा प्रकार. मोटार वाहन कायद्यात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाईची तरतूद आहे. पुण्यातील या बिघडलेल्या पोराने सगळ्याच नियमांच्या चिंधड्या उडवत दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना ठोकरले.

अमाप श्रीमंतीतून आलेली मग्रुरी आणि पैशाने काहीही विकत घेऊ शकतो, याची बेमुर्वतखोर खात्री असल्यानं दारू पिल्यानंतर त्याच्या बधिर मेंदूचे नियंत्रण सुटले आणि मोटारीच्या गतीने बघताबघता दोनशेचा काटा ओलांडला. दारू पिऊन बेभान झाल्यानंतर बेफाम वाहन चालवणाऱ्यांना कायद्याचा धाक नसण्याचे मुख्य कारण म्हणजे, कायद्यात शिक्षेच्या तरतुदी असल्या तरी त्यांची अंमलबजावणी जवळपास शून्य. देशभरात गेल्या वर्षी केवळ १६ हजार, तर पुण्यात अडीच वर्षांत अवघ्या हजार जणांवर कारवाईचे सोपस्कार करण्यात आले आहेत. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची तपासणी करणारी यंत्रणा ३१ डिसेंबरच्या दरम्यान किंवा असल्या घटना घडल्यावरच तपासणीसाठी ‘ब्रेथ ॲनालायझर’ नावाचे उपकरण हाती घेते. गुन्हे दाखल करते. इतर वेळी चिरीमिरी घेऊन प्रकरणे मिटवली जातात. उच्चभ्रू हॉटेल्स-बार-पब्जच्या आसपास बड्या धेंडांकडून वसुली करून त्यांना सोडून देणाऱ्या पोलिसांची कमी नाही. कायद्याच्या वाटेवर चालणारी ‘काय-द्यायची’ वाटमारी. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवण्याचा गुन्हा करणारे सापडले तरी सहीसलामत घरी जातात. सोपस्कार आटोपताना ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधितास ताब्यात घेऊन वाहन आणि ते चालवण्याचा परवाना जप्त केला जातो. न्यायालयासमोर उभे केले जाते. तेथे गुन्ह्यानुसार शिक्षा सुनावली जाते.

दंड भरल्यानंतर सुटका होते आणि वाहन ताब्यात येते. गुन्हा कबूल केल्यानंतर परवाना सहा महिन्यांसाठी रद्द होतो. मग सहा महिन्यांनी लेखी माफी मागितल्यावर परत मिळतो. देशभरात असे गुन्हे दाखल झालेल्यांत उच्चभ्रू मोटारचालकांऐवजी रिक्षा चालवणारे किंवा साध्यासुध्या बारमधून बाहेर पडणारे दुचाकीस्वारच जास्त. मध्यंतरी काही हिकमती पोलिस अधिकाऱ्यांनी असे गुन्हे दाखल करण्यासाठी आणि त्यात सापडलेल्यांना अद्दल घडवण्यासाठी शक्कल लढवली. रात्री ‘बार’पासून काही अंतरावरच पोलिस उभे केले. भराभर गुन्हे दाखल होऊ लागले. मद्यपी वाहनचालकांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात बसवून ठेवायचे, मग दुसऱ्या दिवशी सायंकाळी न्यायालय बंद होताना यांना हजर केले जायचे. शिवाय त्यांचे नाव-गाव-पत्त्याला प्रसारमाध्यमांतून प्रसिद्धी! दंड, वकिलाची फी, पोलिसांची चिरमिरी देऊन अनेक महिने मनस्ताप पदरी पडल्यामुळे काही प्रमाणात चाप बसला, पण पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती. काही वर्षांपूर्वी महामार्गालगतची मद्यविक्रीची दुकाने हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता; पण पळवाटा काढत काहींनी अंतर मोजण्यासाठी शक्कल लढवली तर काहींनी शहरी क्षेत्र, ग्रामीण क्षेत्र अशी विभागणी केली. आज ती सगळी मद्यालये सुरू आहेत. अगदी मध्यरात्रीपर्यंत. त्याचवेळी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या कायद्यातील तरतुदी कडक केल्या जात आहेत, केवळ कागदावरच! हे घडते, कारण या मारेकऱ्यांच्या गर्दीत रामशास्त्रीही सामील असतात. यंत्रणा सामील असते. पुण्यातल्या घटनेत ड्रायव्हिंग सीटवर ‘बाळ’ नव्हतेच, तर ही यंत्रणाच होती!

विनानोंदणी- विनाक्रमांकाची गाडी रस्त्यावर आणण्यापासून ते पबमध्ये अशा बाळांना दारू मिळेपर्यंत, रात्रभर पब उघडे ठेवणाऱ्या पोलिसांपासून ते चुकीचे अहवाल देणाऱ्या डॉक्टरांपर्यंत. याच संवेदनशून्य यंत्रणेने हे दोन खून केले आहेत आणि अशा मुजोर बाळांना मोकाट सोडले आहे! हे मस्तवाल बाळ आणि यंत्रणेतील संवेदनशून्य अधिकारी यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत!
 

Web Title: Unrestricted insubordination's essay Such things will not stop unless this boy and insensitive officials are punished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.