...तोपर्यंत जलिकट्टूसारखे संस्कृती-संघर्ष अटळच!

By admin | Published: January 25, 2017 11:29 PM2017-01-25T23:29:33+5:302017-01-25T23:31:56+5:30

संस्कृती म्हणजे काय? ‘जलिकट्टू’ या खेळावरून तामिळनाडूत जो राजकीय व सामाजिक गदारोळ गेला पंधरवडाभर चालू आहे, त्यानं हा प्रश्न निर्माण केला आहे.

Until then, the culture-struggle like Jalacultu was inaccessible! | ...तोपर्यंत जलिकट्टूसारखे संस्कृती-संघर्ष अटळच!

...तोपर्यंत जलिकट्टूसारखे संस्कृती-संघर्ष अटळच!

Next

संस्कृती म्हणजे काय? ‘जलिकट्टू’ या खेळावरून तामिळनाडूत जो राजकीय व सामाजिक गदारोळ गेला पंधरवडाभर चालू आहे, त्यानं हा प्रश्न निर्माण केला आहे. ‘आपलं जगणं माणसानं नटवण्याची पद्धत म्हणजे संस्कृती’ अशी एक अगदी सोपी; पण मूलभूत विचार मांडणारी व्याख्या मराठीतील एक मान्यवर समीक्षक दिगंबर पाध्ये यांनी केली होती. मग ‘जगणं नटवणं’ म्हणजे काय? ..तर मूलभूत गरजा भागवल्या गेल्यानंतर, ‘कसं जगायचं’ याची माणसानं आपल्या परीनं उभी केलेली चौकट. हे ‘कसं जागयचं’ ते माणूस कधी ठरवू लागला? म्हणजे मानवी संस्कृतीची सुरुवात कशी झाली? आपण ‘मनुष्यप्राणी’ होतो, तेथूनच ही सुरुवात करावी लागेल. उत्क्रांतीच्या ओघात माणूस व प्राणी यांच्यातील फरक होत गेला आणि माणसाचा मेंदू विशिष्ट प्रकारे विकसित होत जाऊन त्याला ‘बुद्धी’ मिळाली आणि मग तो ‘माणूस’ झाला. या उत्क्रांतीच्या ओघात माणूस त्या त्या काळाच्या संदर्भात ‘कसं जगायचं’ हे ठरवत गेला. जेव्हा माणसांच्या एका गटाचा दुसऱ्याशी संपर्क झाला, संबंध घनिष्ट होत गेला, तेव्हा त्या गटाच्या जगण्याच्या पद्धतीतील काही त्यानं उचलल्या, जसा दुसरा गटही त्याच्याकडून काही शिकला. माणसाची संस्कृती अशी घडत गेली आणि आजही अजून ती घडत आहे. मात्र जेव्हा ‘आम्ही म्हणतो, तीच संस्कृती’ - म्हणजे आम्ही सांगतो तसंच जगा-- असा आग्रह धरण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा संघर्ष उद्भवतो आणि अशा संस्कृती--संघर्षाची मानवी इतिहासात प्रदीर्घ परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर आजचा ‘जलिकट्टू’चा वाद आपण बघितला, तर काय आढळतं?
माणूस व प्राणी हे शतकानुशतकं एकत्र राहत आले आहेत. प्राण्यांशी कसं वागायचं, हे माणसाला चांगलं कळतं आणि माणूस कसा आहे, त्याच्यापासून काय व कसा धोका आहे, हे प्राण्यालाही कळतं. एकत्र राहत आपापल्या परीनं जगायला दोघंही शिकले आहेत. म्हणूनच ‘बळी तो कान पिळी’ हा जंगलचा कायदा हिंस्र प्राण्याला जसा उमजतो, तसंच माणूस आपल्यापेक्षा हिंस्र बनू शकतो, हे जाणून प्राणीही त्याच्यापासून दूर राहू पाहत असतो. गडबड होते, ती दोघं एकमेकाच्या वाटा चुकले कीच!
येथेच माणूस घडवत असलेल्या त्याच्या विकासाचा प्रश्न येतो... आणि हा विकास ‘कसं जगायचं’ यासाठी माणूस जी चौकट उभी करतो, त्याच्याशी निगडित असते. येथेच ‘जगणं नटवणं’ - म्हणजेच संस्कृती - हा वादाचा मुद्दा बनतो. अशा प्रकारे ‘जगणं नटवण्या’चा उद्देश काय आणि तो गाठण्यासाठी काय केलं जातं, हा प्रश्न कळीचा ठरतो. ‘सुखी - समाधानी’ आयुष्य जगणं, हे माणसाचं प्राथमिक उद्दिष्ट असतं, निदान असायला हवं. पण प्रत्येकाची ‘सुख-समाधाना’ची कल्पना वेगवेगळी असू शकते. नव्हे ती तशी असतेच. पण माणूस एकटा होता किंवा त्याचा समूह छोटा होता, तेव्हा ‘सुख-समाधाना’च्या वेगवेगळ्या कल्पना असणं आणि त्या पुऱ्या करता येणं अशक्य नव्हतं. पण मानवी समूह
वाढत गेला आणि त्याला विविध प्रकारे आकार येत जाऊन सध्याचं जग तयार झालं, तेव्हा समूहांच्या किमान ‘सुख-समाधाना’ची व्यापक व्याख्या करणं अपरिहार्य बनलं. त्यातूनच समाजाच्या नियमनासाठी आजच्या आधुनिक राज्यव्यवस्थेची आणि त्यासाठी केलेल्या कायद्याची निर्मिती झाली. आपलं ‘जगणं नटवण्या’च्या व्यक्तीच्या प्रयत्नांना अशी व्यापकतेची मर्यादा घातली गेली.
आजचा ‘जलिकट्टू’चा वाद हाही व्यापकतेची मर्यादा पाळायची की नाही आणि ही मर्यादा आमच्या ‘संस्कृती’शी मेळ खाते की नाही, या दोन मुद्द्यांशी निगडित आहे. ...आणि या दोन मुद्द्यांवरून होणारा वाद हा ‘न्यायालय’ या व्यासपीठावर बसून सोडवला जाणं अशक्य आहे. हे भान राखलं न गेल्यानंच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाद ठरवणारा वटहुकूम प्रथम काढून नंतर तसा कायदा तामिळनाडू सरकारनं करवून घेतला. त्याला केंद्र सरकारची संमती होती. सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. आता ‘जलिकट्टू’ला परवानगी दिली गेल्यावर महाराष्ट्रातील बैलगाड्यांच्या शर्यतीपासून देशाच्या इतर राज्यांतील अशा प्रकारच्या खेळांनाही कायदेशीर मान्यता मिळाली पाहिजे, असा धोशा लावला जात आहे.
या सगळ्या वादात एक गोष्ट विसरली जात आली आहे. ती म्हणजे ‘मनुष्यप्राण्या’चा ‘माणूस’ होण्याची जी उत्क्रांती सुरू झाली, त्यात माणसातील ‘प्राणीपण’ संपत जाऊन ‘माणूसपण’ वाढत जाणं अपेक्षित आहे. माणसानं आपल्या बुद्धीच्या जोरावर निसर्गावर काबू मिळवत समूहांच्या ‘सुखी-समाधाना’ची संकल्पना अधिकाधिक व्यापक केली आहे. या प्रयत्नात अनेकदा माणसानं आपल्या हव्यासापायी विध्वंसही घडवून आणला आहे. आजही ते घडत असतं. पण माणसाचा प्रवास हा जास्तीत जास्त ‘माणूसपण’ मिळवण्याच्या दिशेनं होत आहे, एवढं निश्चित. म्हणून प्राण्यांनाही हक्क आहेत, त्यांनाही चांगलं जगता आलं पाहिजे, असं मानलं जाऊ लागलं आणि तसे कायदेही केले गेले.
मात्र ‘माणूसपण’ आम्ही जपतो, ‘तुम्ही अजूनही रानटीच आहात’, असं एक गट म्हणतो आणि त्याला उत्तर म्हणून दुसरा गट सांगतो की, ‘ही आमची संस्कृती आहे, प्राणी हा आमच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, तेव्हा त्यांना कसं वागवायचं हे तुम्ही कोण सांगणार, आम्हाला हा कायदा मान्य नाही’, तेव्हा अटीतटी सुरू होऊन सारी गडबड उडते.
ती नुसती ‘जलिकट्टू’ वा बैलगाड्यांच्या शर्यतीवरूनच नव्हे, तर भटकी कुत्री वा नागरी वस्तीत वाघ किंवा बिबळे येण्याच्या घटनांवरूनही होते. माणूस की प्राणी, असा संघर्ष निर्माण झाल्यास, प्राधान्य माणसालाच मिळाले पाहिजे, यात वादच असता कामा नये. पण ‘माणूस आणि प्राणी’ असा विचार झाला तर हा संघर्ष टळू शकतो. मात्र तसा तो फारसा होत नाही; कारण ‘जगणं नटवण्या’त सुख-समाधानाच्या पलीकडं हव्यास येत गेला आहे आणि या हव्यासाचा पाया हा पैसा आहे. म्हणूनच आज ‘जलिकट्टू’चा वाद उद्भवतो; कारण त्यात कोट्यवधींचा व्यवहार आहे. दुसऱ्या बाजूला असेच व्यवहार असलेल्या घोड्याच्या शर्यतीबाबत मात्र प्राणीहक्कांच्या संदर्भात जागरूकता दाखवणारे मूग गिळून बसतात.
...कारण या शर्यती हा आपल्या ‘जगणं नटवण्या’चा भाग आहे, असं त्या बघायला व त्यावर सट्टा खेळायला जाणाऱ्यांना वाटत असतं. म्हणूनच हा संघर्ष न्यायालयात सुटणारा नाही. तो सुटण्यासाठी ‘जगणं नटवण्या’त प्रगल्भता आणण्याचं समाजभान आकाराला येण्याची गरज आहे.-प्रकाश बाळ (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभ लेखक)

Web Title: Until then, the culture-struggle like Jalacultu was inaccessible!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.