अलिखित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2016 03:51 AM2016-04-03T03:51:04+5:302016-04-03T03:51:04+5:30

मॅनर्सचा हा अभाव फक्त हातातल्या यंत्रापुरताच मर्यादित नाही. गाडी चालवताना सगळ्यात जास्त त्रास कशाचा होत असेल तर बाजूचा स्वच्छ, सुंदर फुटपाथ सोडून रमतगमत रस्त्यावरून

Unwritten | अलिखित

अलिखित

Next

- शिल्पा नवलकर

मॅनर्सचा हा अभाव फक्त हातातल्या यंत्रापुरताच मर्यादित नाही. गाडी चालवताना सगळ्यात जास्त त्रास कशाचा होत असेल तर बाजूचा स्वच्छ, सुंदर फुटपाथ सोडून रमतगमत रस्त्यावरून चालणाऱ्या माणसांचा. रस्त्याच्या कडेला घोळका करून गप्पा मारणाऱ्यांचा. कानात हेडफोन घालून संगीत ऐकत रस्ता ओलांडणाऱ्यांचा... पुढच्या गाडीची काच खाली करून ‘पुरा भारत कचरे की पेटी है’ या अतूट विश्वासाने कागदाचा बोळा रस्त्यावर फेकणाऱ्या सुशिक्षित असंस्कृतांचा....

अगदी पहिली दुसरीत असताना आपल्याला काही मॅनर्स शिकवले जातात. कधी शाळेच्या पुस्तकातून तर कधी वडीलधाऱ्यांकडून... चांगल्या सवयी, अदब, शिष्टाचाराचे धडे दिले जातात, पण ‘माफ करा’, ‘धन्यवाद’ या शब्दांचा सढळ वापर करावा. मोठ्यांशी आदराने वागावे. या पलीकडे काही शिकवण्याची गरज त्या वेळी ना हे शिकविणाऱ्या पुस्तकांना भासली ना शिकणाऱ्या आपल्याला... गरजेप्रमाणे ‘सॉरी’, ‘थँक यू’ म्हणत राहिलं, बोलण्यात विनम्रता ठेवली की, आपले मॅनर्स उत्तम, जागच्या जागी. हे असं आपण ठरवून टाकलं... आणि त्या पलीकडे विचारच करायचे थांबलो... पण मॅनर्स, अदब या शब्दांचा अर्थ, त्याची व्याख्या विस्तारण्याची वेळ आली आहे, हे आपल्यापैकी कित्येकांच्या लक्षातच आलं नाहीये का?

नाटक ऐन रंगात आलेलं असतं. स्टेजवरचा कलाकार जीव तोडून काम करत असतो... आणि प्रेक्षकांमध्ये मोबाइल वाजतो. वाजतच राहतो. बाई संथ गतीने पर्समधून फोन काढतात. तो कानाला लावून हलक्या आवाजात म्हणतात, ‘अगं मी नाटकाला आलेय. संपल्यावर फोन करते. घरीच असशील नं?’ बार्इंच्या मते हलका असलेला त्यांचा आवाज पार स्टेजपर्यंत ऐकू जातो आणि एकाग्रता ढळलेला कलाकार मनातल्या मनात म्हणतो, ‘नंतर कशाला? इतकं महत्त्वाचं असेल तर आताच बोलून घ्या ना... आम्ही थांबतो तोवर...’ सगळे प्रेक्षक जरी फोनवर बोलले नाहीत, तरी सार्वजनिक ठिकाणी आपला मोबाइल ढणाढणा वाजणार नाही, याची काळजी घेणं आपल्याला अजूनही जड का जातं?
हॉस्पिटल, प्रेतयात्रा अशा ठिकाणीही हमखास फोन वाजतात. सतत येणारे मेसेज आपला घंटानाद ऐकवत राहतात, पण फोनच्या मालकाला जराही अपराधी वाटत नाही. किंबहुना, अपराधी वाटावं असं काहीतरी आपल्याकडून घडतेय, याची किंचितही जाणीव त्याला नसते... गंभीर काहीतरी घडत असेल, तर फोनचा आवाज येऊ नये असं नाही, तर कुठल्या ठिकाणी संवाद घडत असेल किंवा शांतता असेल, तिथे आपल्या हातातल्या यंत्रातून सतत चित्रविचित्र आवाज येत राहणार नाहीत, हे बघण्याचे अलिखित मॅनर्स आपल्यात आता बिंबायला नकोत? अडीअडचणीसाठी सोबत फोन असावाच. महत्त्वाचा कॉल असेल, तर तो वाजावाही... पण २४ तास येत राहणारे ग्रुप मेसेजेस इतरांची चिडचीड होईपर्यंत किणकिणत राहतात, हे कोणालाच का टाळावंसं वाटू नये?
माझा एक जवळचा नातेवाईक कुटुंबात कुठलाही समारंभ असला, तरी सोबत त्याचा आयपॅड घेऊन येतो. अगदी लग्नमुंजीपासून ते पार्टीपर्यंत कुठेही... आणि आजूबाजूला अनेक महिन्यांनी भेटलेला जिवलग गोतावळा असला, तरी मान खाली घालून वाचत राहतो किंवा चक्क खेळत बसतो... म्हणायला उच्चशिक्षित, उच्चपदस्थ... पण इतकं उद्धटपणाचं दृश्य कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी असूच शकत नाही, हे कळण्याइतकी मात्र त्याच्या बुद्धीची झेप नाही.... समोरचा माणूस आपल्याशी बोलत असताना हातातल्या फोनकडे लक्ष देणं, संवाद घडत असताना कानाला हेडफोन लावून ठेवणं, न विचारता पटकन कोणाचाही फोटो काढणं, मागच्याला खोळंबून ठेवत जागच्या जागी उभं राहून सेल्फी काढून झाल्याशिवाय पुढे न हलणं ही आता मॅनरलेस असण्याची नवी लक्षणं आहेत, हे कुठलं पुस्तक शिकवणार आपल्याला?
आपण देवळात जाताना चप्पल नाही ना घालून जात?... हा विचार आपल्याला जितका असह्य वाटतो, तितकंच जिथे अचानक आपला फोन ‘शांताबाई शांताबाई..’ असं रेकायला लागणं असह्य का नाही वाटतं?... परीटघडीचे कपडे घालून भर रस्त्यावर मांडी घालून बसलेला पांढरपेशा माणूस मी तरी अजून बघितलेला नाहीये. तरी अशी वरवर सुसंस्कृत भासणारी ५-६ माणसं रोज माझ्या गाडीजवळून त्यांच्या फोनवर मेसेज टाईप करत-करत चालत जातात... त्यांना उतरून मी काही मॅनर्स शिकवले, तर त्यांना त्यांचं नेमकं काय चुकतंय, हे लक्षात तरी येईल का? तर नाहीच... कारण मोबाइल मॅनर्स हे आता ‘सॉरी’, ‘थँक यू’ इतकेच महत्त्वाचे झाले आहेत, हा विचार रुजणं तर दूरच, तो कित्येकांच्या मनाला अजून शिवलाही नाहीये...
मॅनर्सची ही बदलेली अलिखित परिभाषा आपल्या आधीची पिढी आपल्याला शिकवू शकत नाही... ती आपली आपणच शिकायला हवी... मी माझ्याच कोशात राहून इतरांना त्रास होईल, अशा छोट्या-छोट्या चुका करून बसत नाहीये ना, हे चाचपून बघायला हवं... तरच जे मॅनर्स आपल्याला आधीच्या पिढीने शिकवले, त्याहून खूप जास्त आपल्याला पुढच्या पिढीला शिकवता येतील.

(एप्रिल महिन्याच्या मानकरी असलेल्या लेखिका प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका आहेत)

Web Title: Unwritten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.