अस्वस्थ, ‘लॉकडाऊन’ जोडप्यांचा ‘एक दुजे के लिये’ आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 06:13 AM2020-09-24T06:13:38+5:302020-09-24T06:15:59+5:30
सोशल मीडियाच्या काळात व्यक्त होण्यासाठी कैक साधनं तंत्रज्ञानानं आपल्या हातात दिलेली असतानाही ‘केवळ आपलं प्रेम कुटुंबाला रुचेल का?’ या भयग्रस्त जाणिवेपोटी दोन युगुलांनी स्वत:चा जीव गमावला, हे वास्तव विषण्ण करणारं खरंच!
- सचिन जवळकोटे। निवासी संपादक, लोकमत, सोलापूर
नाव तिचं प्रतीक्षा. दहावीत शिकणारी. तारुण्याची फुलं अजून उमलायची होती; मात्र गेल्या आठवड्यात तिचा मृतदेह गावालगतच्या शिवारात लिंबाच्या झाडाला लटकलेला आढळलेला. याच झाडावर आणखी एका तरुणाचा मृतदेह लोंबकळत होता. त्याचंही शिक्षण केवळ बारावीपर्यंत झालेलं. गावात खालची मान वर न करणारी ही कोवळी पोरं थेट मान लटकवत गेली. मोहोळ तालुक्यातील नरखेडच्या या घटनेनं सोलापूर जिल्हा हळहळला. तिसऱ्या दिवशी याच तालुक्यातील सोहाळे गावात आणखी दोन मृतदेह आढळले. कहाणी तशीच. गावाबाहेरच्या वस्तीतील एका पत्राशेडमध्ये एकाच दोरीनं एका युगुलानं गळफास घेतला. ती विशीतली, तो पंचविशीतला. आता मात्र पश्चिम महाराष्टÑ हादरला. नवी पिढी कळवळली. जुनी पिढी भूतकाळात गढून गेली. त्यांना पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वीचा ‘एक दुजे के लिये’ चित्रपट आठवला. ‘आपण एकत्र जगू शकत नाही, तर मग एकत्र मरू तरी शकतो,’ हा त्यातला क्लायमॅक्स अनेक प्रेमींचं आयुष्य उद्ध्वस्त करून केला. कैक युगुलांनी त्यावेळी आत्महत्या केली. मात्र तो काळ वेगळा होता. आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी. चाळीस वर्षांपूर्वी जात, पात, धर्म, प्रांत अन् भाषा यांचा समाजावर प्रचंड पगडा. ग्लोबलायझेशनमध्ये सारेच एका पातळीवर आलेले असं म्हणतो आपण; पण प्रत्यक्षात हे भेदाभेद अधिक पक्केच झालेले असावेत की काय, असं सगळं चित्र.
सोशल मीडियाच्या काळात व्यक्त होण्यासाठी कैक साधनं तंत्रज्ञानानं आपल्या हातात दिलेली असतानाही ‘केवळ आपलं प्रेम कुटुंबाला रुचेल का?’ या भयग्रस्त जाणिवेपोटी दोन युगुलांनी स्वत:चा जीव गमावला, हे वास्तव विषण्ण करणारं खरंच! यांचे लटकणारे मृतदेह जेव्हा खाली उतरविले गेले, तेव्हा संबंधितांचा टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. घरची मंडळी म्हणत होती, ‘आम्हाला अगोदरच विश्वासात घेतलं असतं तर आम्ही थोडंच नाही म्हणालो असतो?’
या दोन्ही घटनांची जास्त खोलात जाऊन चौकशी केली, तेव्हा एक साम्य लक्षात आलं. ‘लॉकडाऊन’मुळं शहरातले रोजगार गमावून बसलेले दोन्ही प्रियकर आपापल्या गावी आलेले. नोकरीची शाश्वती गमाविल्यानं दोन्ही तरुणांच्या डोळ्यासमोर अंध:कार ! त्यात गेल्या सहा महिन्यांपासून घरातली मंडळी अधिकाधिक वेळ घरातच. भेटीसाठी मनसोक्त वेळ मिळेना. मोबाइलवर मुक्तपणे बोलण्यासही बंधनं आली. यातूनच भविष्यातली स्वप्नं डळमळीत झाल्याचं पाहून त्यांनी वर्तमानात ‘दोरीचा आधार’ घेतला.
‘लॉकडाऊन’चा हा नवा ‘इफेक्ट’ गावोगावी प्रकर्षानं जाणवू लागला आहे. घरात कायमची वर्दळ वाढली. बाहेर फिरण्याचं स्वातंत्र्य हरपलं. बंद दाराआडच्या या घुसमटीचे अनेक चेहरे आता समोर येऊ लागले आहेत. घरातून पळून जाणाºया तरुणींच्या संख्येत वाढ झाल्याची आकडेवारीही हाती येते आहे. यातही धक्कादायक गोष्ट म्हणजे अल्पवयीन मुलींचं प्रमाण सर्वाधिक.
अहमदनगर जिल्ह्यात हा आकडा तीनशेपर्यंत पोहोचलाय, तर नाशिक जिल्ह्यात पन्नास एवढा. सध्या शाळा-कॉलेज बंद. खासगी क्लासेसही आॅनलाइन. त्यात पुन्हा बाहेर भेटण्याची ठरलेली सारीच ठिकाणं कुलूपबंद. मग यात थिएटर-गार्डन आलं. हॉटेल्स-ज्यूस बारची अवस्थाही तशीच. घरात सर्वांसमोर व्हिडिओ कॉलिंग करणंही मुश्कील. यामुळं घरच्या भिंतीचं अन् भीतीचं बंधन झुगारून मुली आपला असा वेगळा मार्ग शोधू लागल्या आहेत असं म्हणावं का? मंद्रुप गावातला किस्सा तर अधिक धक्कादायक. एका शेतगड्याची पंधरा वर्षांची पोरगी गावातल्या पोरासोबत पळून गेली. आई-वडील पोलीस ठाण्यात धावले. मुलाला अटक होणार म्हणताच ती पोरगी स्वत:हून ठाण्यात हजर झाली अन् ‘मी आजीकडं स्वखुशीनं गेले होते,’ असा खोटा जबाब देऊ लागली. या वयातला हा धाडसीपणा पाहून अधिकारीही चाट पडले; मात्र आजीनं हात वर करताच पोरासह त्याच्या कुटुंबाचीही उचलबांगडी झाली.
सोशल मीडियामुळं काळ कुठल्या कुठे धावतोय. जळगावची एक विवाहिता फेसबुकवरचा फोटो पाहून उत्तर प्रदेशातल्या तरुणाच्या प्रेमात पडते. घरदार विसरून ती थेट नेपाळच्या सीमेपर्यंत पोहोचते. पतीला घटस्फोटही द्यायला तयार होते. दुसरीकडं लातूरचा एक तरुण सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका तरुणीला भेटण्यासाठी थेट पाकिस्तान सीमेवर जातो. या साºया घटना अस्वस्थ करणाºया तर आहेतच; पण शोधू गेलं तर त्या सगळ्यात जे एक नातं सापडतं, ते या विचित्र काळाचा उलगडा थोड्या विचित्र पद्धतीने करू पाहातं आहे.