अमेरिकेतील हत्त्याकांड
By admin | Published: June 14, 2016 04:18 AM2016-06-14T04:18:16+5:302016-06-14T04:18:16+5:30
अ मेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातल्या आॅरलॅन्डो येथील समलिंगी संबंध ठेवणाऱ्या नागरिकांच्या ‘नाईट क्लब’मध्ये घुसून एका तरूणाने केलेल्या गोळीबारात ५० जण मारले गेले असून किमान ८६ जण
अ मेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातल्या आॅरलॅन्डो येथील समलिंगी संबंध ठेवणाऱ्या नागरिकांच्या ‘नाईट क्लब’मध्ये घुसून एका तरूणाने केलेल्या गोळीबारात ५० जण मारले गेले असून किमान ८६ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. न्यूयॉर्क येथील ९/११ च्या हल्ल्यानंतर दहशतवादी कृत्यात इतके जण मारले जाण्याची गेल्या १६ वर्षांतील अमेरिकेतील ही पहिलीच घटना आहे. पण ९/११ चा हल्ला आणि शनिवारची घटना यांत गुणात्मक फरक असल्याचे लक्षात घेण्याची गरज आहे. न्यूयॉर्कवरील हल्ला हा संघटित दहशतवादाचा प्रकार होता. उलट शनिवारी रात्री आॅरलॅन्डोे येथे ‘नाईट क्लब’मध्ये घुसून गोळीबार करणारा तरूण हा एकटा होता. हे कृत्य आपण ‘इसिस’साठी केले असल्याचे त्याने ‘९१११’ या अमेरिकेतील आणीबाणीच्या प्रसंगी वापरण्यात येणाऱ्या ‘हेल्पलाईन’वर दूरध्वनी करून सांगितले असले आणि या कृत्यामागे आम्ही आहोत, असा दावा ‘इसिस’ने केला असला, तरी ओमर मीर सादिक मतीन नावाच्या त्या २९ वर्षाच्या मुस्लीम तरूणाने ‘इसिस’ वा इतर कोठल्याही जिहादी संघटनेकडून प्रशिक्षिण घेतले नव्हते. ‘इसिस’च्या प्रचाराच्या प्रभावाखाली येऊन हे हत्त्याकांड करण्यास तो प्रवृत्त झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. शिवाय शस्त्रास्त्रे विकत घेण्याची १८ वर्षांवरील कोणत्याही सज्ञान अमेरिकी नागरिकाला मुभा असल्याचा फायदाही त्याने उठवला आहे. मतीनचे वडील मूळ अफगाणिस्तानातील असून ते अमेरिकेत स्थलांतरित झाले. मतीनचा जन्म अमेरिकेत झाला व तेथेच तो ‘अमेरिकी संस्कृती’त वाढला. तेथेच त्याचे शिक्षणही झाले. तरीही तो ‘इसिस’च्या जहाल विचारसरणीकडे ओढला गेला असल्यास त्यामागची कारणे कोणती, हा विचार व्हायला हवा आणि तीच चर्चा अमेरिकेत गेले दोन दिवस सुरू आहे. ‘असे घडू शकते, हे मी आधीच जाहीरपणे सांगितले होते’, असा दावा अमेरिकेत होऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी ज्यांना मिळणार आहे, त्या डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. आता बराक ओबाम यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ‘मुस्लीमांना देशात येण्यास बंदी घाला, मी अध्यक्ष झाल्यास अशी बंदी घालीन’, ही घोषणा ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी केलीच होती. त्याची ताजी प्रतिक्रिया या त्यांच्या भूमिकेला धरूनच आहे. अर्थात मतीन हा अमेरिकी नागरिक होता, तेव्हा मुस्लीमांना देशात येण्यास बंदी घातली, तरी जे अमेरिकी नागरिक मुस्लीम आहेत, त्यांचे काय, हे लक्षात घेतले, तर ट्रम्प यांच्या मागणी पाठीमागचा राजकीय उद्देश स्पष्ट होतो. नेमका येथेच अमेरिकेतील राजकीय व समाजव्यवस्था, त्या देशाचे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि त्याचे होणारे अपरिहार्य परिणाम यांचा संबंध येतो. आॅरलॅन्डो येथील हत्त्याकांड घडवणाऱ्या मतीनची नोंद ‘एफबीआय’ या अमेरिकी गुप्तहेर संघटनेने घेतली होती. पण त्याचे विचार जहाल असले, तरी हिंसाचार वा दहशतवादी कृत्यासाठी तो कोणत्याही प्रकारची तयारी करीत असल्याचे ‘एफबीआय’च्या निदर्शनास आले नव्हते. अमेरिकी राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे कोणत्याही धर्माचा, पंथाचा, वंशाचा अथवा विचारसरणीचा पुरस्कार, प्रसार वा प्रचार करणे हा गुन्हा नाही. अमेरिकी राज्यघटनेत जी पहिली दुरूस्ती करण्यात आली, तिने हे स्वातंत्र्य प्रत्येक अमेरिकी नागरिकाला दिले आहे. साहजिकच मतीनवर नजर असूनही ‘एबीआय’ त्याला ताब्यात घेऊ शकले नाही; कारण तसे केले असते, तर तो न्यायालयात जाऊ शकला असता आणि त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणून न्यायालयाने त्याला लगेच सोडूनही दिले असते. मात्र मतीनवर नजर ठेवून तो खरोखरच दहशतवादी कृत्याकडे वळत आहे काय, याचा अंदाज ‘एफबीआय’ला घेता आला असता. पण तसे झालेले दिसत नाही. दुसरा मुद्दा आहे, तो अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय रणनीतीचा. जॉर्ज बुश यांच्या कारकिर्दीत पश्चिम आशियात अमेरिकेने जे काही केले, त्याची परिणती ‘इसिस’मध्ये झाली, याची कबुली खुद्द ओबामा यांनीच दिली आहे. पश्चिम आशियातील राजकारण पूर्वी ‘इस्त्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाभोवती फिरत असे. आता त्यात शिया-सुन्नी या इस्लाममधील पंथीय तेढीची भर पडली आहे. ‘इसिस’ ही या तेढीतूनच उभी राहात गेली आहे. व्यक्तिगत आयुष्यात समस्या असलेल्यांना हेरून, अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून, तुमची समस्या ही ‘ख्रिश्चन’ अमेरिकेमुळे उद्भवली आहे, हे त्यांच्या मनावर ‘इसिस’ बिंबवत आली आहे. एका आकडेवारीनुसार ‘इसिस’ दररोज ५० हजार ‘ट्विट्स पाठवत असते. त्यात खऱ्या-खोट्याची बेमालूम सरमिसळ असलेले व्हिडिओ व जहाल प्रचार असतो. इराक व सीरियाचा जो काही भाग ‘इसि’च्या ताब्यात आहे, तेथून दर महिन्याला एक अब्ज डॉलर्स इतके तेलाचे उत्पन्न ‘इसिस’ला मिळते. मतीन ‘इसिस’च्या अशा कार्यपद्धतीचा बळी आहे. सुरक्षा दले, गुप्तहेर संघटना यांच्या कारवाईला ‘विचारांच्या लढाई’ची जोड दिल्यासच ‘इसिस’च्या कार्यपद्धतीला लगाम घातला जाऊ शकतो. पण ही लढाई अमेरिकेत अजून सुरूही झालेली नाही. त्यामुळेच आॅरलॅन्डोेसारखी घटना घडली आहे.