ट्रम्प यांनी ‘घंटागाडीत’ बसून केला प्रचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 08:10 AM2024-11-04T08:10:09+5:302024-11-04T08:10:52+5:30

US Election 2024: डोनाल्ड ट्रम्प यांनी काय करावं? तिथल्या ‘घंटागाडी’त बसून, कचरा कर्मचाऱ्यांचा वेष परिधान करून ते विस्कॉन्सिन येथे प्रचार रॅलीला गेले आणि त्याच वेशभूषेत त्यांनी प्रचार करत जवळपास दीड तास दणदणीत भाषणही केलं.

US Election 2024: Trump campaigned sitting in the 'hour train'! | ट्रम्प यांनी ‘घंटागाडीत’ बसून केला प्रचार!

ट्रम्प यांनी ‘घंटागाडीत’ बसून केला प्रचार!

अमेरिकेत पाच नोव्हेंबरला मतदान होत आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत चाललीय, तसतसं अमेरिकेतही या निवडणुकीला वेगवेगळे रंग चढू लागलेत. संपूर्ण देश जणू दोन गटांत विभागला गेलाय. त्यात बिल गेट्स आणि इलॉन मस्क तसेच अनेक चित्रपट अभिनेते, प्रसिद्ध कलावंत आणि उद्योगपतीही दोन्ही गटांचे वाटेकरी झाले आहेत. मतदारांना भुलवण्याचे आणि आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पैशांच्या राशी ओतल्या जाताहेत. त्यावरून मोठं रणकंदनही सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांनीही निवडून येण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरायला आणि मतदारांना आपल्या बाजूनं वळवायला सुरुवात केली आहे. 

आता डोनाल्ड ट्रम्प यांनी काय करावं? तिथल्या ‘घंटागाडी’त बसून, कचरा कर्मचाऱ्यांचा वेष परिधान करून ते विस्कॉन्सिन येथे प्रचार रॅलीला गेले आणि त्याच वेशभूषेत त्यांनी प्रचार करत जवळपास दीड तास दणदणीत भाषणही केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्या समर्थकांना ‘कचरा’ संबोधल्यानं त्यांनी तोच प्रचाराचा मु्द्दा बनवला आणि आपल्या विरोधकांना मात देण्यासाठी, त्यांना शब्दांत पकडण्याची संधी साधली. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आमच्या विरोधकांना अमेरिकेचे लोक भले ‘कचरा’ वाटत असतील, पण अमेरिकेची जनता, इथले २५ कोटी लोक कचरा नाहीत. या निवडणुकीत ते तुम्हाला तुमची ‘योग्य जागा’ दाखवतील. त्यामुळे सध्या तरी इतर विषय मागे पडून अमेरिकेत ‘कचऱ्या’वर जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि अमेरिकेतलं राजकारण कचऱ्याभोवती गुंफलं जातं आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी विस्कॉन्सिन येथे प्रचारात लाल टोपी आणि सफाई कर्मचारी घालतात ते जॅकेट घालून प्रचार केला. याच पोशाखात त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरंही दिली. ते म्हणाले, बायडेन यांनी बरोब्बर तेच सांगितलं, जे त्यांच्या आणि कमला हॅरिस यांच्या मनात आहे. यावेळी ट्रम्प यांनी आपला खास ‘सिग्नेचर डान्स’ही केला. खरंतर या वादाला सरुवात झाली ती २७ ऑक्टोबर रोजी. न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये ट्रम्प समर्थक कॉमेडियन टोनी हिंचक्लिफ यांच्या वक्तव्यावरून हा वाद पेटला. हिंचक्लिफ यांनी प्युर्टो रिकोचं वर्णन ‘कचऱ्याचं बेट’ असं केलं होतं.

यावर बायडेन म्हणाले होते, प्युर्टो रिको येथील लोक अतिशय सभ्य आहेत. अमेरिकेच्या विकासात त्यांचं मोठं योगदान आहे. याउलट ट्रम्प यांच्या समर्थकांना कचरा पसरवताना मी पाहतो आहे. यासंदर्भात प्युर्टो रिको म्हणजे काय, हे पाहणंही गरजेचं आहे. प्युर्टो रिको येथे हिस्पॅनिक मूळ असलेले लोक राहतात. ते स्पॅनिश भाषा बोलतात. यंदाच्या निवडणुकीत या वंशाचे ६० टक्के मतदार डमोक्रॅटिक पक्षाचे तर ३४ टक्के मतदार रिपब्लिकन पक्षाचे समर्थक आहेत, असं मानलं जातं. 

प्युर्टो रिको हे एक अमेरिकन बेट आहे. १२६ वर्षांपूर्वी हे बेट अमेरिकेचा भाग बनलं. क्यूबा आणि जमैकाच्या पूर्वेला हे बेट आहे. १८९८मध्ये स्पेननं हे बेट अमेरिकेच्या स्वाधीन केलं होतं. या बेटावर सुमारे ३५ लाख लोक राहतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथील लोकांना अजूनही निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नाही. या वंशाचे जे लोक अमेरिकेच्या इतर राज्यांत वसलेले आहेत, त्यांना मात्र मतदानाचा अधिकार आहे. 

दुसरीकडे ट्रम्प यांचे कट्टर समर्थक अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांनी मतदारांना आमिष दाखवल्यामुळे ते आणि ट्रम्पही काहीसे अडचणीत आले आहेत. पेन्सिल्वानियाच्या एका न्यायाधीशांनी मस्क  यांना कोर्टात हजर होण्याचा आदेश दिला आहे. ‘स्विंग स्टेट’मधले जे मतदार निवडणुकीच्या आधीच  मतदान करतील त्यातील भाग्यवंतांना प्रत्यक्ष मतदानापर्यंत रोज एक दशलक्ष डॉलर्स (सुमारे ८.४०  कोटी रुपये) दिले जातील असं मस्क यांनी जाहीर केलं होतं. 

फिलाडेल्फिया येथील ॲटर्नी लॅरी क्रासनर यांनी या प्रकाराविरुद्ध तक्रार दाखल केली होती. याच संदर्भात मस्क यांना काेर्टात हजेरी लावण्याचा आदेश देण्यात आला आहे. मस्क यांच्या कृतीविरुद्ध अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि लोकशाहीवर हा सरळ सरळ घाला असल्याचं म्हटलं आहे. लोकांच्या या नाराजीचा त्यांना आता सामना करावा लागतोय.

इलॉन मस्क यांची बक्षीस योजना! 
इलॉन मस्क यांनी मतदारांना बक्षिसाची जी योजना जाहीर केली होती ती मुख्यत: स्विंग स्टेट्ससाठी आहे. ॲरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवादा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्वानिया आणि विस्कॉन्सिन या राज्यांचा स्विंग स्टेट्समध्ये समावेश होतो. या राज्यांमधील नोंदणीकृत मतदारांसाठीच मस्क यांची ही योजना होती. याशिवाय त्यांना समर्थन देणाऱ्या पेन्सिल्वानिया येथील प्रत्येक नोंदणीकृत मतदाराला शंभर डॉलर्स (८४०० रुपये) तर इतर स्विंग स्टेट्समधील प्रत्येक नोंदणीकृत मतदाराला ४७ डॉलर्स (३९५१ रुपये) जाहीर करण्यात आले होते.

Web Title: US Election 2024: Trump campaigned sitting in the 'hour train'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.