विशेष लेख: ... तरीही अमेरिकन नागरिकांनी ट्रम्प यांना मतं का दिली?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 11:01 AM2024-11-07T11:01:37+5:302024-11-07T11:04:04+5:30
US Election 2024: लोकांच्या मनात एक सुपरमॅन, बॅटमॅन, रॉबिनहूड घर करून असतो. आत्ता अमेरिकेसाठी त्या सर्वगुणसंपन्न वीरशिरोमणीचं नाव आहे डोनाल्ड ट्रम्प!
- निळू दामले
(ज्येष्ठ पत्रकार)
अमेरिकेत २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत दोन तट पडले होते. फार तर दोन ते चार टक्केच लोक ‘हॅरिस की ट्रम्प? -यांच्यापैकी कोणाला मत द्यायचं?’ - याबद्दल गोंधळले होते. बाकीची जनता या किंवा त्या बाजूला पक्की होती. २०१६ ते २०२० या अध्यक्षपदाच्या काळात, २०२० ते २०२३ या अध्यक्षपदी नसतानाच्या काळात, २०२४ या निवडणूक प्रचार मोहिमेच्या काळात ट्रम्प यांचं वर्तन वादग्रस्त होतं. २०२० ची निवडणूक आपण हरलो हे त्यांनी कबूल केलं नाही. उलट कॅपिटॉल इमारतीवर १० हजार गुंड पाठवून दंगा केला. अमेरिकेतली सरकारी यंत्रणा - म्हणजे त्यात पोलिस, न्यायसंस्था इत्यादी आलेच - भ्रष्ट आहे, ती मोडून काढली पाहिजे, असं ते म्हणत राहिले. आपल्याला विरोध करणारे लोक देशद्रोही आहेत, आपण त्यांना गोळ्या घालू, असं ते म्हणत राहिले. लॅटिनो लोक स्थानिक अमेरिकन लोकांचे कुत्रे-मांजरं खातात, म्हणाले. पुतिन, किम जोंग ऊन आणि हिटलर यांचं कौतुक करत राहिले.
खरं तर, अमेरिकेला ट्रम्प यांचा वैताग आला होता. खुद्द त्यांच्याच पक्षातले, त्यांच्या मंत्रिमंडळातले, त्यांचे सहकारीही म्हणत होते की हा माणूस फार डेंजरस आहे, फॅसिस्ट आहे, असा आरोप अमेरिकेतल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनीही जाहीरपणे अनेकवेळा केला होता. तरीही ५२ टक्केपेक्षा जास्त अमेरिकन नागरिकांनी ट्रम्प यांना मतं का दिली? - हा मानसशास्त्राचाच विषय आहे.
जेव्हा नॉर्मल गोष्टी नॉर्मल पद्धतीनं होत नाहीत तेव्हा माणसाचं मन नॉर्मल नसलेल्या गोष्टींकडं आकर्षित होतं. सरकार आहे, बँका आहेत, दुकानात वस्तूंची रेलचेल आहे, सैन्य मजबूत आहे, पोलिस आहेत, न्यायालयात निमूटपणे काम चालतं, नदीत पाणी आहे, कारमध्ये पेट्रोल आहे, नोकऱ्या आहेत; पण महागाई इतकी आहे की महिन्याचं भागत नाही. शिक्षणावर खर्च करायला पैसे नाहीत, आजाराची भीतीच वाटते, विषमता वाढतेय. त्यामुळं समाजात अस्वस्थता आहे. आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय. उपासमार आहे, दोनवेळंचं पोटभर जेवण न मिळणारी अनेक मुलं विद्यापीठात आहेत.
...कुठंतरी गडबड आहे. काहीतरी मनासारखं होत नाहीये, असं बहुसंख्य लोकांना वाटू लागलं की वारं झपाट्यानं बदलतं. २०२१ साली हार्वर्ड विद्यापीठाने अमेरिकेत १८ ते २५ वयोगटातल्या तरुणांची एक पाहणी केली. अर्ध्यापेक्षा जास्त मुलांनी सांगितलं, ‘लोकशाही फेल गेलीय किंवा बिघडलीय’... या अशा स्थितीत ‘तुमचे सर्व प्रश्न चुटकीसरशी धडाधड सोडवतो’, असं म्हणणाऱ्या नेत्याकडे लोक आकर्षित होतात.
युक्रेनमध्ये लढाई चाललीय. ट्रम्प म्हणाले, ‘मी सत्तेत आलो की पुतिन आणि जेलेन्स्कींना एकत्र बसवेन. पुतिन माझे दोस्त आहेत, माझं ऐकतात. दोन तासात युद्ध बंद करून दाखवेन.’ ... मिशिगन, पेनसिल्वानिया इत्यादी ठिकाणी तरुण बेकार आहेत, उद्योग बंद झालेत. बेकार तरुणांत गोरेही आहेत. ट्रम्प म्हणाले, ‘लॅटिन अमेरिकेतले बेकायदेशीर निर्वासित येऊन तुमचे रोजगार पटकावतात. मी सत्तेवर आलो की काही आठवड्यांत ते बाहेरून येणारे लोंढे थांबवेन, आत घुसलेल्यांना बाहेर हाकलीन.’
बाहेरच्या देशातली उत्पादनं अमेरिकेत स्वस्तात विकली जातात. अमेरिकेतलं उत्पादन बाजारात खपत नाही. परिणामी, बेकारी वाढते. ट्रम्प म्हणाले, ‘चीनमधून, मेक्सिकोमधून येणाऱ्या गाड्यांवर शंभर काय, पाचशे टक्के कर लावीन, मला सत्तेवर येऊ द्या!’
- बस्स! तरुण मतदार ट्रम्प यांच्या एकोळी घोषणेवर खुश. अमेरिका ज्या गोष्टी निर्यात करते, त्यावर इतर देशांनी प्रतिक्रिया म्हणून असाच कर लादला तर? - असा प्रश्न कोणी विचारत नाही. श्रीमंतांचे खिसे कापून गरीब जनतेच्या भल्याच्या योजना आखायच्या आपण विरोधात आहोत, त्यामुळे श्रीमंतांवरचा कर कमीत कमी करू, असं ट्रम्प म्हणतात. ‘श्रीमंतांवर कर म्हणजे कम्युनिझम आणि कम्युनिझम हा अमेरिकेचा शत्रू आहे’, असं एक घोषवाक्य ट्रम्प सतत उच्चारतात. एका वाक्यात सारे प्रश्न सुटतात.
अमेरिकेत मतदानाच्या आधी एक क्लिप माध्यमात फिरली. त्यात हैतीमधले नागरिक कसे अमेरिकेत जॉर्जियात घुसले आणि त्यांनी तिथं अनेक मतदान केंद्रांवर कशी मतं टाकली ते दाखविण्यात आलं होतं. ट्रम्प म्हणाले, ‘हे सगळे लोचे ते दुरुस्त करणार आहेत. अमेरिकेतली सरकारी यंत्रणा पक्षपाती आहे. मी सत्तेवर आलो की, माझ्याच मताच्या देशभक्त माणसांनाच सरकारमध्ये कामाची संधी असेल’, असंही ट्रम्प म्हणाले. त्यांच्या (अनधिकृत) जाहीरनाम्यात त्यांनी तशी तरतूदही केलीय.
किती सरळ वाट... माझ्याकडे एकहाती सत्ता द्या. मी सगळे प्रश्न सोडवतो. खूप लोकांना (बहुसंख्य?) विचार करायचा नसतो. लोकांच्या मनात एक सुपरमॅन, बॅटमॅन, रॉबिनहूड घर करून असतो. आत्ता अमेरिकेसाठी त्या वीरशिरोमणीचं नाव आहे डोनाल्ड ट्रम्प!
damlenilkanth@gmail.com