अमेरिकेला ‘ना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2017 12:07 AM2017-04-07T00:07:23+5:302017-04-07T00:07:23+5:30
अमेरिका म्हणजे भारतासोबतच साऱ्या जगातील तरुण पिढीचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण.
अमेरिका म्हणजे भारतासोबतच साऱ्या जगातील तरुण पिढीचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण. जागतिक महाशक्ती असलेल्या या देशात उच्चशिक्षण आणि तेथेच नोकरीधंदा करून आपल्या आयुष्याचे सोने करण्याचे स्वप्न उराशी बाळगून दरवर्षी लाखो तरुण अमेरिकेची वाट धरताना दिसतात. परंतु यंदा मात्र वेगळेच चित्र समोर आले आहे. या देशाबद्दल विद्यार्थ्यांचा ओढा कमी झालेला दिसतो आहे. बहुधा अलीकडच्या काळात तेथे वर्णद्वेषावरून वाढलेला हिंसाचार आणि ट्रम्प प्रशासनाकडून व्हिसाच्या नियमात झालेले बदल यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली धास्ती हे या ओहोटीमागील मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेतील सहा मोठ्या उच्चशिक्षण गटांनी तेथील २५० पेक्षा अधिक महाविद्यालये आणि विद्यापीठांत केलेल्या पाहणीत असे लक्षात आले की, भारतातून येथे पदवी शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांत २६ टक्के, तर पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण १५ टक्क्यांनी घटले आहे. गेल्या वर्षी याच ओपन डोअर पाहणीत भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण २५ टक्क्यांनी वाढले असल्याचे दिसून आले होते. विशेष म्हणजे, अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. परंतु राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली उडी, प्रचारादरम्यान दिलेली आश्वासने आणि त्यांच्या विजयानंतर निर्माण झालेली परिस्थिती बघता अमेरिकेत जाण्यास इच्छुक विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढतील असा अंदाज बांधला जात होताच. यासंदर्भात दोन आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणात ६० टक्के विद्यार्थ्यांनी ट्रम्प विजयी झाल्यास अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्याबाबत आपली अनिच्छा व्यक्त केली होती. त्यात पुन्हा सॉफ्टवेअर इंजिनिअरसह तिघा भारतीयांच्या हत्त्येमुळे तेथे जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उच्चशिक्षणात रुची असलेल्या या मुलांना अमेरिकेत जाण्याची गरजच का पडावी? आपल्या देशात तिथल्याप्रमाणे शिक्षण पद्धती, वातावरण विकसित होऊ शकणार नाही का? याचा विचार आपण करावयास हवा.