अमेरिकेतील हिंसाचार आणि आपली नैतिकता (?)
By Admin | Published: April 6, 2017 11:50 PM2017-04-06T23:50:04+5:302017-04-06T23:50:04+5:30
वंशद्वेषातून अमेरिकेत दोन भारतीयांची हत्त्या झाली. आणि भारत सरकारने त्याबद्दल अमेरिकेकडे निषेध व्यक्त केला
वंशद्वेषातून अमेरिकेत दोन भारतीयांची हत्त्या झाली. आणि भारत सरकारने त्याबद्दल अमेरिकेकडे निषेध व्यक्त केला. या घटनेबद्दल प्रत्येक भारतीयाला काळजी आणि संताप वाटणे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, याबाबतच्या आपल्या भूमिकेत एक मोठी विसंगती तर नाही? फक्त भारतीय जनतेच्याच नाही तर भारत सरकारच्या भूमिकेत एक मोठी विसंगतीच नाही तर मोठा दुटप्पीपणा आहे. आणि एक सुसस्ंकृत समाज म्हणून आपल्याला आपल्या नजरेत आणि जगाच्या नजरेत ठरायचे असेल तर आपण त्या दुटप्पीपणाकडे प्रामाणिकपणे पाहिले पाहिजे. ते धाडस आपण दाखवले पाहिजे.
सुरुवातीला अमेरिकेतील हत्त्यांचा विचार करू. या हत्त्या आपल्याला निंदनीय वाटतात. परंतु त्या करणाऱ्या लोकांना आपण एक राष्ट्रवादी आहोत आणि आपले कृत्य हे राष्ट्रवादी कृत्य आहे असे वाटत असते. आपल्या देशात बाहेरून येऊन स्थायिक झालेले लोक हे आपल्या देशाच्या विकासात अडथळे आणतात, आपल्या नोकऱ्या त्यांच्यामुळे जातात हा त्यांचा मुख्य आक्षेप असतो. सुदैवाने अमेरिकेतील या हत्त्याऱ्यांना लगेच अटक झाली. पण मुख्य मुद्दा असा की, आपण या घटनेबद्दल फक्त गुन्हेगारांनाच दोषी मानायचे, की हा गुन्हा करण्यास गुन्हेगारांना प्रवृत्त करणाऱ्या त्या संकुचित आणि आक्रमक राष्ट्रवादी विचारसरणीलादेखील दोषी मानायचे? समजा या हत्त्येत सहभागी असलेल्या व्यक्तींनी लोकांची माथी भडकवणारी भाषणे ऐकली असतील, त्यांना सोशल मीडियावर अनेक वर्णद्वेषी संदेश आले असतील आणि त्यामुळे त्यांची माथी भडकली असतील. मग अशी भाषणे देणारे, असे संदेश सोशल मीडियावर पसरवणारेदेखील दोषी नाहीत का? त्या निष्पाप लोकांचे रक्त या लोकांच्याही हाताला लागले आहे असे आपण मानणार की नाही? भडकवणारी भाषणे करणारे नेहमीच कायद्याच्या कचाट्यात सापडत नाहीत. तसे न सापडता भडक भाषणे कशी करायची याची कला त्यांना अवगत असते.
आपण सुरुवातीला खासदार असददुद्दिन ओवेसी यांचे उदाहरण घेऊ. त्यांनी स्वत: नाही पण दोन-तीन वर्षांपूर्वी त्यांच्या भावाने एक अत्यंत जातीय, प्रक्षोभक विधान केले. त्यावर खासदार ओवेसींची भूमिका अशी की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मी त्यावर काहीही भाष्य करणार नाही. ओवेसींची ही लबाडी आहे. प्रत्येक गोष्ट न्यायालयात सिद्ध व्हावी लागत नाही. सभ्य समाजात सुसंस्कृततेचे काही संकेत असतात.
खासदार ओवेसींनी त्यांच्या भावाच्या विधानाचा जाहीर निषेध करायला हवा होता. त्यांनी तसा न करणे हा त्यांच्या कम्युनल राजकारणाचा भाग आहे. आणि कम्युनल लोक नेहमी कायद्याचा आधार घेतात आणि सभ्यतेचे संकेत धुळीला मिळवतात. आणि त्यांनी असा निषेध व्यक्त केला नाही हा काही कायद्यानुसार गुन्हा ठरत नाही म्हणून त्यांना आपण गुन्हेगारही म्हणू शकत नाही. सुसंस्कृत समाजात दाखला फक्त न्यायालयात काय ठरले हाच असू शकत नाही. अजमेर दर्ग्याजवळ बॉम्बस्फोट करणाऱ्या देवेश गुप्ता आणि भावेश पटेल या दोन तरुणांना जयपूरच्या न्यायालयाने दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.
हिंसा करणाऱ्या दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. पण या तरुणांची माथी भडकवणाऱ्या लोकांचे काय? अशी शक्यता निश्चितच आहे की, अमेरिकेतील त्या गुन्हेगारांप्रमाणे या तरुणांनीदेखील अशी भडक भाषणे ऐकली असतील, त्यांच्यावरदेखील सोशल मीडियातून विशिष्ट जमातीतील लोकांबद्दल द्वेष पसरवणाऱ्या संदेशाचा भडिमार झाला असेल. कायद्याच्या कचाट्यात अशी भडक भाषणे करणारे नाही येणार; पण म्हणून आपण त्यांना दोषी मानायचे की नाही हा आपल्यापुढील प्रश्न आहे. आणि याबाबतीत आपली आपल्या सरकारची भूमिका दुटप्पीपणाची तर ठरत नाहीये ना? खरे तर राष्ट्रवाद आणि कायद्याच्या राज्याची कल्पना यात संघर्ष असायची गरज नाही. पण लोकशाहीचे जेव्हा झुंडशाहीत रूपांतर होते तेव्हा या दोन गोष्टी एकमेकांविरुद्ध ठाकतात. कारण झुंडशाही ही राष्ट्रवादाची विकृत संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न करते. अशा राष्ट्रवादाचा गाभा शत्रुकेंद्रित्व हा आहे. तुमच्या देशातील लोकांवर तुम्ही किती प्रेम करता, त्यांच्या हक्काबद्दल तुम्ही किती जागरूक असता यापेक्षा हा संकुचित राष्ट्रवाद तुम्ही शत्रूचा किती द्वेष करता याला जास्त महत्त्व देतो. त्यामुळे आपल्या देशाच्या घटनेतील मूल्ये बिनदिक्कत पायदळी तुडवणाऱ्या मूल्यांना प्रतिष्ठा मिळते.
अमेरिकेत ज्या भारतीय वंशाच्या तरुणाची हत्त्या झाली त्याला अमेरिका आवडत होती. कारण अमेरिका सर्वांना सामावून घेते. तेथे व्यक्तीच्या हक्काचे, स्वातंत्र्याचे मूल्य रु जले आहे असे त्याला वाटायचे. आणि त्यात तथ्यही आहे. पण तीच मूल्ये पायदळी तुडवणाऱ्या लोकांना आज राष्ट्रवादी मानण्यात येतेय. आणि याला जबाबदार अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आहेत. त्यांनी लोकांना सांगितले की, अमेरिकेत बाहेरून आलेले हे अमेरिकेचे शत्रू आहेत. अमेरिकेत त्यांनी शत्रुकेंद्री राष्ट्रवादाला प्रोत्साहन दिले. आपल्याकडे असेच तर घडत नाहीये ना? कोणाला तरी शत्रू मानून, त्याच्यावर भाषिक हल्ले करून आपली राष्ट्रनिष्ठा सिद्ध करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि त्यासाठी माणसाचा जगण्याचा हक्कदेखील धोक्यात येतोय असे तर होत नाहीये ना?
अमेरिकेतील गुन्हेगारांना ट्रम्प प्रशासनाने अटक केली तरी त्यातील दुटप्पीपणा झाकला जात नाही. कायद्याचे राज्य ही कल्पना जर आपल्या समाजात रु जणे हे आपल्या समाजात कोणती मूल्ये रुजली आहेत यावर अवलंबून आहे. आपण लोकशाही व्यवस्थेत राहतो म्हणून निष्पाप लोकांची सुरक्षितता, त्यांचे जिवंत राहण्याचे स्वातंत्र्य हे सर्वात महत्त्वाचे मूल्य मानले पाहिजे. कारण लोकशाहीतील कायद्याचे राज्य ही संकल्पना हे मूल्य समाजात किती खोल रु जले आहे यावर अवलंबून असते. येथे आपण योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी झालेल्या नेमणुकीकडे येतो.
योगी आदित्यनाथांची आजवरची भाषणे ही कोणत्याही सुसंस्कृत माणसाला शिसारी येईल अशी आहेत. त्यात कायद्याचे राज्य, निष्पाप लोकांचे
जिवंत राहण्याचे स्वातंत्र्य या सर्व मूल्यांना धुळीस मिळवले जाते. त्यांनी प्रत्यक्षात हिंसा केली आहे का हा प्रश्न येथे गैरलागू आहे. यापुढे ते अशी भाषणे करणार नाहीत हेदेखील गैरलागू आहे. त्यांच्या नेमणुकीने कोणती मुल्ये रु जवली जातात हे महत्त्वाचे आहे. आपल्याला
एक भारतीय म्हणून याबद्दल त्रास होतो का? आदित्यनाथांची निवड केल्यानंतर अमेरिकेत भारतीय नागरिकांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारत सरकार अमेरिकेकडे जो निषेध नोंदवते आहे त्याला आता काही नैतिक अधिष्ठान उरले आहे का?
-मिलिंद मुरूगकर
(कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक)