‘राम’ पाहावा वापरून...
By admin | Published: December 30, 2015 02:57 AM2015-12-30T02:57:01+5:302015-12-30T02:57:01+5:30
संघ परिवाराने पुन्हा एकवार राममंदिराचे दगड अयोध्येत जमा करणे सुरू केले आहे. संसदेत त्याविषयी विचारणा झाली तेव्हा ‘ते मंदिर व्हावे अशी देशवासियांचीच इच्छा असल्याचे’ व्यंकय्या नायडू
संघ परिवाराने पुन्हा एकवार राममंदिराचे दगड अयोध्येत जमा करणे सुरू केले आहे. संसदेत त्याविषयी विचारणा झाली तेव्हा ‘ते मंदिर व्हावे अशी देशवासियांचीच इच्छा असल्याचे’ व्यंकय्या नायडू यांनी परस्पर जाहीर केले. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादवांचे सरकार आहे आणि त्याचा या बांधकामाला विरोध आहे. बिहारात नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांचे राज्य आहे आणि लालूप्रसादांनी राममंदिरासाठी निघालेली अडवाणींची रथयात्रा अडवून त्यांना अटक केल्याचा इतिहास ताजा आहे. प्रभू रामचंद्र हे देशभरातील सगळ््या हिंदूंचे दैवत आहे आणि त्याच्या पूजाअर्चेला वा भक्तीला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र कोणत्याही धर्माची मानचिन्हे राजकारणाच्या वादात अडकविली आणि त्यांचा वापर धर्मप्रेमापेक्षा परधर्मद्वेषासाठी करण्याची वृत्ती वाढली की त्या चांगल्या गोष्टीचे रुपांतरही समाजात दुही माजविणाऱ्या यंत्रणात होते. दुर्दैवाने अयोध्येतील राम मंदिराची आजवरची कहाणी या परधर्मद्वेषाच्या कथांनी भरलेली व त्या कथांवर आपले राजकारण उभे करण्याच्या संघ परिवाराच्या प्रवृत्तीची राहिली आहे. ज्यांच्याजवळ अर्थकारणाच्या वा विकासाच्या योजना व तसा कार्यक्रम नसतो त्या पक्षांना अशा भावनांचा व श्रद्धांचाच वापर त्यांच्या राजकारणासाठी करणे भाग असते. जनसंघ-भाजपा व त्यांची मातृसंस्था असलेला संघ यांची कृती अशीच श्रद्धाकारणाशी आपले सत्ताकारण जोडून घेण्याची राहिली आहे. त्यासाठी देशात दुभंग उभा झाला वा धार्मिक दंगलींना चालना मिळाली तरी त्याची पर्वा न करण्याचे त्या परिवाराचे आजवरचे धोरण राहिले आहे. त्याचसाठी गोहत्त्याबंदीचा नारा, त्याचसाठी गंगेच्या पाण्याची देशभरातली विक्री आणि गेल्या वीस वर्षांपासूनचे त्याचसाठी अयोध्येतल्या राम मंदिराच्या उभारणीचे चाललेले राजकारण. मुळात ईश्वर असलाच तर तो माणसांच्या कल्याणासाठी, त्यांच्यात सद््भाव उभा करण्यासाठी आणि त्यांच्यात एकोपा कायम राखण्यासाठी असतो. त्याची पूजास्थानेही त्याचसाठी बांधली जातात. भारतात तर सारी मंदिरे सगळ््या जाती-धर्मांच्या व वंश-पंथांच्या स्त्रीपुरुषांना खुली केली जावी यासाठी एक भव्य आंदोलनच उभे झाले. मंदिरे माणसांसाठी, माणुसकीसाठी व समाजाच्या हितासाठीच उभारली जात असतात. त्या उभारणीमागे कुरघोडीचे, इतरांवर वर्चस्व उभे करण्याचे किंवा अन्य धर्मियांच्या मनात दहशत उभी करण्याचे कारण असेल तर ते फार काळजीपूर्वक व गांभीर्याने घेण्याची गरज असते. भाजपा व संघ परिवाराने राम मंदिराचे केलेले राजकारण, त्यासाठी काढलेल्या रथयात्रा आणि त्याच मुद्यावर लढविलेल्या आजवरच्या निवडणुका पाहता त्याहीकडे श्रद्धेने न पाहता चिकित्सा व चिंतेने पाहण्याची गरज आहे. देशात ‘हिंदुत्वाचे’ राजकारण करून त्यात बहुसंख्यांकवाद उभा करण्याची भाजपाची नीती तिच्या आरंभापासूनच्या इतिहासाने स्पष्ट केली आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात भाजपाने रथयात्रा काढली तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी तिच्यापासून स्वत:ला दूर ठेवले होते. त्यांच्यातील संवेदनशील उदारमतवादात तेव्हाचा एकारलेला बहुसंख्यांकवाद बसणाराही नव्हता. त्याविषयीची आपली खंत त्याच काळात त्यांनी नागपुरातील काही पत्रकारांजवळ बोलूनही दाखविली होती. परंतु याच मार्गाने मते गोळा करता येतात अशा राजकीय मानसिकतेने पछाडलेल्या लोकानी ती यात्रा अयोध्येत नेली. तिने मंदिर बांधले नाही, मशिद उद्ध्वस्त केली. वाजपेयी म्हणाले होते ‘इन्हे मंदिर दिखताही नही, इनकी नजर मस्जिदपरही रुकी है’ त्यावेळी साऱ्या देशात उसळलेल्या दंगलीत शेकडो माणसे ठार झाली आणि हजारोंच्या संख्येने ती जायबंदी झाली. राम हे तारणारे दैवत आहे, ते मारणारे नाही या श्रद्धेलाही त्यावेळच्या अविचारी लोकांनी तडा दिला. परिणामी राम हा श्रद्धेचा व पूजेचा विषय राजकारणातले एक साधन बनला. येत्या वर्षात उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने त्या राज्यातील लोकसभेच्या ८० पैकी ७१ जागा जिंकल्या. त्या बळावर येणारी विधानसभेची निवडणूकही आपण जिंकू असा त्या पक्षाचा होरा आहे. मात्र २०१४ नंतर झालेल्या देशातील सर्व निवडणुकात भाजपाला पराभवाचा चेहरा पाहावा लागला. हे दिल्लीत व बिहारमध्येच घडले नाही. प. बंगालपासून गुजरातपर्यंतच्या सर्वच राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपाला पराजय पत्करावा लागला. उत्तर प्रदेशातील वाराणसी या प्रत्यक्ष नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात त्या पक्षाचा या निवडणुकात धुव्वा उडालेला देशाने पाहिला. आजचे वातावरण विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत असेच राहील या धास्तीने भाजपाला ग्रासले आहे. त्याचमुळे त्याने राम मंदिर हे आपले जुनेच हुकुमाचे पान त्याच्या राजकारणासाठी वापरायचे आता ठरविले आहे. मात्र पत्त्याच्या खेळात एकदा वापरलेले पान दुसऱ्यांदा वापरता येत नाही व त्याची किंमतही फारशी उरत नाही हे त्या पक्षाएवढेच आपणही लक्षात घेणे आवश्यक आहे. राजकारणात ईश्वर, मंदिर व धर्म या गोष्टी वारंवार वापरल्या की त्या जनतेलाही नकोशा होतात हे येथे ध्यानात घ्यायचे.