आपके जानेसे बर्तन बिलकुल खाली हो गया है..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2024 08:46 IST2024-12-17T08:44:12+5:302024-12-17T08:46:16+5:30

संगीताचे शास्त्र उमगणाऱ्यांसाठी तुम्ही प्रतिभासंपन्न तबलावादक, ते अजिबात न समजणाऱ्यांसाठी हसरे जादूगार.. उमदेपणा हे तर घायाळ करणारे तुमचे शस्त्रच!

ustad zakir hussain sad demise aapke janese bartan bilkul khali ho gaya hai | आपके जानेसे बर्तन बिलकुल खाली हो गया है..!

आपके जानेसे बर्तन बिलकुल खाली हो गया है..!

- वंदना अत्रे

झाकीर भाई, गेलात तुम्ही? खरंच? म्हणजे, मेंदूमध्ये अव्याहत चालणारा तालांच्या मात्रांचा हिशेब खरंच थांबला आहे? आणि तबला लावता लावता मधेच डोक्यामध्ये खाजवत, रंगमंचावर जवळपास असलेल्या एखाद्या वस्तूवर तबला लावायची हातोडी ठोकत भलतेच आवाज काढून श्रोत्यांमध्ये खसखस पिकवून देणारा तो लबाड मिस्कीलपणा, तोही नक्की थकला का? सगळे जग जेव्हा तुमच्या जाण्याची बातमी खोटी ठरण्याची प्रार्थना करीत होते तेव्हा बहुदा तुम्ही पल्याड पोहोचला होतात. 

कोल्हापुरातील एका मैफलीत तुम्हाला सरस्वतीपूजन करण्यासाठी आमंत्रित केले तेव्हा चटकन पायातल्या चपला रंगमंचाच्या खाली काढून तुम्ही वर चढलात. सहजतेने पायातील चप्पल काढून ठेवावी तसे आजवर मिळवलेले भलेथोरले मोठेपण खांद्यावरून उतरवून किती झटकन निघून गेलात ! माणसाला खांद्यावर टाकून घेऊन जाणारा हा मृत्यू नक्की कोणत्याशा निर्जन आडवाटेने जात असणार. नाहीतर जाणाऱ्या माणसाच्या मागे राहिलेली हतबल, शोकाने भांबावून गेलेली, निःशब्द, सैरभैर माणसे त्याला दिसली नसती का? तुमचे जाणे तुमच्या कुटुंबांपुरते, देशापुरते नाही तर जगाच्या कोणत्याशा कोपऱ्यात हातात तळहाताएवढे तालवाद्य घेऊन बेभान जगणारा एखादा तरुण आणि अमेरिकेवर राज्य करणारा गोरा राजा सगळेच शोकमग्न, अवाक् आहेत.
 
दोन हातांची दहा बोटे, अफाट प्रज्ञा, आढ्यतेचा इवलासुद्धा तुरा नसलेले मस्तक आणि समोरचे चामड्याचे वाद्य एवढ्या, एवढ्याच बळावर जग कवेत घेण्याची जादू करणारा हा झाकीर हुसेन नावाचा कलाकार नेमका कोणाचा होता? तो होता फक्त त्याच्या तबल्याचा आणि त्यामुळे जोडल्या गेलेल्या लाखो माणसांचा. संगीताचे शास्त्र उमगत असलेल्यांसाठी तो प्रतिभासंपन्न तबलावादक होता आणि ते अजिबात न समजणाऱ्या रसिकांसाठी ते शास्त्र श्रवणीय, रसाळ करणारा हसरा जादूगार होता...!  प्रसन्नता, कोणाशीही दोस्ती करण्याचा उमदेपणा ते तर या माणसाचे न दुखावता घायाळ करणारे शस्त्र होते. प्रतिभावान माणसे प्रतिभेची  लखलखीत मुद्रा मुठीत घेऊनच जन्माला येतात की साधनेने मोठी होतात? झाकीर हुसेन यांच्या मुठीत ती मुद्रा होतीच; पण त्यासोबत होते वेडे, हरहुन्नरी मन आणि स्वतःभोवतीच्या मर्यादा तोडू बघणारे अचाट साहस!

बाराव्या वर्षी बिस्मिल्ला खां यांना साथ करण्याचे साहस, वयाच्या अठराव्या वर्षी अमेरिकेत रवी शंकर यांना तबला साथ करण्याची संधी शिवाय संगीतकार म्हणून वडिलांनी कमवलेली मोठी पुण्याई अशी सुखी भविष्याची तरतूद हातात असतांना नवीन काहीसुद्धा करण्याची त्यांना अजिबात गरज नव्हती. पण गरजा वगैरे गोष्टी सामान्य वकुबाची माणसे करतात. मिकी हार्ट नावाचा रॉक चळवळीमधील ड्रमर जामिंगसाठी भेटतो आणि बघता बघता दोघेही भान विसरतात तेव्हा जे काही निर्माण होते ती कोणाचीही गरज नसते; पण प्रतिभावंत माणसाची भूक असते. भारतीय संगीतात मुळे घट्ट रुजलेली असतांना झाकीर भाई जगाच्या परिघावर गेले. जातांना आपल्यासोबत विक्कूजीचा घटम, शंकर महादेवन यांचा गाता गळा, एल शंकरचे व्हायोलिन आणि भारतीय संगीताचे अस्सल वेगळेपण घेऊन गेले. चकित झालेले पाश्चिमात्य जग मग आपला रोख बदलून अभिजात भारतीय संगीताकडे येऊ लागले. या दोन परंपरांच्या सहज सुरेल नात्याचे प्रात्यक्षिक ते दाखवायला लागले आणि त्यानंतर कित्येक भारतीय कलाकारांना पश्चिमेचे दरवाजे सताड खुले होऊ लागले. कोणतीही कुरकुर न करता दोन संस्कृतींमधील कुंपणे तुटत असतांना जगाला त्याची चाहूलही लागली नाही. प्रत्येकाला हे संगीत आपले संगीत वाटले. ही किमया झाकीर नावाच्या जादूगाराची! पण हा जादूगार मात्र श्रेयाकडे पाठ फिरवणारा..! ‘ग्रामी’सारखे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळायला लागले तेव्हा झाकीर भाई जगाला अभिजात भारतीय संगीताचे मोठेपण सांगत राहिले!

प्रत्येक कलाकाराशी असलेले अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आणि आपल्या मोठेपणाचा जराही धाक कोणाला वाटू नये, अशा खट्याळ क्षणांची मैफलीत पेरणी हा फक्त त्यांचाच हातखंडा! ज्या अमेरिकेत त्यांना राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाइट हाउसमध्ये वादन करण्यासाठी बोलावले, त्याच अमेरिकेत कधी काळी एका मैफलीपूर्वी किचनमध्ये वाट पाहत बसण्याची वेळ आल्याचे ते एकदा सांगत होते. पण असे क्षण मागे टाकून मैफलीत आल्यावर फक्त स्वरांकडे सगळे अवधान देण्याची अफाट क्षमता त्यांच्याकडे होती!

‘मी जेव्हा मैफलीत असतो तेव्हा सर्वात शांत आणि आनंदी असतो’, असे ते म्हणायचे. पण ते त्यांचे आनंदी असणे त्यांच्या उत्स्फूर्त वादनातून रसिकांना जाणवत राहायचे! तुम्ही जेव्हा स्वतःला उस्ताद समजू लागता, तेव्हा तुम्ही इतरांपासून स्वतःला तोडत असता ही शिकवण त्यांना लहानपणी एका खोलीत जगलेल्या कुटुंबात मिळाली असणार. 

झाकीर कसे होते त्याच्या कित्येक आठवणी देशातील नाही तर जगातील प्रत्येक गावात रुजलेल्या आहेत. चेहरा नसलेल्या कित्येक सामान्यांनी त्यांचा जिव्हाळा अनुभवला असेल. एवढी प्रतिभासंपन्नता पण एवढा साधेपणा जेव्हा एकत्र दिसेल तेव्हा लोक यापुढे त्याला झाकीर हुसेन या नावाने संबोधू लागतील. राशीद खां यांच्या निधनानंतर बोलताना ते म्हणाले होते, ‘किसी के जाने से बर्तन कभी खाली नही होता...’ झाकीर भाई, तुमचे हे म्हणणे मात्र साफ चूक आहे! आप के जाने से बर्तन बिलकुल खाली हो गया है..! प्रश्न हा आहे, जिथे झाकीर नावाची जादू संपते, त्या जगाचे पुढे होते काय?..
    vratre@gmail.com

 

Web Title: ustad zakir hussain sad demise aapke janese bartan bilkul khali ho gaya hai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.