उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य का मागतोय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 04:07 AM2018-07-31T04:07:35+5:302018-07-31T04:08:04+5:30
एखाद्या प्रदेशावर सातत्याने अन्याय होऊ लागला, आपल्या बाबतीत पक्षपात होतोय अशी नागरिकांची भावना होऊ लागली की, तेथे असंतोष उफाळून येतो. स्वातंत्र्य मिळविण्याची इच्छा जोर धरू लागते. त्यासाठी आंदोलने, संघर्ष सुरू होतात. कर्नाटकात अशीच एक लढाई उभी राहू पाहत आहे.
- चंद्रकांत कित्तुरे
एखाद्या प्रदेशावर सातत्याने अन्याय होऊ लागला, आपल्या बाबतीत पक्षपात होतोय अशी नागरिकांची भावना होऊ लागली की, तेथे असंतोष उफाळून येतो. स्वातंत्र्य मिळविण्याची इच्छा जोर धरू लागते. त्यासाठी आंदोलने, संघर्ष सुरू होतात. कर्नाटकात अशीच एक लढाई उभी राहू पाहत आहे. उत्तर कर्नाटकला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी येत्या २ आॅगस्ट रोजी बंदची हाक देण्यात आली आहे. १३ जिल्ह्यांत हा बंद पाळला जाणार आहे. यावरून कर्नाटकातील राजकीय वातावरणही तापू लागले आहे.
उत्तर कर्नाटक पूर्वीच्या हैदराबाद कर्नाटक आणि मुंबई कर्नाटक अशा दोन विभागांचा मिळून बनलेला आहे. यात कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, हुबळी, धारवाड, गदग, विजापूर, हावेरी, बिदर, बेल्लारी, गुलबर्गा, रायचूर, यादगीर आणि कोप्पल हे १३ जिल्हे येतात. देशातील थरच्या वाळवंटानंतर सर्वांत कमी पावसाचा प्रदेश म्हणून उत्तर कर्नाटक ओळखला जातो. बेळगाव, हुबळी, धारवाड वगळता अन्य जिल्हे हे दुष्काळप्रवण आहेत. मागासलेले आहेत. या तुलनेने कर्नाटकातील बंगलोर, म्हैसूर, आदी भागांचा मोठा विकास झाला आहे. वारंवार मागणी करूनही उत्तर कर्नाटकात विकासकामे म्हणावी तशी झालेली नाहीत, याचा असंतोष तेथील जनतेत आहे.
महाराष्टÑात जाण्यासाठी लढा देणाऱ्या बेळगावात कर्नाटक सरकारने विधानसौध बांधले. वर्षातून एकदा तेथे अधिवेशनही घेण्यात येते. मात्र, तरीही राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत उत्तर कर्नाटक मागासलेला राहिला आहे. राज्यात मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत याच उत्तर कर्नाटकाने भाजपला सर्वाधिक आमदार दिले. निवडणुकीनंतर एच.डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि निधर्मी जनता दलाचे सरकार सत्तेवर आले. नव्या सरकारमध्ये उत्तर कर्नाटकाला प्रतिनिधित्व अत्यल्प मिळाले आहे. गेल्या महिन्यात सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात उत्तर कर्नाटकच्या वाट्याला फारसे काही आलेले नाही.
यामुळे या भागातील आमदार संतप्त झाले आहेत. त्यांनी कुमारस्वामी सरकारवर उत्तर कर्नाटकच्या बाबतीत पक्षपात करत असल्याचा आरोप करीत उत्तर कर्नाटक स्वतंत्र्य राज्य संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली २ आॅगस्टला १३ जिल्ह्यांत बंद पाळण्याची घोषणा केली आहे.
कोणत्याही राज्याचे विभाजन करणे सोपे नाही. आधीच महाराष्ट्रात विदर्भ, आसाममध्ये बोडोलॅण्ड, गुजरातमध्ये सौराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये गुरखालॅण्ड, उत्तर प्रदेशात हरित प्रदेश, बुंदेलखंड, पूर्वांचल आणि अवध प्रदेश, तामिळनाडूत कोंगूनाडू येथेही स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी आंदोलने होत आहेत. त्यात उत्तर कर्नाटकची नव्याने भर पडली आहे. ही मागणी मान्य होण्यासारखी नाही; पण आपल्यावर होणाºया अन्यायाला वाचा फोडणारी आहे. कर्नाटकातील राज्यकर्त्यांना उत्तर कर्नाटकच्या विकासाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल.