उत्तर प्रदेशमध्ये सायकल रोखणार कमळाची आगेकूच?

By admin | Published: January 24, 2017 01:08 AM2017-01-24T01:08:51+5:302017-01-24T01:08:51+5:30

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाशिवाय इतर पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी स्थापण्यावर गतसप्ताहाच्या अखेरीस एकमत झाले.

Uttar Pradesh will stop the cycle in front of the lotus? | उत्तर प्रदेशमध्ये सायकल रोखणार कमळाची आगेकूच?

उत्तर प्रदेशमध्ये सायकल रोखणार कमळाची आगेकूच?

Next

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाशिवाय इतर पक्षांनी एकत्र येऊन महाआघाडी स्थापण्यावर गतसप्ताहाच्या अखेरीस एकमत झाले. त्यापाठोपाठ समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचे जागावाटपही निश्चित झाले. अन्य पक्ष अद्याप या आघाडीमध्ये सहभागी व्हायचे आहेत. जागावाटपामध्ये सपाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची प्रतिमा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापेक्षा वरचढ दिसून आली. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये सपाने २९.१३ टक्के मते मिळवित २२४ जागा मिळविल्या होत्या. या निवडणुकीत कॉँग्रेसला ११.६५ टक्के मते मिळाली. ही मते सपा पेक्षा फारशी कमी नसली तरी त्यांच्या जागा मात्र अवघ्या २८ होत्या. शतकापेक्षा अधिक कालखंड झालेल्या या पक्षाचे अवधसह काही भाग हे बालेकिल्ले असल्याने त्यांची मते वाढल्याचे मानले जाते. आजही काही भागातील नागरिक हे कॉँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचे मानले जात आहे.
आगामी निवडणुकीसाठी आघाडी करणे हे कॉँग्रेस आणि सपासाठी गरजेचेच होते. आपले वडील आणि सपाचे संस्थापक मुलायमसिंह यादव, त्यांचे धूर्त बंधू शिवपालसिंह व अन्य जुन्या नेत्यांच्या तावडीतून पक्ष बाहेर आणण्यात अखिलेश यादव यांना आता यश आले आहे. तरुण, तडफदार आणि सौजन्यशील मुख्यमंत्री अशी प्रतिमा असलेल्या अखिलेश यांना ‘जंगलराज’ अशी असलेली उत्तर प्रदेशची प्रतिमा बदलण्यात मात्र अपयश आले. याला सर्वस्वी जबाबदार ठरले ते जुन्या काळचे नेते. या नेत्यांनी या तरुण मुख्यमंत्र्याला निर्णयाचे स्वातंत्र्यच न दिल्याने त्याला काही करता आले नाही. पक्षामध्ये बरीच भवती न भवती होऊन अखेरीस अखिलेश यांनी आपल्या काकांच्या फौजेशी झुंजून पक्ष आपल्या मनासारखा बांधण्याची संधी मिळविली. यादव वंशाचा बंडखोर म्हणून मतदारांपुढे जाऊन अखिलेश यांना फारसा फायदा होण्याची शक्यता दिसत नाही. मुलायमसिंहाना अद्यापही काही भागांमध्ये पाठिंबा असल्यानेच अखिलेश यांच्या समाजवादी पक्षाला काही तडजोडी कराव्या लागणार आहेत. अखिलेश यांना शिवपाल आणि आझम खान अशा नेत्यांना तिकिटे देण्याची तयारी दाखवावी लागली, ती यामुळेच !
पितृप्रधान, स्त्रीद्वेष्टा आणि गुन्हेगारी प्रवृत्तींची आळवणी करणारा पक्ष अशी असलेली समाजवादी पक्षाची प्रतिमा बदलणे ही एकट्या अखिलेश यांच्यासाठी तारेवरची कसरत ठरणार होती. म्हणूनच आघाडी करणे त्यांना गरजेचे वाटले. शतकभर जुन्या असलेल्या राष्ट्रीय पक्षाचे तरुण नेते राहुल गांधी यांच्याशी आघाडी करून अखिलेश यांनी तरुणांची फळी उभी केली आहे. उत्तर प्रदेशात ब्राह्मण समाज सुमारे १२ टक्के असून, तो परंपरेने कॉँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. कॉँग्रेसशी आघाडी केल्याने अखिलेश यांना हा बोनसच मिळाला आहे.
कॉँग्रेस आपल्या क्षमतेपेक्षा अधिक जागांची मागणी करीत असल्याने आघाडी होणार की नाही याबाबत शंका होती. २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कॉँग्रेसला उत्तर प्रदेशात केवळ दोन जागा मिळाल्या तर मोदी लाटेतही सपाने पाच जागांवर विजय मिळविला. या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांमध्ये जेवढी घट झाली, त्यापेक्षा सपाची घट कमी होती. अमेठी आणि रायबरेली या आपल्या गडांमध्ये कॉँग्रेसने अधिकतम जागा मागितल्या होत्या. अखेरीस घासाघीस करीत आघाडीवर शिक्कामोर्तब झाले.
अखिलेश आणि गांधी परिवारामधील घासाघिशीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे कॉँग्रेसच्या बाजूने असलेला ब्राह्मण समाजाचा पाठिंबा. उत्तर प्रदेशमधील ब्राह्मण समाज म्हणजे केवळ जात नाही तर त्यामध्ये मत बनविण्याची क्षमता आहे. स्थानिक मीडिया, शैक्षणिक संस्था, बार असोसिएशन अथवा धार्मिक संस्था या ठिकाणी हा समाज मत बनविण्याचे काम करीत असतो. हवा कोणत्या दिशेला वाहतेय याचा अचूक अंदाज हा समाज बांधू शकतो. त्याचा फायदा कुंपणावरच्या लोकांना होत असतो. उत्तर प्रदेशमध्ये केरळप्रमाणे मतप्रणालीवर निर्णय घेतले जात नसतात, असा अनुभव आहे. सन २००७च्या विधानसभा निवडणुकांमध्ये हवा मायावतींच्या बाजूने वाहत असल्याचा अंदाज व्यक्त झाला. निकालानंतर मायावती यांच्या पक्षाला बहुमत मिळालेले बघावयास मिळाले. मागील लोकसभा निवडणुकीत ब्राह्मण समाजासह उच्च वर्णियांनी भाजपाला मतदान केले. याचे कारण नरेंद्र मोदी हे होत. त्यांच्या मते मोदी हे परंपरागत हिंदुत्वाचे रक्षणकर्ते तसेच आधुनिक सुधारक असल्याने हा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला. मात्र सध्या उत्तर प्रदेशमधील भाजपा हा इतर मागासवर्गीयांच्या प्रभावाखालील जातीयवादी पक्ष असल्याचे मानले जात आहे. सध्या भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद ओबीसींचे नेते केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे आहे. याशिवाय जातीय विद्वेष पसरविणारे वक्तव्य केल्याबद्दल टीकेचे धनी झालेले भाजपा खासदार योगी आदित्यनाथ हे भाजपाचे स्टार प्रचारक आहेत. याशिवाय मोरादाबाद आणि सहरानपूर येथील जातीय दंगलींच्या जखमा आजही ताज्या आहेत. मोदी हे सुधारणा अंमलात आणतील अशी अपेक्षा सुशिक्षितांची होती. मात्र त्यांचा भ्रमनिरास झाल्याने हा वर्ग संतापलेला आहे. या संतापाचा उद्रेक मतपेटीतून होण्याची शक्यता आहे.
कॉँग्रेसची १२५ जागांची मागणी ही अखिलेश यांच्यासाठी त्रासदायक बाब होती. मात्र सपा - कॉँग्रेस आघाडीमुळे त्यांचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या आघाडीमध्ये संयुक्त जनता दल, राष्ट्रीय लोकदल आणि ममता बॅनर्जींची तृणमूल कॉँग्रेस जर सामील झाले तर ही आघाडी राष्ट्रीय पातळीवर एक पर्याय म्हणून समोर येईल. मागील लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ८० पैकी ७३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला जर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत या आघाडीने रोखले तर त्याचे पडसाद आगामी काळातही उमटू शकतात. याशिवाय पंजाबमध्ये अकाली दल-भाजपा युतीला अपयश आले तर त्याचाही फटका भाजपाला बसेल. तसेच २०१९च्या लोकसभा निवडणुका जिंकण्याचे मोदींचे मनोरथही धुळीला मिळवू शकतात. पक्षातील जुनाट व्यक्तींचा कंपू तसेच जुनाट विचारांना मागे टाकून अखिलेश यांनी युवकांमध्ये आयकॉन म्हणून स्थान मिळविले आहे. जर त्यांच्या आघाडीला यश मिळाले तर ते राष्ट्रीय पातळीवरही पर्याय ठरू शकतात. सपाचे निवडणूक चिन्ह सायकल आहे. त्यामुळे भाजपाला सायकलवर स्वार झालेल्यांपासून सावध रहावे लागेल.
-हरिष गुप्ता(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर )

Web Title: Uttar Pradesh will stop the cycle in front of the lotus?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.