वैष्णवीचा श्वास थांबला! का?- तर व्हेंटिलेटर नव्हता!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 12:00 PM2022-09-24T12:00:15+5:302022-09-24T12:00:49+5:30
कोरोनाकाळात ऑक्सिजनअभावी तडफडणारे लोक टाचा घासून मेले; पण निबर यंत्रणा आजही तेवढीच सुस्त आहे, हे नागपुरात सिद्ध झाले!
श्रीमंत माने
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे इस्पितळ (स्थानिक भाषेत ‘मेडिकल’) तब्बल दोन हजार खाटांचे आहे. भारतातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वांत मोठ्या इस्पितळांपैकी हे एक! येथील व्यवस्थेची लक्तरे एका सतरा वर्षांच्या मुलीच्या मृत्यूमुळे वेशीवर टांगली गेली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील वैष्णवी राजू बागेश्वर नावाची ही अत्यवस्थ मुलगी १५ सप्टेंबरला ‘मेडिकल’मध्ये दाखल करण्यात आली. तिची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती. श्वसनाचा त्रास होता. प्रकृती अत्यंत गंभीर होती. तिथल्या अनेकांच्या मते ती वाचण्याची शक्यता नव्हती. परंतु, डॉक्टरांना कुठल्याही रुग्णाबद्दल असे म्हणता येत नाही. अखेरपर्यंत कौशल्य पणाला लावावे लागते. जीव वाचविण्यासाठी उपलब्ध साधन-सुविधांचा वापर करावा लागतो. ‘मेडिकल’मध्ये मात्र तसे झाले नाही. वॉर्ड क्र. ४८ मध्ये तिच्यावर उपचार सुरू असताना कृत्रिम श्वासोच्छवास देण्याची गरज होती. पण, त्या वॉर्डातील दोन्ही व्हेंटिलेटर बिघडले होते. या इस्पितळात एकूण २२२ व्हेंटिलेटर्स आहेत आणि उपलब्ध माहितीनुसार त्यापैकी १९६ सुरू आहेत. तरीदेखील त्या विशिष्ट वॉर्डातील व्हेंटिलेटर बंद असल्याचे कारण देत तात्पुरत्या स्वरूपात तिला अंबू बॅगची व्यवस्था पुरविण्यात आली. खरे पाहता ती तात्पुरती व्यवस्था नव्हतीच. त्यानंतर तब्बल २४ तासांपेक्षा अधिक काळ ती मुलगी आर्टिफिशिअल मॅन्युअल ब्रिदिंग युनिट म्हणजे अंबू बॅगवरच होती. तिचे दुर्दैवी मातापिता तितके तास अंबू बॅगचे आळीपाळीने पंपिंग आणि सोबतच “लेकीचा जीव वाचविण्यासाठी व्हेंटिलेटर द्या” म्हणून डॉक्टर व कर्मचाऱ्यांची विनवणी करीत राहिले. भरती झाल्यानंतर तिसेक तासांनी वैष्णवीची मृत्यूशी झुंज संपली. तिला वाचविण्याची आईवडिलांची धडपड निबर व निष्ठुर यंत्रणेपुढे पराभूत झाली.
कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनअभावी हजारो लोकांचा तडफडून जीव गेला, टाचा घासून लोक मेले. तेव्हा असे वाटले, की त्यापासून सरकारे व सार्वजनिक यंत्रणा काहीतरी धडा घेतील. एकेका जिवाचे मोल या मंडळींना समजेल. पण, वैष्णवीचे प्रकरण पाहता असे काहीही घडलेले नाही. आपली आरोग्य यंत्रणा आधीही संवेदनाहीन होती व आताही ती तशीच आहे, हे चित्र अजिबात चांगले नाही. कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा, व्हेंटिलेटर्सची कमतरता वगैरे उणिवा चव्हाट्यावर आल्या तेव्हा केंद्र व राज्य सरकारे, सेवाभावी संस्था, अनेक उद्योग पुढे सरसावले. हजारोंच्या संख्येने व्हेंटिलेटर्स व अन्य साधने रुग्णालयांना पुरविण्यात आली. ‘मेडिकल’सारखी मोठी हॉस्पिटल्सच काय पण छोट्यामोठ्या इतर हॉस्पिटल्सनाही ही उपकरणे मिळाली. पीएमकेअर्स फंडातील मोठी रक्कमदेखील व्हेंटिलेटर खरेदीसाठी खर्च झाली. परिणामी, यापुढे किमान व्हेंटिलेटरअभावी कुणाचा जीव जाणार नाही, असे वाटत होते. दुर्दैवाने वैष्णवीच्या मृत्यूने तो गैरसमजही दूर झाला.
कृत्रिम श्वासोच्छवास व्यवस्थेची गरज असलेल्या रुग्णांना अंबू बॅगसारख्या तात्पुरत्या उपकरणांवर किती वेळ ठेवायचे, याचे निश्चित असे शास्त्र आहे. आता नागपूरच्या घटनेनंतर राज्याचे वैद्यक शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी राज्यभरातील वैद्यक महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांना तंबी दिली आहे, की अंबू बॅगचा वापर कमीतकमी वेळ करून रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी अधिक प्रगत साधनांचा वापर करा. अन्यथा, रुग्णांचा जीव गेला तर त्यांना जबाबदार धरले जाईल. नागपूर मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. सुधीर गुप्ता यांनी वैष्णवी मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तिथल्याच पाच डॉक्टरांची एक थातूरमातूर समिती नेमली होती. वैष्णवीला व्हेंटिलेटर मिळायला हवे होते, अशा अर्थाच्या सुभाषितवजा अहवालात त्या समितीने कोणालाच जबाबदार धरले नाही. परिणामी, वैद्यक शिक्षण संचालकांनी नागपूरबाहेरच्या तीन डॉक्टरांची दुसरी समिती नेमली. ही समिती काय करते बघूया. पण, खरी समस्या वेगळीच आहे. आपल्या व्यवस्थेचा सर्वांत मोठा दोष हा, की आपण अशी घटना घडली की तेवढ्यापुरते संवेदनशील बनतो. तेवढ्यापुरतेच आपल्याला दु:खाचे उमाळे व संतापाचे कढ येतात. आपली विस्मरणशक्ती प्रचंड ताकदीची आहे. किमान ही घटना तरी तिला अपवाद ठरावी. आणखी कुण्या वैष्णवीचा असा तडफडून मृत्यू होऊ नये.
(लेखक लोकमत नागपूरचे कार्यकारी संपादक आहेत)