वाजपेयींनी भाजपाला बनविले काँग्रेसचा समर्थ पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 03:54 AM2018-08-18T03:54:04+5:302018-08-18T03:54:21+5:30

अटलजी व्यक्तींपेक्षा मुद्यांवर बोलणे अधिक पसंत करत. त्याचा परिणाम असा झाला की वाजपेयी अजातशत्रू बनले. कोणत्याही आव्हानांवर आपल्या भाषाकौशल्याने मात करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते.

Vajpayee made BJP a potent alternative to Congress | वाजपेयींनी भाजपाला बनविले काँग्रेसचा समर्थ पर्याय

वाजपेयींनी भाजपाला बनविले काँग्रेसचा समर्थ पर्याय

googlenewsNext

- अरुण जेटली
(ज्येष्ठ केंद्रीय मंत्री)

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिली काही दशके देशात काँग्रेसच सत्तास्थानी होती. मात्र अशा वातावरणातही अटलबिहारी वाजपेयींनी काँग्रेसला समर्थ पर्याय ठरेल असा भाजपा मजबुतीने उभा केला. गेल्या दोन दशकात भाजपा काँग्रेसपेक्षाही मोठा पक्ष बनला आहे. भाजपा आता केंद्रात व देशातील बहुतांश राज्यात सत्तेवर आहे, असे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. वाजपेयी व अडवाणी यांनी संयुक्त प्रयत्नाने भाजपामध्ये दुसऱ्या फळीचे नेतृत्वही उभे केले. वाजपेयी हे नेहमी नवीन संकल्पनांचे स्वागत करत. कोणतीही गोष्ट राबविताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे त्यांचे धोरण होते. ते व्यक्तींपेक्षा मुद्यांवर बोलणे अधिक पसंत करत. त्याचा परिणाम असा झाला की वाजपेयी अजातशत्रू बनले. कोणत्याही आव्हानांवर आपल्या भाषाकौशल्याने मात करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. संसदेत व जाहीर सभांमध्ये वाजपेयी यांनी केलेल्या ओघवत्या व ओजस्वी भाषणांच्या आठवणी लोकांच्या मनात कायम राहतील.
कारगील युद्धात मिळाला विजय
वाजपेयी यांनी केंद्रात विविध पक्षांच्या आघाडीचे सरकार यशस्वीपणे चालवून दाखविले. १९९८ साली पोखरण येथे अणुचाचणी करून देशाच्या सामर्थ्याचे दर्शन घडविले. पाकिस्तानशी शांतता व सलोख्याचे संबंध प्रस्थापित होण्यासाठी वाजपेयींनी केलेल्या प्रयत्नांचे त्या शेजारी राष्ट्रानेही कौतुक केले होते. कारगील युद्धात पाकिस्तानचा भारताने केलेला पराभव ही वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीतील महत्त्वाची कामगिरी होती.
जनसंघापासून राजकीय कार्याला प्रारंभ
विद्यार्थीदशेत असताना वाजपेयी चले जाव चळवळीत सहभागी झाले होते. त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेले. तिथे काम करत असताना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या संपर्कात आल्यानंतर ते राजकीय कार्यात व्यग्र झाले. भारतीय जनसंघाच्या संस्थापकांमध्ये वाजपेयी यांचाही समावेश होता. काश्मीरमध्ये भारतीय नागरिकांवर जी विविध बंधने घालण्यात आली होती त्या विरोधात करण्यात आलेल्या सत्याग्रहात ते डॉ. मुखर्जी यांच्यासमवेत सहभागी झाले होते. लियाकत-नेहरू कराराला विरोध करणाºयांमध्ये वाजपेयींचा समावेश होता. १९५७ साली ते लोकसभेत पहिल्यांदा निवडून आले. तिथे तिबेट प्रश्न, १९६२ साली झालेले चीनचे युद्ध यावर त्यांनी केलेली भाषणे संस्मरणीय ठरली. जनसंघाच्या कार्यासाठी देशभर फिरत असतानाच ओजस्वी वक्तृत्वाने त्या काळात त्यांनी अनेक जणांना प्रभावित केले. १९६२ साली चीनने केलेल्या पराभवानंतर देशात डॉ. राममनोहर लोहियांनी काँग्रेस हटाव देश बचाव या संकल्पनेचा जोरदार प्रचार सुरू केला. दीनदयाल उपाध्याय, आचार्य कृपलानी व डॉ. लोहिया यांच्या संयुक्त प्रयत्नांनी १९६७ च्या निवडणुकीत बिगरकाँग्रेस पक्षांना पूर्वीपेक्षा थोडे चांगले यश मिळाले. त्यात जनसंघाचेही खासदार लक्षणीय संख्येने निवडून आले होते.
राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य
पक्षोपपक्षांतील भेदाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहिताला प्राधान्य देणे हा वाजपेयींचा स्वभावविशेष होता. १९७१ च्या बांगलादेश युद्धाच्या वेळेला अटलबिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारची पाठराखण केली होती. १९७४ ला जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जी चळवळ उभी राहिली त्यात वाजपेयी सहभागी झाले. आणीबाणीविरुद्ध जनसंघाने संघर्ष केला व लोकशाहीचे रक्षण केले. जनसंघ व अन्य पक्षांचे विलिनीकरण करुन जनता पक्ष स्थापन झाला. त्याचे सरकारही सत्तेवर आले पण तो सगळाच प्रयोग पुढे फसला. १९८० साली भाजपची स्थापना करण्यात आली. त्यावेळी प्रधानमंत्री की अगली बारी, अटलबिहारी, अटलबिहारी, ही घोषणा कार्यकर्त्यांनी दिली होती. ती भविष्यात खरी ठरली. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर त्यांनी देशाच्या विकासासाठी केलेले काम सर्वांसमोर आहेच. ते आपल्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी तसेच अधिकारी यांच्याशी अत्यंत सौजन्याने वागत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्येक मंत्र्याने मोकळेपणाने बोलावे, असा त्यांचा आग्रह असे. वाजपेयी हे अत्यंत प्रतिभावान कवी होते. त्यांनी आपल्या कवितांतून अनेक महत्त्वाच्या विषयांवर चिंतन केले आहे. अटलबिहारी वाजपेयींची विश्वासार्हता मोठी होती. त्यामुळे ते कधीही वादग्रस्त ठरले नाहीत.
 

Web Title: Vajpayee made BJP a potent alternative to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.