वाकडी ते राईनपाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:11 PM2018-07-03T12:11:49+5:302018-07-03T12:12:11+5:30
- मिलिंद कुलकर्णी
भौतिक प्रगती साधत असताना, विज्ञान-तंत्रज्ञानाचा साधन म्हणून लिलया वापर करणारा माणूस दिवसेंदिवस असहिष्णू व संवेदनाशून्य होत चालल्याची भयावह उदाहरणे महाराष्टÑात विशेषत: ग्रामीण भागात दिसू लागली आहेत. एकसंघ आणि निकोप समाजाच्यादृष्टीने ही भयसूचक घंटा आहे. या घटनांनी संपूर्ण माणुसकीला काळीमा फासला जात आहे. वाकडीतील घटनेत अंघोळीने विहिर बाटवली म्हणून दोन कुमारवयीन मुलांची नग्न धिंड काढून बेदम मारहाण करण्यात आली. त्याची चित्रफित बनवून स्वत:ची मर्दुमकी गाजविण्यासाठी समाजमाध्यमांवर प्रसारीत करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा या गावात आठवडे बाजारात भविष्य सांगणाऱ्या मंगळवेढा (जि.सोलापूर) येथील पाच जणांना मुलांना पळवून नेणाºया टोळीचे सदस्य समजून ३ ते ५ हजार लोकांच्या जमावाने ठेचून मारण्याचे राक्षसी कृत्य केले. मुले पळवून नेण्याची अफवा सध्या खान्देशसह संपूर्ण देशभर पसरली आहे. समाजमाध्यमांमुळे या अफवेचा अधिक वेगाने प्रसार होत आहे. मास हिस्टेरिया असे त्याला म्हटले जाते. कोणतीही खातरजमा न करता, विवेक, भान न वापरता समूहाची मानसिकता प्रभावी ठरुन अशी राक्षसी कृत्ये घडू लागली तर हाहाकार माजेल. विशेष म्हणजे, या घटना ग्रामीण भागात सर्वाधिक घडत आहे. पाचोरा, म्हसावद, घोटाणे, भादली बुद्रूक, सुभाष वाडी अशा गावांमध्ये केवळ गैरसमजापोटी हे प्रकार घडले आहेत. दोन दिवसांपूर्वी ‘समाजमाध्यम दिन’ साजरा करण्यात आला. या संपर्काच्यादृष्टीने प्रभावी असलेल्या माध्यमाचे उपयोग, चांगल्या बाजूंवर साधकबाधक चर्चा झाली. परंतु अफवा पसरविण्यात, चुकीच्या गोष्टी प्रसारीत करण्यासाठी या माध्यमांचा दुरुपयोग होत असेल तर ही चिंताजनक गोष्ट आहे. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये एकविसाव्या शतकात अंधश्रध्देचा मोठा पगडा आहे. भुताटकी, डाकीण असे प्रकार सर्रास घडतात. ज्योतिषावर गाढ विश्वास असतो. त्यातूनच मुले पळविणारी टोळी, किडन्या काढून विकणारी टोळी अशी अफवा पसरली तर भोळ्याभाबड्या आदिवासी बांधवांचा त्यावर पटकन विश्वास बसतो. समूह मानसिकतेच्या प्रभावात मग असे राक्षसी क्रौर्य घडून येते. माणूस माणसाचा जीव घेण्यापर्यंत बेभान होऊ शकतो हे खरोखर भयंकर कृत्य आहे. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतर खेडोपाडी शिक्षण, आरोग्य, दळणवळण, वीज, पाणी पोहोचविण्यात यश मिळाले. भौतिक सुविधा दिल्या गेल्या. परंतु ‘आम्ही सारे भारतीय आहोत’ ही भावना पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेत अडकून राहिली. आमच्या मन आणि हृदयात ती पोहोचली नाही. शहाणपण, समंजसपणा आला नाही. प्रबोधनाच्या निव्वळ गप्पा झाल्या; पण माणसे अद्यापही जातपात, अंधश्रध्दा, प्रांतभेद या जोखडात अडकून पडली आहेत. मानसिकदृष्टया सक्षमीकरणाची नितांत गरज अशा घटनांमधून आवर्जून दिसून येते.