मोलाचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2017 02:29 AM2017-04-13T02:29:02+5:302017-04-13T02:29:02+5:30

तिहेरी तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व या मुस्लिमांमध्ये रूढ असलेल्या प्रथांची घटनात्मक वैधता पडताळण्याचे कार्य सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठातर्फे केले

Valuable advice | मोलाचा सल्ला

मोलाचा सल्ला

Next

तिहेरी तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व या मुस्लिमांमध्ये रूढ असलेल्या प्रथांची घटनात्मक वैधता पडताळण्याचे कार्य सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठातर्फे केले जात आहे. या अनुषंगाने मुस्लीम समाजातील या प्रथांवर सखोल चर्चा सुरू असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित या वादावर आतातरी कायमस्वरूपी तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त होत आहे. या परंपरांबद्दल भिन्नभिन्न मतप्रवाह समोर येत असतानाच उपराष्ट्रपती डॉ. हमिद अन्सारी यांच्या पत्नी सलमा अन्सारी यांनी केलेले वक्तव्य मुस्लीम महिलांना विचार करण्यास बाध्य करणारे आणि अत्यंत मौलिक आहे. पती तीन वेळा तलाक उच्चारून पत्नीला सोडचिठ्ठी देऊ शकत नाही. अशा तलाकला कुराणात कुठेही आधार नाही. तेव्हा मुस्लीम महिलांनी मौलानांच्या सांगण्यावर आंधळेपणाने विश्वास न ठेवता स्वत: कुराण वाचून तलाकचे वास्तवित तत्त्व समजून घ्यावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. मूळ अरबी भाषेतील कुराण वाचा आणि आत्मचिंतन करा. म्हणजे कुणीही तुमची दिशाभूल करू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. त्याचे कारण असे की, अशा रूढी परंपरांचा पगडा एवढा घट्ट असतो की केवळ न्यायालयाच्या निकालाने तो सैल होत नाही. त्यासाठी मुळात गरज असते ती मानसिकता बदलण्याची. महिलांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या, त्यांच्या आत्मसन्माला ठेच पोहोचविणाऱ्या अशा अनेक रूढी परंपरा केवळ मुस्लीमच नव्हे तर अन्य धर्मातही अस्तित्वात आहेत. धार्मिक ग्रंथांमधील वचनांचा अर्थ लावणे ही गेली कित्येक शतके पुरुषांचीच मक्तेदारी राहिली आहे. पुरुषाला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सोयीनुसार त्याचे अन्वयार्थ काढले गेले. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. धर्ममार्तंड सांगतील ते स्वीकारण्याचा काळ केव्हाच मागे पडला आहे. सामाजिक परिवर्तन आणि न्यायासाठी झालेल्या अनेक ऐतिहासिक चळवळींमध्ये मुस्लीम स्त्रियांनी सक्रिय सहभाग आणि वेळप्रसंगी पुढाकार घेतल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. मौखिक तलाक घटनाबाह्य आणि मुस्लीम महिलांवर अन्याय करणारी क्रुर प्रथा असल्याचा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिला आहे. लवकरच सर्वोच्च न्यायालयाचाही निकाल येईल. पण खरी गरज आहे ती मुस्लीम महिलांमध्ये अधिक जागरूकता निर्माण होण्याची.

Web Title: Valuable advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.