भारतीय रुपयाचे मूल्य का कमी होते?; जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 02:47 AM2018-09-07T02:47:57+5:302018-09-07T02:48:33+5:30

गेल्या काही दिवसांपासून भारतीय रुपयाची आंतरराष्ट्रीय किंमत सतत कमी होत आहे आणि गेल्या सहा दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत तब्बल २.५० रुपयांनी घसरली आहे.

The value of Indian Rupee decreased ?; Uncertainty in the global economy | भारतीय रुपयाचे मूल्य का कमी होते?; जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता

भारतीय रुपयाचे मूल्य का कमी होते?; जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता

googlenewsNext

- सोपान पांढरीपांडे
(वाणिज्य संपादक, लोकमत)

गेल्या काही दिवसांपासून भारतीय रुपयाची आंतरराष्ट्रीय किंमत सतत कमी होत आहे आणि गेल्या सहा दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत तब्बल २.५० रुपयांनी घसरली आहे. बुधवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हा रुपयाची किंमत एक डॉलरला रु. ७१.७२ होती. ही आजवरची सर्वात कमी किंमत आहे.

किंमत कमी का होते आहे?
रुपयाच्या या घसरगुंडीला प्रामुख्याने अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्ध व त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत आलेली अस्थिरता, सोन्याचे कमी होत जाणारे भाव, कच्च्या तेलाचे वाढणारे भाव ही आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. याचबरोबर देशातील अर्थव्यवस्थेतील मंदी, विदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून गुंतवणूक काढून घेणे, भारताच्या विदेश व्यापारातील वाढती तूट व महागाई ही आंतरदेशीय कारणे आहेत.

व्यापार युद्ध : अमेरिकेने चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आली आहे. सोन्याचे भाव सतत घसरत आहेत. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १३६२ डॉलर्स प्रति औंस (२८.३४ ग्रॅम) होते, ते आज ११९५ डॉलर्सवर आले आहेत. सोन्यातील गुंतवणूक त्यामुळे डॉलर विनिमय व्यापारात वळली आहे. परिणामी इतर चलनांच्या किमती कमी होत आहेत. त्यात रुपयाही आहे.

कच्च्या तेलाच्या किमती
कच्च्या तेलाचे भाव आॅर्गनायझेशन आॅफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (ओपेक) ठरवत असते. गेल्या वर्षी कच्चे तेल ६४ ते ६५ डॉलर्स प्रति बॅरल होते, ते बुधवारी ७८ डॉलर्सवर गेले आहे. भविष्यात ते १०० डॉलर्सवर जाण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे भारतात महागाईचा दर गेल्या एक वर्षात ४.१ टक्क्यांवरून ५.६ टक्क्यांवर गेला आह़े

विदेश व्यापारातील तूट
देशाच्या चलनाची आंतरराष्ट्रीय किंमत ठरविण्यामध्ये त्या देशाच्या विदेश व्यापारातील तूट वा आधिक्य महत्त्वाचे असते. २०१७-१८ या वर्षात भारताची एकूण निर्यात ९.८० टक्क्यांनी वाढून ३०२.८४ अब्ज डॉलर्स होती तर आयात चक्क २० टक्क्यांनी वाढून ४५९.६७ अब्ज डॉलर्स झाली. त्यामुळे विदेश व्यापारातील तूट १५६.८३ अब्ज डॉलर्सवर गेली. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न साधारणत: २.२५ खर्व (ट्रिलियन) डॉलर्स आहे. त्याच्या २.९० टक्के ही तूट आहे. रुपयांमध्ये बोलायचे झाले तर ही तूट तब्बल सहा लाख कोटींच्या घरात आहे.

विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढली
विदेशी गुंतवणूकदार (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स-एफपीआय) शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. या गुंतवणूकदारांनी एप्रिल ते जून २०१८ या तिमाहीत साधारणत: ६१००० कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली. मात्र अमेरिकन गुंतवणूकदार व अर्थतज्ज्ञ निक पोल्सन्स यांनी मुंबई शेअर बाजार (३८०१८.३१) व एनएसई निफ्टी (११४७६.९५) अशा सुदृढ स्थितीत असल्याने भारताने फारशी काळजी करण्याची गरज नसल्याचे भाकित केले आहे. ते खरे ठरते काय की रुपया आणखी गडगडतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Web Title: The value of Indian Rupee decreased ?; Uncertainty in the global economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.