व्याघ्र दिनानिमित्त सव्वा शेर भीतीचे स्मरण
By चंद्रशेखर कुलकर्णी | Published: July 29, 2017 07:22 AM2017-07-29T07:22:01+5:302017-07-29T07:29:37+5:30
२९ जुलै रोजी दरवर्षी जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातही यानिमित्त अनेक कार्यक्रम होतात. मागील वर्षीच्या व्याघ्र दिनावर "जय" नावाच्या वाघाच्या गायब होण्याचे सावट होते.
२९ जुलै रोजी दरवर्षी जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातही यानिमित्त अनेक कार्यक्रम होतात. मागील वर्षीच्या व्याघ्र दिनावर "जय" नावाच्या वाघाच्या गायब होण्याचे सावट होते. त्यामुळे नागपूर येथे झालेल्या या दिनाच्या विशेष शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मूनगंटीवार या दोघांनीही आपल्या भाषणात "जय" वाघ सापडणारच अशी उपस्थितांना ग्वाही दिली होती.
यंदा चित्र अधिकच स्पष्ट झाले आहे. जय वाघासोबतच त्याचे अपत्य असलेला श्रीनिवास हा वाघही गायब झाला होता. परंतू २० एप्रिल २०१७ रोजी श्रीनिवास वाघाच्या गळ्याची रेडीओ कॉलर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वन विभागातील नागभीड नजीक मिळाली.त्या ठिकाणानजीकच श्रीनिवास वाघाचा जमिनीत पुरलेला देहही मिळाला.एका शेतकऱ्याने आपणच या वाघाला वीजप्रवाह देवून मारल्याची कबुलीही दिली. हे दोन्ही वाघ सुरक्षित असावे असे छातीठोकपणे सांगणारे देहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेचे तज्ञही श्रीनिवास वाघाचा वीजप्रवाह देवून मारून गाडलेला मृतदेह पाहून अबोल झाले. आता ते यापुढे महाराष्ट्रातील कुण्याही वाघाच्या सुरक्षित असण्याची ग्वाही देवू शकणार नाही.
तब्बल एक वर्षांनी पुन्हा जागतिक व्याघ्र दिन साजरा करतांना "जय" वाघ आता दिसणे नाही एवढे तरी स्पष्ट झालेआहे.मुख्यमंत्री,वनमंत्री किंवा वनखाते असे भलेही जाहीररित्या मान्य करणार नाहीत पण निदान आता तरी ते राज्यातील वाघांच्या सुरक्षित असण्याबाबत सार्वजनिक कार्यक्रमात मागील वर्षीप्रमाणे छातीठोक पणे बोलणार नाही. मागील एक वर्षात झालेला हा एकमेव महत्वपूर्ण बदल म्हणावा लागेल.राज्यातील वाघ शिकाऱ्यांपासून सुरक्षित नाहीत हे त्यांनाही कळून चुकले आहे.एवढेच नाही तर या वाघांच्या सुरक्षित राहण्यासाठी आपण काही ठोस पावले महाराष्ट्रात उचलू शकलो नाही हेही उमगले आहे. असे नसते तर देशातील या क्षेत्रातील तज्ञांना सोबत घेवून त्यांनी यावर ठोस उपाय योजना आखल्या असत्या. त्यामुळे राज्यातील वाघांच्या शिकारी थांबल्या असत्या.
असे न करता वनमंत्री व्याघ्र पर्यटनाची माळ जपत आहेत.सोबतच व्याघ्र दूतांचे उंबरठे झिजवून प्रसिद्धी पदरी पडून घेतांना दिसत आहे."रोम जळत होते आणि निरो फिडल वाजवीत होता "अशी काहीशी ही स्थिती आहे.वाघच राहणार नसतील तर व्याघ्र पर्यटन तरी कसे होईल एवढेही सरकारला समजू नये याचे आश्चर्य वाटते. वृक्श संवर्धनासाठी अथक प्रयत्न करणा-या वनमंत्री मुनगंटीवर यांच्याकडून व्याघ्र संवर्धनाच्या बाबतीतही तशीच अपेक्शा आहे.
त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे राज्यकर्ते असे फारसे गंभीर नसतांना वनखात्यातील काही धडाडीचे अधिकारी मात्र घेतल्या पगाराला जागत आहेत. मेळघाट मध्ये स्थापन केलेल्या सायबर सेलने उत्कृष्ट कामगिरी करीत अनेक शिकाऱ्यांना पकडले. न्यायालयांनीही हा विशय अधिक गांभीर्याने घेवून बाहेरील राज्यांमधून दरवर्षी येथे येवून शिकारी करणाऱ्या कुख्यात आरोपींना बहुतांश प्रकरणांमध्ये जामीन नाकारले व तुरुंगाचा रस्ता दाखविला. पण फक्त एवढे उपाय या गंभीर रोगावर पुरेसे होणार नाहीत. मोदींनी गुजरात राज्यातील सिंहांना जसे संरक्षण पुरविले त्याचे अनुकरण करून महाराष्ट्रात उपाय योजना व्हाव्या असे या क्षेत्रातील तज्ञांना वाटते.दुःखाची गोष्ट ही कि तज्ञांजवळ असणाऱ्या या उपाययोजना प्रत्यक्षात आणायला मोदींंच्याच भाजपाच्या महाराष्ट्रातील सरकारला वेळ नाही. ती फुरसत मिळेल तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. यंदाच्या व्याघ्र दिनाच्या शासकीय कार्यक्रमाच्या देखाव्यात आपल्याला महाराष्ट्रातील व्याघ्र संरक्षणाची दशा आणि दिशा काय आहे आणि राहील याची झलक पाहायला मिळेलच. विदर्भातील जय व त्याची प्रजा या कार्यक्रमाकडे आस लावून बसली आहे. अरण्यातील हे महाभारतही आता जय नावाचा इतिहास बनून राहिले आहे.