वेध - बा विठ्ठला... त्यांना सद्बुद्धी दे!

By admin | Published: July 7, 2017 12:38 AM2017-07-07T00:38:44+5:302017-07-07T00:38:44+5:30

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूर देवस्थान अध्यक्षपदी कृष्णा परिवाराचे डॉ. अतुल भोसले यांची निवड झाली. वारकरी संप्रदायाचा विश्वास त्यांना

Vedh-ba Vitthala ... give them wisdom! | वेध - बा विठ्ठला... त्यांना सद्बुद्धी दे!

वेध - बा विठ्ठला... त्यांना सद्बुद्धी दे!

Next

- राजा माने 

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूर देवस्थान अध्यक्षपदी कृष्णा परिवाराचे डॉ. अतुल भोसले यांची निवड झाली. वारकरी संप्रदायाचा विश्वास त्यांना आपल्या कामातूनच संपादन करावा लागेल. त्यासाठी कृतिशील कारभार हाच पर्याय आहे...

आषाढी वारीतील दिंड्या आणि वारकरी विठ्ठलनामाचा गजर करीत आपल्या गावाकडे कूच करू लागले आहेत. मान्सूनचे आगमन राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात धडाक्यात झाल्याने तिथला बळीराजा पेरणी आणि इतर कामात गुंतला. त्यामुळे यावेळच्या आषाढी वारीत पंढरीत दाखल होणाऱ्या माऊलींची संख्या थोडी घटली. तेच प्रश्न, त्याच समस्या आणि त्यावर घणाघाती चर्चा ही परंपरा कायम राखत आषाढीने निरोप घेतला. यावर्षीच्या वादात एक नवा विषय मात्र अंतर्भूत झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी कराडच्या कृष्णा सहकार, उद्योग व शिक्षण समूहाचे डॉ. अतुल भोसले यांची व इतर सदस्यांची नियुक्ती जाहीर केली आणि वादाला तोंड फुटले. अध्यात्म आणि वारकरी संप्रदायाशी अतूट नाते असलेल्या श्री विठ्ठल देवस्थानच्या अध्यक्षपदी राजकीय व्यक्तीची निवड वारकरी, फडकरी आणि वारकरी संप्रदायाच्या सर्वच घटकांना खटकली. त्यातूनच पालखी सोहळा रोखून धरण्याचा प्रयत्न झाला. सोलापूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे पालखी सोहळा पुढे सरकला. वारकरी संप्रदायातून उमटलेल्या प्रतिक्रियेमुळे अडीच वर्षे रखडलेल्या मंदिर समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा विषय मार्गी लागूनही निवड झालेल्यांच्या आनंदावर मात्र विरजण पडले. शेकडो वर्षांची आषाढी वारीची परंपरा आणि या परंपरेशी इमान राखत सर्वच समस्यांना निमूटपणे हसतमुखाने सामोरे जाणारे देशभरातील लाखो वारकरी आणि पंढरपूरकरांचे आभार मानावे तेवढे कमीच ठरतील. वारी कालावधीत आणि आजही दररोज किमान १२० टन कचरा उचलण्याचे काम पंढरपुरात चालू आहे. त्या कामात कुचराई झाली तर पंढरपूरकरांना दरवर्षी काय यातना सहन कराव्या लागत असतील, याचा विचार केला पाहिजे. पंढरपूर शहरातील रस्ते, चंद्रभागा नदीपात्राची स्वच्छता, वारी कालावधीतील पाणी व्यवस्था, लाखो वारकऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत तोकडी ठरणारी स्वच्छतागृहे, पंढरीत वेगवेगळ्या मार्गाने दाखल होणाऱ्या दिंडी मार्गांची अवस्था आणि पंढरपूर देवस्थानचा कारभार हे सर्व नेहमीचेच विषय आहेत. या विषयांना हाताळण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन, पंढरपूर नगर परिषद, पंढरपूर विकास प्राधिकरण आणि पंढरपूर देवस्थान प्रशासन यांची आहे. या सर्वांचे सूत्रधार या नात्याने राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कृतिशील नजर या सर्वांवर असणे अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातून त्या सर्व घटकांना शक्ती देण्याचे काम त्यांच्याकडून झाले पाहिजे. त्याच घटकांपैकी एक घटक म्हणजे देवस्थान समिती. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले यांची निवड म्हणजे राजकीय सोय, असे गणित मानले जाणे स्वाभाविक आहे. राज्याच्या सहकार क्षेत्रात ज्यांच्या नावाचा दबदबा आजही आहे अशा स्व. जयवंतराव भोसले यांचे नातू तसेच कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांचे डॉ. अतुल हे चिरंजीव आहेत. सहकार, शिक्षण, आरोग्य आणि बँकिंग क्षेत्रात आपली वेगळी ओळख असणाऱ्या कृष्णा परिवाराचे शिलेदार म्हणूनच डॉ. अतुल यांच्याकडे पाहिले जाते. स्व. विलासराव देशमुख यांचे बंधू माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे जावई म्हणूनदेखील त्यांची ओळख आहे. सातारा जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचा कराड गड मजबूत करण्यासाठी त्यांची रसद भाजपच्या कामी येऊ शकते. या पार्श्वभूमीवर ठोस कामे आणि प्रशासनातील क्रांतिकारी बदल दाखवूनच डॉ. अतुल यांना आपली निवड सार्थ असल्याचे वारकरी संप्रदायाला सिद्ध करून दाखवावे लागेल. ते दाखविण्यासाठी नोटाबंदी कालावधीत झालेल्या घोटाळ्यांपासून ६५ एकर तळापर्यंतच्या अनेक विषयांना न्याय देण्याचे काम त्यांना करावे लागेल. त्याचसाठी बा विठ्ठला, त्यांना सद्बुद्धी दे!!

Web Title: Vedh-ba Vitthala ... give them wisdom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.