‘वीर’ अन् सिंगही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:57 AM2018-06-22T00:57:34+5:302018-06-22T00:57:34+5:30

शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याची जबाबदारी ही त्या शहरातील विकास प्राधिकरणाची असते.

'Veer' and Singahi | ‘वीर’ अन् सिंगही

‘वीर’ अन् सिंगही

Next

शहराचा नियोजनबद्ध विकास करण्याची जबाबदारी ही त्या शहरातील विकास प्राधिकरणाची असते. बाहेरच्या व्यक्तीने एखाद्या शहराचा फेरफटका मारला तर तेथील रस्ते, फूटपाथ, अतिक्रमण, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आदी बाबी पाहून त्याला तेथील विकास प्राधिकरण किती सक्षम आहे, याचा अंदाज येतो. शेवटी प्राधिकरण ही एक संस्था आहे. तीत काम करणारे अधिकारी- कर्मचारी सक्षम असतील तर ते प्राधिकरणही सक्षम होते. कोणताही अधिकारी एखाद्या शहरात नवा नवा आला की खूप कामाचा सपाटा लावतो. जसजसा वेळ निघत जातो तसा अधिकारी रुळतो व त्यालाही ‘चलता है’ची सवय लागते. नंतर रस्त्यावर फिरणारा अधिकारी आपली एसी केबीन सोडतच नाही. मात्र, नागपूर महापालिकेला मिळालेले आयुक्त वीरेंद्र सिंग यांची कार्यशैली व कामातील सातत्य सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांची निर्भीड शैली पहिल्या दिवसांपासून नागपूरकर अनुभवत आहेत. सिंग यांनी आल्याआल्या आपल्या प्रशासनाला शिस्तीची छडी दिली. लेटलतिफ कर्मचाऱ्यांना निलंबित केले. कर्मचारी वठणीवर येताच सिंग शहरातील रस्त्यांवर उतरले. ज्या गल्लीत कदाचित नगरसेवक पोहचले नसतील तेथे ते स्वत: आपली टीम घेऊन पोहचत आहेत. आज पांढराबोडी तर उद्या नाईक तलाव, असा दौरा दररोजचा ठरलेलाच. शहरातील फूटपाथ, रस्त्यांवर पडलेले खड्डे असो की कुणी केलेले अतिक्रमण, सिंग स्वत: पाहणी करतात व त्वरित सुधारणा करण्याचे आदेश देतात. आपले आयुक्त दररोज शहरात फिरतात, ते कधीही आपल्या एरियात पोहचतील याचा धसका निर्ढावलेल्या झोन कर्मचाºयांनीही घेतला आहे. सफाई कर्मचारी दररोज रस्त्यावर दिसतात. झोन कार्यालयात कर्मचारी वेळेत कामावर पोहचतात. दुपारी चहाच्या टपºयांवर वेळ न घालवता आपल्या टेबलवर दिसतात. यामुळे प्रशासनाला एकप्रकारे गती मिळाली आहे. झोन कार्यालयातील प्रलंबित फाईलची संख्याही कमी झाली आहे. विशेष म्हणजे दूषित हेतूने काम करणाºया नगरसेवकांवरही वचक निर्माण झाला आहे. चुकीच्या कामासाठी आयुक्तांच्या कक्षात जाण्यापूर्वी नगरसेवकही चारदा विचार करतात. महापालिका आयुक्त अश्वीन मुदगल यांची जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यावर सिंग आयुक्त म्हणून आले. पण सिंग यांचा ‘झेलुगिरी’न करण्याचा जुना रेकॉर्ड पाहता सत्ताधारी गटाचीही चिंता वाढली होती. सिंग यांना रुजू करून घेण्यात सरकारकडून झालेला विलंब बरेच काही सांगून गेला. ऐकलं ते खरं होतं, हेच आयुक्त सिंग यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. हा दरारा, कामाचा सपाटा, निर्भीड स्वभाव पुढेही असाच कायम राहोे, हीच अपेक्षा. कारण यातच नागपूरकरांचेही हित आहे. कारण तीन वर्षांनी अधिकारी तर बदली होऊन जातात पण त्याचे कामच त्यांची आठवण देत असते.

Web Title: 'Veer' and Singahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.