खान्देशचे वीर चंदू आणि निशा

By admin | Published: January 27, 2017 11:43 PM2017-01-27T23:43:09+5:302017-01-27T23:43:09+5:30

खान्देशासाठी हा पंधरवडा आनंददायी घटनांनी भरलेला होता. चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या चंदू चव्हाण या जवानाची सुटका झाली आणि...

Veer Chandu and Nisha of Khandesh | खान्देशचे वीर चंदू आणि निशा

खान्देशचे वीर चंदू आणि निशा

Next

खान्देशासाठी हा पंधरवडा आनंददायी घटनांनी भरलेला होता. चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या चंदू चव्हाण या जवानाची सुटका झाली आणि भडगावच्या निशा पाटीलला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. चंदू चव्हाण आणि निशा पाटील हे शूरवीर खान्देशातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहे. जल्लोष, आनंदोत्सवासोबत समाजमाध्यमांवर दोघांच्या कर्तृत्वाच्या गाथा गायल्या जात आहेत.
चंदू चव्हाण हा जळगाव जिल्ह्यातील सामनेर येथील मूळ रहिवासी. आईवडिलांचे निधन झाल्याने आजी-आजोबांनी चंदू आणि त्याच्या भावंडांना आजोळी म्हणजे धुळे जिल्ह्यातील बोरविहिर येथे नेले. चंदूचा मोठा भाऊ भूषण सैन्यात गेला. त्यापाठोपाठ चंदू हादेखील राष्ट्रीय रायफल्सच्या ३७ व्या बटालियनमध्ये सहभागी झाला. सप्टेंबर २०१६ मध्ये लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर चंदू चव्हाण अनावधानाने सीमा रेषा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेला. लष्कराने प्रथम ही माहिती जाहीर केली. सर्जिकल स्ट्राईकचा जल्लोष देशभर साजरा होत असताना खान्देशात मात्र चंदूच्या बातमीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. चंदूच्या कुटुंबियांवर तर आभाळ कोसळले. या घटनेचा धक्का बसून आजीचे निधन झाले. गर्भवती असलेल्या बहिणीला ही बातमी कळू दिली नाही. तिने इंदूरला गोंडस बाळाला जन्म दिला. चव्हाण कुटुंबात लागोपाठ घडणाऱ्या सुख-दु:खाच्या या घटनांनी सारेच चक्रावले. चंदू आल्याशिवाय आजीचे अस्थिविसर्जन करायचे नाही, हा कुटुंबियांनी निर्णय घेतला. दसरा-दिवाळीही अंधारात गेली. परंतु सर्व जातीधर्माची मंडळी धीरोदात्तपणे चव्हाण कुटुंबियांसोबत राहिली. सह्याची मोहिम, निवेदने याद्वारे केंद्र सरकारकडे गाऱ्हाणे मांडत राहिले.धुळ्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्याकडे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रिपद असल्याने चव्हाण कुटुंबिय आणि खान्देशी जनतेच्या आशा कायम होत्या. त्यांनी संरक्षण व परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने पाकिस्तानशी संपर्क व संवाद कायम ठेवला. चंदू चव्हाण पाकिस्तानात नसल्याचा दावा करणाऱ्या तेथील सरकारने १३ आॅक्टोबर रोजी चंदू ताब्यात असल्याचे मान्य केले. हा मोठा दिलासा होता. सर्जिकल स्ट्राईकमुळे खवळलेल्या पाकिस्तानला हस्तांतरण नियम आणि जिनिव्हा कराराची आठवण अधूनमधून करुन देण्यात येत होती. या सततच्या पाठपुराव्याला यश मिळत होते. १५ दिवसांपूर्वी डॉ.भामरे यांनी चंदू चव्हाणची लवकरच सुटका होईल, अशी ग्वाही दिली आणि तसेच घडले. चंदूची सुटका झाली. मात्र पाकिस्तानने सुटका करतानाही खोडसाळपणा केला. वरिष्ठांकडून वाईट वागणूक मिळत असल्याने तो पाकिस्तानला शरण आला, त्याला परत जाण्यासाठी मन वळविले, हा पाकिस्तानचा कांगावा हास्यास्पद आहे. अलिकडे लष्कराच्या दोन जवानांनी अन्यायाला समाजमाध्यमाद्वारे वाट करुन दिली असताना चंदूसारखा जवान सीमा ओलांडून जीव धोक्यात घालेल हे अशक्य वाटते. पाकिस्तानला नियमाचे बंधन होतेच, परंतु नियम पाळत असताना आगळीक करण्याचा मूळ स्वभाव सोडला नाही, हे पुन्हा दिसून आले. लष्कराकडून चौकशीची औपचारिकता पूर्ण करुन चंदू लवकर बोरविहीरला परत येईल, अशी आस कुटुंबियांना लागली आहे. किमान आजीच्या अस्थिविसर्जनासाठी एक दिवस पाठवा, असे आर्जव कुटुंबियांनी डॉ.सुभाष भामरे यांच्याकडे केले आहे.
भडगावच्या निशा पाटीलचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते बालशौर्य पुरस्कार देऊन झालेला गौरव हा खान्देशवासीयांना आपलाच गौरव झाल्यासारखा वाटला. गेल्यावर्षी मुक्ताईनगरच्या निलेश भिल या मुलाने असेच शौर्य गाजवत पुरस्कार मिळविला होता. त्यापाठोपाठ निशाचा गौरव झाला. त्याने बुडणाऱ्या बालकाला वाचविले होते. तर निशाने े पेटत्या घरातून एका चिमुकलीचा जीव वाचविला होता. चंदू चव्हाण, निलेश भिल, निशा पाटील अशा शूरवीरांच्या गाथा खान्देशची मान उंचावणाऱ्या आहेत. युवापिढीसाठी मागदर्शक अशाच आहेत.
- मिलिंद कुलकर्णी

Web Title: Veer Chandu and Nisha of Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.