स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ चित्रकार - रावबहादूर धुरंधर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 05:05 AM2018-09-09T05:05:43+5:302018-09-09T05:05:48+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ चित्रकार रावबहादूर धुरंधर उर्फ महादेव विश्वनाथ धुरंधर यांच्या जयंतीचे हे १५0वे वर्ष आहे.
-प्रा. डॉ. सुभाष पवार
स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्येष्ठ चित्रकार रावबहादूर धुरंधर उर्फ महादेव विश्वनाथ धुरंधर यांच्या जयंतीचे हे १५0वे वर्ष आहे. या जयंती उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या पेंटिंगचे व स्केचचे भव्य प्रदर्शन मुंबईच्या ‘नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट’मध्ये सोमवार १0 सप्टेंबरपासून भरविण्यात येत आहे. प्रदर्शनाच्या निमित्ताने धुरंधरांच्या एकूणच कला वाटचालीचा आणि त्यांच्या चित्रशैलीचा मागोवा घेणारा हा लेख.
ज्ये ष्ठ पत्रकार रावबहादूर धुरंधर आणि सर जे. जे. स्कूल आॅफ आर्ट यांचे नाते जवळपास ४१ वर्षांचे आहे. आधी विद्यार्थी म्हणून ६ वर्षे आणि नंतर अध्यापक म्हणून ३५ वर्षे अशी ४१ वर्षांची कला वाटचाल त्यांची जे. जे. स्कूल आॅफ आर्टच्या प्रांगणात झाली. अत्यंत प्रामाणिक, निर्मत्सरी स्वभावाचे आणि सर्वांना हितकर होईल असेच मार्गदर्शन करणारे धुरंधर अध्यापक म्हणून थोर होतेच, त्याहून एक चित्रकार म्हणूनही त्यांची कारकिर्द देदीप्यमान अशीच होती. जे. जे. स्कूल आॅफ आर्टला अत्यंत पवित्र वास्तू म्हणून ‘कलामंदिराचा’ दर्जा देणारे असे ज्येष्ठ व श्रेष्ठ दर्जाचे कलावंत होते, यात शंका नाही.
रावबहादूर धुरंधर उर्फ महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म १८ मार्च, १८६७ रोजी कोल्हापुरात झाला. कोल्हापूरच्या कलानगरीत मातब्बर चित्रकारांच्या परंपरेत बाल धुरंधराची कला खुलत गेली. थोर चित्रकार आबालाल रहिमान आणि धुरंधरांचे सर्वात वडील बंधू यांची मैत्री होती. त्यामुळे बालपणात चित्रकलेचे प्राथमिक धडे धुरंधरांना गुरू आबालाल रहिमान यांच्याकडून मिळाले. पुढे मॅट्रिकच्या परीक्षेसाठी १८९0 मध्ये धुरंधरांनी मुंबई हे सेंटर निवडल्याने ते मुंबईस आले. परीक्षेनंतर काही दिवस मुंबईतच राहिल्याने, त्यांचे स्नेही गंगाधर रायसिंह उर्फ बाळासाहेब पुणेकर यांच्यासोबत जे. जे. स्कूल आॅफ आर्ट पाहायला गेले. त्या कलात्मक वातावरणाचा धुरंधरांवर एवढा परिणाम झाला की, आपणही चित्रकार व्हावे, असा त्यांनी निश्चय केला. त्यानंतर, ८ जानेवारी, १८९0 मध्ये जे. जे. स्कूल आॅफ आर्टमध्ये थर्ड ग्रेडच्या वर्गात दाखल झाले.
थर्ड ग्रेडच्या वर्गाच्या चित्रकार गणपतराव केदारी यांच्या देखरेखीखाली धुरंधरांचा कलाभ्यास सुरू झाला. जुलै, १८९0 मध्ये वॉशिंग्टन प्राइससाठी एक सर्टिफिकेटचे डिझाइन धुरंधरांनी केले होते. ते डिझाइन प्रो.ग्रीनवूड आणि प्रिंसीपॉल ग्रीफिथ्स यांना खूपच आवडले. त्यांनी धुरंधरांना प्रोत्साहन देऊन रंगकामाच्या विविध पद्धती व स्केचिंगमधल्या अनेक खुब्या शिकविल्या. गणपतराव केदारी, नारायणराव मंत्री, सोकरजी बापूजी या तिन्ही मास्तरांचा धुरंधरांना घडविण्यात मोलाचा वाटा होता.
१८९५ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात धुरंधरांनी ४ चित्रे ठेवली होती. त्यापैकी एक ‘डू यू कम लक्ष्मी’ या चित्रातील विषय भाद्रपदातील गौरीपूजनाचा होता. भिंतीवर काढलेल्या चित्राची पार्श्वभूमी असलेले, एका मुलीने हातात घेतलेली गौरी, तिच्याजवळ उभी असलेली तिची धाकटी बहीण आणि हातात पंचारती घेऊन समोर उभी असलेली त्यांची माता अशा तºहेची व्यक्ती समुच्चय रचना असलेले चित्र प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट ठरले आणि त्या चित्राला पहिले सुवर्ण पदक मिळाले. ते आर्ट सोसायटीत सुवर्ण पदक मिळविणारे धुरंधर हे पहिलेच हिंदी चित्रकार ठरले होते. या सुवर्ण पदकामुळे धुरंधरांची कीर्ती सर्वदूर गेली.
एप्रिल, १८९५ मध्ये प्रिन्सिपॉल सेवानिवृत्त झाल्यानंतर ग्रीनहूड प्रिन्सिपॉल झाले. मंत्री मास्तर १८९६ दरम्यान तीन महिन्यांच्या रजेवर गेल्यानंतर पेंटिंग क्लासचा मास्तर म्हणून ग्रीनवूड यांनी धुरंधरांची नेमणूक केली. ज्या पेंटिंग क्लासमध्ये कालपर्यंत धुरंधर विद्यार्थी म्हणून बसत होते. दुसऱ्या दिवशी मास्तर म्हणून उभे राहिल्यावर धुरंधराचे सहाध्यायी चकीत झाले. एवढेच नव्हे, तर मास्तरमंडळीसुद्धा टवकारून पाहू लागली. सोकरकर मास्तर तर धुरंधरांना पेंटिंग क्लासचे व्हाइस प्र्रिन्सिपॉल म्हणून हिणवू लागले. पुढे मंत्रीमास्तर रजा संपवून आल्यानंतर त्यांनी काही दिवसांतच पदाचा राजीनामा दिला आणि धुरंधर जे. जे.चे कायमचे मास्तर म्हणून रुजू झाले. धुरंधरांना मिळालेली ड्रॉइंग मास्तरची संधी कायम राहावी, म्हणून सुप्रसिद्ध व्यक्तिचित्रकार पेस्तनजी बोमनजी यांच्याकडे आठवड्यातून दोनदा कलाशिक्षण घेण्यासाठी ग्रीनवूड यांनी धुरंधरांना पाठविले व शिकवणीचे पैसेही ग्रीनवूड देत असत.
१९०४ साली मुंबईत भरलेल्या मोठ्या औद्योगिक प्रदर्शनात दिल्या जाणाºया पदकाचे डिझाइन धुरंधरांनी केले होते. शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक प्रसंगावर साकारलेल्या या डिझाइनला दुसरे सुवर्ण पदक मिळाले. या डिझाइनच्या रूपाने श्री शिवछत्रपतींच्या चरित्रातील प्रसंग प्रथमच जनतेपुढे आल्याने, तत्कालीन सर्वच वृत्तपत्रातून धुरंधरांना प्रसिद्धी मिळाली.
नवी दिल्लीत इंपिरियल सेक्रेटरीएटमध्ये डेकोरेशन करण्यासाठी धुरंधरांना चार चित्रे साकारण्याचा आदेश झाला. लॉ मेंबरच्या दालनासाठी साकारण्यात येणारी
चित्रे कायद्यासंबंधी असावीत, असे ठरले. त्यासाठी धुरंधराचे मित्र व पुरस्कर्ते जगन्नाथ धुरंधर व श्रीपाद ब्रह्मांडकर या कायदेतज्ज्ञांची मदत झाली. हिंदू कायद्यातील स्त्रीधन (लग्न समारंभ) व दुसरे दत्तक विधान, मुसलमान कायद्यातील मृत्यूसमयीचे दान आणि चौथे चित्र ब्रिटिश साम्राज्यातील हिंदुस्थानातील आरंभीची न्यायपद्धती अशा विषयावर धुरंधरांनी ही चित्रे साकारली. या प्रत्येक चित्रात १00 हून अधिक व्यक्तिरेखा त्यांनी साकारल्या आहेत. चित्रविषयाशी समरस झाल्याशिवाय चांगली कलानिर्मिती निर्माण होऊ शकत नाही, असे विचार बाळगणारे व आयुष्यभर आचरणात आणणाºया रावबहादूर धुरंधरांची जीवनज्योत १ जून, १९४४ रोजी मालवली. ब्रिटिश काळात आपल्या स्पष्ट विचारांनी धुरंधरांनी जे. जे. स्कूलवर येणारे गंडांतर टाळले.
>१८९९ साली सेसील बर्न्स जे. जे. स्कूल चे व्हॉइस प्रिन्सिपॉल झाले. बर्न्स हे हिंदी चित्रकारांच्या विरोधात काम करायचे. त्यांचा जाच धुरंधरांनीही सोसला. प्रिन्स आॅफ वेल्स(पंचम जॉज बादशाह) यांच्या हिंदुस्थान भेटीच्या वेळी ‘अलेक्झांड्रा डॉक’ व ‘प्रिन्स आॅफ वेल्स म्युझियमची’ कोनशीला त्यांच्या हस्ते बसविण्याचे निश्चित झाले होते. अॅलेक्झांड्रा डॉक पूर्ण झाल्यावर परिसरातील भाग कसे दिसतील, हे काम सेसील बर्न्सकडे सोपविले होते. या अॅलेक्झांड्रा डॉकमध्ये माजगावपर्यंतचा संपूर्ण परिसर, बोरीबंदर स्टेशन, जनरल पोस्ट आॅफिस, कर्नाक रोड, रे रोड, मिंट रोड आदींचे चित्र काढायचे होते. बर्न्स यांना तीन वेळा प्रयत्न करूनही ते साकारता आले नाही. शेवटी धुरंधरांना बिनचूक काढण्याविषयी आदेश आला. त्यांनी बर्न्सच्या स्टुडिओत बसून रस्त्यावरील घरे, इमारती, चालणारी माणसे, ट्रम, समुद्रातील बेटे, होड्या, गलबते इत्यादी सविस्तर तपशील जलरंगात साकारले. त्यावर बर्न्स यांनी सुधारणादर्शक ब्रश फिरवून आपली सही केली.जे. जे. स्कूलमध्ये असिस्टंट मास्तर ते डायरेक्टरपर्यंतची पदे भूषविणारे धुरंधर हे पहिले चित्रकार होते. ‘म्युरल डेकोरेशन’ आणि ‘न्यूड लाइफ स्टडी’ असे अभ्यासक्रम धुरंधरांच्या सल्ल्यानेच सुरू केले. कोणतेही काम सालोमन धुरंधरांच्या सल्ल्याशिवाय करत नसत.