दत्ता इस्वलकरच्या निघून जाण्याचा अर्थ....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 06:31 AM2021-04-09T06:31:52+5:302021-04-09T06:32:17+5:30

दत्ताने नेतेगिरी केली नाही, मालकांशी समझोते करून पैसा कमावला नाही, तो फक्त लढत राहिला; तेही बंद गिरण्यांतल्या कामगारांसाठी!

Veteran trade unionist and mill workers leader Datta Iswalkar passes away | दत्ता इस्वलकरच्या निघून जाण्याचा अर्थ....

दत्ता इस्वलकरच्या निघून जाण्याचा अर्थ....

googlenewsNext

- संजीव साबडे, समूह वृत्त समन्वयक

दत्ता इस्वलकर यांना अहो म्हणायचं? की अरे म्हणायचं? ‘अहो, इस्वलकर’ अशी हाक त्यांना कोणी हाक मारल्याचं आठवत नाही. त्याला मुंबईतील गिरणी कामगारांचा नेता म्हणायचं? की कामगार कार्यकर्ता म्हणायचं? तो गिरणी कामगारांमध्ये कधीच नेता म्हणून वावरला नाही, त्याने नेत्यांसारखी उच्चरवात भाषणं केली नाहीत, कामगारांना कधीही गिरणी मालक वा राज्य सरकार यांच्याविरुद्ध भडकावलं नाही. 

डॉ. दत्ता सामंत यांनी केलेल्या संपानंतर कापड गिरण्या बंद पडल्या आणि त्यामुळे रोजगार गमावून बसलेल्या लाखभर कामगारांना त्यांची देणी मिळावीत, राहण्यासाठी घर मिळावं यासाठी दत्ता ३०/३२ वर्षं लढत राहिला. गिरण्यांच्या कंपाऊंडमध्ये कामगारांसाठी चाळी असत. गिरण्या बंद होताच कामगारांना तिथून हाकलण्याचे प्रयत्न झाले; पण त्यातील किमान आठ-दहा हजारांना तिथेच कायमस्वरूपी घरं मिळवून देण्यात दत्ता यशस्वी ठरला. उरलेल्या बारा-पंधरा हजार कामगारांना म्हाडाची घरं मिळू शकली तीही केवळ दत्ता इस्वलकर याच्यामुळेच. दत्ता स्वत: मात्र कायम सात रस्त्याच्या मॉडर्न मिल कंपाऊंडच्या आत असलेल्या चाळीत राहिला. अगदी छोट्या घरात. तेथून दोन मिनिटांवर शाहीर अमर शेख राहत. त्या संपूर्ण परिसरावर डाव्या चळवळीचा खूप प्रभाव होता. मॉडर्न मिल कंपाऊंडमध्ये समाजवादी चळवळ, राष्ट्र सेवा दल यांचा प्रभाव अधिक होता. 



दत्ता इस्वलकर, मधू ऊर्फ मनोहर राणे हे सेवा दलात खूपच सक्रिय होते. ते संस्कार दत्तावर कायम राहिले. रायगड जिल्ह्यातील साने गुरुजींना राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचा तो उपाध्यक्ष होता. धरणग्रस्तांमध्ये, आदिवासींमध्ये काम करणाऱ्या मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, सुरेखा दळवी यांच्या चळवळींशीही तो जोडला गेला होता. त्याला अलीकडे सर्वजण कामगार नेता म्हणायचे; पण त्यानं कधी नेतेगिरी केली नाही, मालकांशी समझोते करून पैसा कमावला नाही, स्वतःची कार तर सोडाच, पण साधी स्कूटरही त्याच्याकडे नव्हती. दत्ता इस्वलकर कायम गिरणी कामगार म्हणूनच वावरला. काही सहकाऱ्यांसह त्याने बांधलेली संघटनाही बंद पडलेल्या गिरण्यांतील कामगारांची. ‘बंद गिरणी कामगार संघर्ष समिती’ असंच तिचं नाव. 

असंघटित व रोजगार नसलेल्यांची संघटना उभी करणं अवघड असतं. सर्वच जण विखुरलेले असतात, त्यांना एकत्र आणणं हेच मोठं आव्हान असतं; पण दत्ताने हे आव्हान पेललं. त्यासाठी तो प्रसंगी त्यांच्या गावी, घरी जात राहिला. गिरण्या बंद पडल्यावर काही कामगारांना गिरणगावातील घरं सोडावी लागली, कोणी मुंबईच्या उपनगरांत, ठाण्यात गेले, तर कोणी कोकणात, कोल्हापुरात, साताऱ्यात, नागपूर-अकोल्यात गेले. उत्तर प्रदेशातल्या आपल्या गावीही अनेक जण गेले. त्यांच्या हातात पैसाही नव्हता. अन्य कौशल्य नसल्यानं दुसरा रोजगार मिळण्याची शक्यताही नव्हती; पण गिरण्यांच्या जमिनी अन्य कारणांसाठी विकसित करण्याची परवानगी सरकारने मालकांना दिली होती. 



अशा काळात बंद गिरण्यांच्या जागी टोलेजंग इमारती बांधणाऱ्या मालकांकडून दत्ताने कामगारांची शक्य तितकी देणी, रक्कम मिळवून दिली. त्याच जागी कामगारांना कायमचं घर मिळावं यासाठी त्याने अनेक आंदोलनं केली, सरकारवर दबाव आणला. इतकंच काय, लालबागचं भारतमाता चित्रपटगृह बंद पडू नये आणि गिरणगावची ही शान टिकून राहावी, यासाठी दत्ता असंख्य कामगारांसह रस्त्यावर उतरला. त्याच्यामुळेच भारतमाता आजही उभं आहे. 
गिरणी कामगारांच्या नोकऱ्या गेल्यानंतर त्यांच्या मुला-मुलींचं शिक्षण बंद पडू नये यासाठी दत्ताने प्रयत्न केले. त्यांना रोजगार मिळावा यासाठी दत्ता, प्रवीण घाग आणि इतर सहकारी वणवण फिरले. खरं तर मुंबईच्या कापड गिरण्यांत काँग्रेसप्रणीत राष्ट्रीय मिल मजदूर संघ ही एकमेव संघटना मान्यताप्राप्त होती. मुंबई औद्योगिक संबंध कायद्यामुळे कामगारांना दुसरी संघटना उभी करणं दुरापास्त होतं. या कामगारांच्या प्रश्नांसाठी कम्युनिस्ट, समाजवादी म्हणजेच कॉम्रेड डांगे, एसेम जोशी, डॉ. दत्ता सामंत यांनी आंदोलनं केली; पण त्याचा फायदा मात्र काँग्रेसप्रणीत कामगार संघटना व नेते मिळवत राहिले. गिरणगावात प्रचंड जागेवर आजही राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मोठी वास्तू आहे; पण गिरणी कामगार तिथे फारसे फिरकलेच नाहीत. आताही ते उभे राहिले दत्ताच्या पाठीमागे. अद्याप अनेकांना घर मिळायचं आहे, अनेक प्रश्न शिल्लक आहेत. त्यासाठी दत्ताने आंदोलनाची तयारी केलीही होती; पण दत्ता अचानक निघून गेला... बंद गिरण्यांतील कामगारांची लढाई आता अधिक अवघड झाली आहे.

Web Title: Veteran trade unionist and mill workers leader Datta Iswalkar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.